Responsive Ads Here

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

राहुरी तालुक्यात भाजपची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या माजी आमदार चंद्रशेखर कदम यांना पहिल्या यादीतून डावललं

 अनेक मतदारसंघात भाजपातील निष्ठावान या यादीवर नाराज 

भाजपने पहिली यादी जाहीर करत बाजी मारली खरी, मात्र आता अनेक मतदारसंघात भाजपातील निष्ठावान या यादीवर नाराज असल्याच समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात मागील वेळी पराभूत झालेल्या शिवाजी कर्डिले यांना पहिल्या यादी स्थान मिळालं. मात्र राहुरी तालुक्यात दोन वेळेस आमदार असलेले आणि भाजपची  तालुक्यात मुहूर्तमेढ रोवणारे माजी आमदार चंद्रशेखर कदम हे मात्र नाराज झाल्याचे समोर आल आहे.

आपला मुलगा सत्यजित कदम याला उमेदवारीचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी त्याला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. यापूर्वी शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीसाठी मी विद्यमान आमदार असतानाही थांबलो होतो. मात्र पक्षाने मला शब्द देऊन तो पूर्ण केला नाही, त्यामुळे भविष्यात मुलगा जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी बोलून दाखवला आहे. 

दरम्यान, चंद्रशेखर कदम यांचे पुत्र सत्यजित कदम यांनी गेल्या दहा वर्षात देवळाली प्रवरा नगरपालिकेच नगराध्यक्ष पद भूषवतांना मतदारसंघात देखील आपला ठसा उमटवला आहे. शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीनंतर सत्यजित कदम यांनी देखील बंडखोरीचे संकेत दिले असून ज्या कार्यकर्त्यांनी मला नेता केलं त्या कार्यकर्त्यांचा निर्णय पुढील दोन दिवसात जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट करू, असा इशाराच भाजपला दिलाय. दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांमुळे भाजपातील निष्ठावंतांची मोठी कोंडी निर्माण होत असल्याचं आता पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात कदम कुटुंबाने वेगळा निर्णय घेतला तर भाजप आणि महायुतीसाठी तो मोठा धक्का ठरेल यात शंका नाही, असेही ते म्हणाले आहे. 

2019 मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजी कर्डीले हे सज्ज झाले असून राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच मला राहुरीतून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला असल्याचं शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा