येथील नळयोजनेचा पाणीपुरवठा गेल्या दहा दिवसापासून बंद झाल्यामुळे पाण्याअभावी नागरीकांचे कमालीचे हाल होत आहे. भर उन्हाळयाच्या दिवसामध्ये नागरीकांची पाण्यासाठी होणारी भटकंती नित्याची झाल्याचे दिसून येत आहे. नागरीकांना भर उन्हाळयात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असले तरी संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वीज वितरण कंपनीने हिवरा आश्रम येथील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे ऐन उन्हाळयाच्या काळात पाण्याच्या समस्येला नागरीकांना सामोरे जावे लागत आहे.
उन्हाळयाच्या दिवसामध्ये रात्री कमालीचा उकडा जाणवत आहे. मात्र पाण्या अभावी घरातील कुलर शोभेची वस्तु बनली आहे. दिवसभर काम करून रात्री विसावा घ्यायचे ठरविले तरी गर्मीमुळे अनेकांच्या झोपा उडाल्या आहे.
वीज कंपनीचे ग्रामपंचायतीकडे पैसे थकल्यामुळे हिवरा आश्रम गावाचा पाणीपुरवठाचा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. ग्रामपंचायतीकडे वीज कंपनीचे चार लाख थकीत आहे तर ग्रामपंचायतचे वीज कंपनीकडे पावने दोन लाख रूपये थकीत आहे. त्यामुळे येथील जनता दोघांच्या भांडणामध्ये पाण्याविना भरडली जात आहे. वीज वितरण कंपनीकडील पावने दोन लाख वळती करून विद्युत पुरवठा सुरू करावा अशी मागणी सरपंच सौ.निर्मला डाखोरे यांनी केली. वीज कंपनीने गेल्या दहा दिवसापासून विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे नागरीकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. आमदार डॉ.संजय रायमूलकर यांनी या मुजोर कनिष्ठ अभियंत्याकडे लक्ष देवून हिवरा आश्रम गावाचा पाणी पुरवठा खंडीत विद्युत पुरवठा त्वरीत जोडून द्यावा अशी मागणी नागरीकांमधून जोर धरीत आहे.
घरातील पाणी साठवण कमी झाल्यामुळे नागरीकांना चारशे ते पाचशे रूपयाचे पाणी विकत घ्यावे लागत असून यामुळे नागरीकांची मोठया प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. तरी लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरु करण्यात यावा.
उन्हाळयाच्या दिवसामध्ये गृहिणींना पापड,शेवाळया,खारोडया,कुरडया कराव्या लागत आहे. यासाठी मोठया प्रमाणात पाणी साठवणाची आवश्यकता असते मात्र हिवरा आश्रम येथे गेल्या दहा दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे गृहिनींच्या कामाला ब्रेक मिळाला आहे.
हिवरा आश्रम ग्रामपंचायतीचे ३३ केव्ही सबस्टेशनकडे पाणीपुरवठा थकित बाकी पावने दोन लाख असून वीज वितरण कंपनीने वळती करून पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करावा. जेणे करून हिवरा आश्रम येथील नागरीकांची गेल्या दहा दिवसापासून पाण्यासाठी होणारी भटकंती थांबले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा