Responsive Ads Here

मंगळवार, २८ मे, २०२४

विवेकानंद विद्या मंदिराची यशाची परंपरा कायम !

 

विवेकानंद आश्रम हे निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या आरोग्य सेवेने देश, विदेशात प्रसिध्द झालेले दुःख निवारण केंद्र आहे. त्यासोबतच ही संस्था महाराष्ट्रातील एक मोठे शैक्षणिक केंद्र बनले आहे. गुरूकुल पध्दतीचे शिक्षण असल्यामुळे विद्यार्थ्यांचा निवास हा आश्रम परिसरातच असतो. कोवळया वयात मुलांना स्वावलंबनाचे धडे मिळण्यासाठी हे वातावरण अत्यंत पोषक आहे. दर्जेदार शिक्षण,रूचकर भोजन मातृहृदयाने पुरविणारी व्यवस्था,सर्वसोयीसुविधांनी युक्त ५ मजली शालेय विद्यार्थी वसतीगृह,वसतीगृहातून होणारे सुसंस्कार वर्ग, प्रार्थना, विविध उपक्रम त्यातून मिळणारे सहजीवन सोबतच आश्रमामुळे थोरामोठयांचे ये-जा असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा लाभलेला सहवास यामुळे त्यांचे जीवन सुंदर होण्यास मदत मिळते. म्हणून या शाळेत प्रवेशासाठी महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांची झुंबड उडते. आज या शाळेच्या दहावीचा निकाल जाहिर झाला आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद विद्या मंदिराचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला असून ऋतुजा रवि लोखंडे ९६.२० टक्के, श्रद्धा संतोष हिवरकर ९६ टक्के, रवि भागवत छबिले ९४.८०टक्के, कृष्णाली राजेश शेळके ९४.६० टक्के, संकेत मारोती घोरपडे ९३.८० टक्के, स्वरूपा राजेश हागोने ९३.८० टक्के, नकुल प्रदीप शेळके ९३.२० टक्के, शिवप्रसाद गजानन केणेकर ९३. टक्के, राम दयानंद थोरहाते ९२.८० टक्के, विराज विशाल परिहार ९१.८० टक्के, कृष्णा आत्मानंद थोरहाते ९०.८० टक्के  गुण मिळवून उत्तीर्ण  झाले. विवेकानंद विद्या मंदिराचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णूपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते यांचे सह विश्वस्त मंडळ व विवेकानंद विद्या मंदिराचे प्राचार्य आर.डी.पवार, उपप्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

गुरुवार, २३ मे, २०२४

हिंसा, व्देष व विषमतायुक्त जगाला बुध्द चिंतन हाच पर्याय - किरण डोंगरदिवे


विवेकानंद आश्रमात बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमात केले प्रतिपादन
आजच्या जगात प्रगतीच्या नावाखाली, सीमा विस्तारासाठी अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. अण्वस्त्र जग मानव आणि मानवतेच्या मुळावर उठले आहे. धर्माधर्मातील व्देष, विषमता जगाला विनाशाकडे घेवून जात असतांना भगवान बुध्दांचे जीवन व तत्‍वज्ञानाचे चिंतन हाच श्रेष्ठ पर्याय जगासमोर शिल्लक असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द कवी किरण डोंगरदिवे यांनी विवेकानंद आश्रमात आयोजित बुध्द पौर्णिमा कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना व्यक्त केले. प्रज्ञावंतांनी शीलवान असावे व करूणाबुध्दी धारण करावी असे करणे ही मानवाची अधिकत्‍तम गुणवत्‍ता आहे. स्वामी विवेकानंदांनी  भगवान बुध्दांकडून करूणेचा स्वीकार केला म्हणूनच स्वामी विवेकानंदांचे हृदय दीन, दुःखी, पीडीत महिला यांच्यासाठी कासावीस झाले व भारतीयांसाठी ते मोठे कार्य करू शकले.  त्‍यांनी धर्मविषयक नवी संकल्पना  मांडली, त्‍यात मानवसेवेलाच महत्‍व दिले. त्‍यांच्या विचारांचा तोच धागा पकडून प. पू. शुकदास महाराजांनी मानवाला केंद्रस्थानी मानून त्‍याची सेवा केली असेही त्‍यांनी पुढे बोलतांना सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रतिमेचे पूजन व  पंचशील ग्रहण करण्यात आले.  सज्जनसिंह राजपूत यांनी बुध्द वंदना सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी हे होते.  प्रमुख उपस्थितीत साहित्‍यिक शिवाजीराव घोंगडे, अशोक थोरहाते, प्राचार्य आर. डी. पवार हे होते. शिवाजीराव घोंगडे यांनी प. पू. शुकदास महाराजांनी गावकुसा बाहेर राहणाऱ्यांना, कष्टकरी, श्रमजीवी, वंचितांना आश्रमात समावून घेतले. त्‍यांनी कोणताच भेद बाळगला नाही. मानव कल्याणासाठी अहोरात्र जीवन जगून विवेकानंद आश्रम सारखी सुंदर संस्था मानव सेवेसाठी निर्माण केली. महाराजांच्या जीवनात भगवान बुध्दांनी सांगितलेले तत्‍व आढळून येतात असे विचार त्‍यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव हिवाळे यांनी केले. यावेळी संतोष गोरे, पुरूषोत्‍तम आकोटकर, अशोक गिऱ्हे, पंढरीनाथ शेळके, पत्रकार संतोष थोरहाते, राजेश रौंदळकर, मधुकर वानखेडे, बी.टी.सरकटे, जी.डी. तायडे, नितीन इंगळे,संजय कंकाळ,समाधान बनसोडे,भिकेश इंगळे, विश्वजीत गवई,माणिक गवई,अनिल वानखेडे, पोलीस पाटील रवि घोंगडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य आर.डी.पवार यांनी केले.

बुधवार, १५ मे, २०२४

विवेकानंद आश्रमात महात्‍मा बसवेश्वर जयंती साजरी

 थोर समाज सुधारक तसचे वर्णभेद,जातीभेद या विषमतावादी विचारांना मानवी जीवनातून हद्दपार करण्यासाठी चळवळ उभी करणारे महात्‍मा बसवेश्वर. त्‍यांची जयंती विवेकानंद आश्रमात साजरी करण्यात आली. व्यासपीठावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सुप्रसिध्द गायक सज्जनसिंह राजपूत, वादक निलेश थोरहाते यांच्या भक्तीगीत गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्राचार्य आर डी पवार आपल्या भाषणात म्हणाले, महात्‍मा बसवेश्वरांच्या विचारात लोकशाही मूल्यांची तत्‍वे होती. त्‍यांनी स्त्रीशिक्षण, स्त्रीयांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग, जातीप्रथा निर्मूलन, आंतरजातीय विवाह प्रोत्‍साहन या समाजाला एकसंघ ठेवणाऱ्या मानवतावादी विचारांचा प्रसार केला. बसवेश्वरांनी अनुभव मंडप या संकल्पनेतून आधुनिक राज्य व्यवस्थेचे प्रारूप निर्माण केले. कर्मप्रधान जीवनशैली स्वीकारून परमेश्वर प्राप्तीचा संदेश दिला. त्‍यानंतर सौ.वनिता सांबपूरे यांनी महात्‍मा बसवेश्वरांच्या जीवनावरील दीर्घ काव्य सादर केले. सत्‍पुरूषांचे विचार कालातीत असतात. एक हजार वर्षापूर्वी बसवेश्वरांनी केलेल्या सामाजिक क्रांतीची गरज आजच्या नवसमाज रचनेला आवश्यक भासत आहे. महात्‍मा बसवेश्वर ते स्वामी विवेकानंद आणि प.पू.शुकदास महाराज हा विचारांचा त्रिकोण कर्नाटक,बंगाल पासून महाराष्ट्रापर्यंत प्रवाहीत झाला. प.पू.शुकदास महाराजांनी स्वीकारलेला कर्मयोग बसवेश्वरांच्या शिकवणूकीतून त्‍यांना प्राप्त झाल्याचे संतोष गोरे यांनी सांगितले. कृषि सहाय्यक यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष अशोक थोरहाते, वसंतआप्पा सांबपूरे, बेलाप्पा धाडकर, डॉ.जगदीश सांबपूरे, शिवदास सांबपूरे, सागर उर्किडे, अनिल बोरकर, विलास तामस्कर, संजय तोडकर,  सातरकर आप्पाजी, मनोज डोंगरे,डॉ.सुनिल देशमाने, सतिष धाडकर, डॉ. तुपकरी, नागेश तोडकर, योगेश तोडकर, डॉ.तेजस सांबपूरे, श्याम तामस्कर, इत्‍यादी  मान्यवर उपस्थित होते.

रविवार, २८ एप्रिल, २०२४

विवेकानंद आश्रम ज्ञानगंगेचा भगीरथ - शिक्षण उपसंचालक डॉ.पानझाडे

भगीरथाने प्रयत्‍नांची पराकाष्टा करून लक्षावधीजीवांना तसेच पशू पक्षी व निसर्ग यांना जीवन देणाऱ्या गंगेला अवतीर्ण केले अशी अख्यायिकाआहे त्‍याचप्रमाणे प.पू.शुकदास महाराजांनी ग्रामीण भागातील, तळागाळातील उपेक्षित आणिवंचितांचे जीवन समृध्द व शहाणे करण्यासाठी उजाड आणि निर्मनुष्य माळरानावर ज्ञानगंगाअवतीर्ण केली व लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी जीवन बहाल केले असे उदगार महाराष्ट्रराज्याचे शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे पुणे यांनी विवेकानंद आश्रमास भेटी प्रसंगीकाढले. शिक्षण व ज्ञान ही सर्वोच शक्ती आहे. त्‍यामुळेच मानवी जीवनाला अर्थ प्राप्तहोतो. शिक्षणासोबत स्वावलंबन, सदाचार या मुल्यांना प्राधान्य देत आल्यामुळे या संस्थेच्याशाळा व महाविद्यालयाची प्रगती झाली. शिक्षणाला व्यवसायाचे रूप न येवू देता. ती सेवाआहे व या सेवेचे व्रत आपण स्विकारले आहे अशी भूमिका प्रत्‍येक शाळेने घेतल्यास विद्यार्थ्यांनाअपेक्षीत मुलभूत भौतिक सोयी सुविधांची कमतरता पडणार नाही असे विचारही त्‍यांनी यावेळीव्यक्त केले. आश्रमात आगमन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांनी त्‍यांचेपुष्पगुच्छ व ग्रंथ देवून स्वागत केले. संस्थेच्या सर्व सेवाउपक्रमांना यावेळी त्‍यांनीभेट दिली. विवेकानंद स्मारक हे पर्यटकांसाठी मिनी कन्याकुमारी आहे. याठिकाणी आल्यानंतरविवेकानंदांच्या दिव्य विचारांची,त्‍यांच्या तत्‍वज्ञानाची प्रेरणा प्रत्‍येकाच्याअंर्तमनाला स्पर्श करून जाते. आश्रमाने केलेले निसर्गाचे संवर्धन त्‍यामुळे नजरेस पडणारीहिरवी झाडी परिसराची स्वच्छता आणि निळाशार जलाशय अत्‍यंत नयनरम्य आहे. शिक्षणातील मुलींचाटक्का वाढविणे गरजेचे आहे. शाळा बाह्य मुले शोधणे व त्‍यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे तसेचमराठी शाळा टिकून राहणे हे शिक्षण विभागा समोरील मोठे आव्हान आहे परंतु शिक्षण क्षेत्रातीलसर्व संस्था, शिक्षक, पालक व समाजातील सर्व घटक हे आव्हान पेलण्यासाठी सज्ज व सक्षमआहे असे विचारही त्‍यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.  याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, विश्वस्त कैलास भिसडे, प्राचार्य आर. डी. पवार, प्रा. गणेश चिंचोले इत्‍यादी मान्यवर उपस्थितहोते.

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

पुस्तक वाचा, ज्ञान संपादन करा, गतीमान व्हा व ध्येयाप्रर्यंत पोहचा

पुस्तक हे ज्ञान प्रसाराचे अध्ययन, अध्यापनाचे ,विचार प्रसाराचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. मुद्रण कला विकसीत होण्याच्या अगोदर एखादा विचार, ओवी, कवीता, श्लोक यांना कंठस्त करण्याची पध्दती होती. परंतु ज्यावेळेला विचार, संकल्पना यांची मांडणी पुस्तक रूपाने सुरू झाली अगदी तेंव्हा पासून ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खुली झाली. काहीकाळ वाचनाची आवड ही परमोच्च बिंदूवर होती परंतु आज वाचन कला ही शेवटची घटका मोजत असून ज्या दिवशी हातातील पुस्तकाची जागा यंत्र घेईल. त्‍यादिवशी जगातील एका मोठया आनंदाला व सुखाला आपण गमावून बसू. पुस्तक वाचनातून मिळणारा आनंद हा नवविचारांचा स्पर्श झाल्याची अनुभूती देतो असे मत वाचन चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या  सौ. सुनिता गोरे यांनी दैनिक सकाळशी संवाद साधतांना व्यक्त केले. हल्ली  वाचनालयाकडे  कोणाचे पाऊले वळतांना दिसत नाहीत. पुस्तक विकत घेवून वाचावे व संग्रही ठेवावे अशी धारणा असणारे वाचकही पुढच्या पिढीला पाहावयास मिळतील का ? दरवर्षी बंद पडणाऱ्या प्रकाशन संस्था, छापली जाणारी पुस्तके व ग्रंथे कमी होत आहेत. त्‍यामुळे हे वैचारीक दारीद्रय विकसीत भारतात पाहायला मिळणार आहे का? असेल तर ते दुर्दैव आहे. प्रत्‍येकाच्या घरात छोटशी लायब्ररी असणे त्‍याच्या बौध्दीक व वैचारिक संपन्नतेचे लक्षण आहे. एखाद्या बापाने मुलाच्या वाढदिवसाला पुस्तके भेट द्यावी. मित्र, मैत्रीणीला ग्रंथ गिफ्ट करावी तरच वाचनाची चळवळ गतीशील राहील. माझ्या घरात माझे स्वर्गीय सासरे टी.टी.गोरे यांनी जमा केलेली पुस्तके आहेत. आज त्‍यात भर घालून छोटशी लायब्ररी मी निर्माण करू शकले. विवेकानंद चरित्र, श्यामची आई, बटाटयाची चाळ यासारखी अनेक पुस्तके वाचून काढली. आज जागतिक पुस्तक दिन आहे आजपासूच सुरूवात करू या. संकल्प करू सिद्धीस नेऊ. सकाळच्या या आवाहनास भरभरून प्रतिसाद मिळेल व  वाचन चळवळ समृध्द होईल अशी अपेक्षा आहे.

 

सकाळ समूह सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था

सकाळ समूहासारखी वाचन संस्कृतीस चालना देणारी सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था त्‍यादृष्टीने काम करीत आहे. सकाळने मराठी माणसाचे वैचारीक भरण पोषण केले याचा आनंद होतो.

 

सुनिता गोरे यांच्या कपाटात १२०० पुस्तके

सौ. सुनिता  गोरे यांच्या कपाटात १२०० पेक्षा अधिक पुस्तकांची संख्या आहे. त्‍यात महापुरूषांची चरित्रे ,विवेकानंदांचे सम्रग खंड, बालसाहित्‍य उपलब्ध आहे. ग्रामीण भागात वाचन चळवळ वृध्दींगत होण्यासाठी त्‍या प्रयत्‍नशील असतात.