Responsive Ads Here

सोमवार, २३ एप्रिल, २०१८

टाकाऊ वस्तुपासून बळीराजाने बनविले पक्षीरोधक यंत्र




प्रयोगशीलता,जिज्ञासा व नाविण्यपूर्णतेचा ध्यास मनी घेतल्यास माणसाला कुठलीही अशक्य गोष्ट शक्य झाल्याखेरीज राहत नाही. याचाच प्रत्यय मेहकर तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी परशुराम त्र्यंबक बो-हाडे यांच्याकडे पाहल्यानंतर येतो. कळंबेश्वर येथील परशुराम बो-हाडे यांनी घरातील टाकाऊ वस्तुच्या मदतीने अत्यंत कमी खर्चात पक्षीरोधक यंत्र बनविले आहे. त्यांनी बनविलेले पक्षीरोधक यंत्र परिसरातील शेतक-यांसाठी कुतूहलचा विषय ठरत आहे. त्यांनी आपल्या सहा एकर ज्वारीच्या शेतात असे आठ पक्षीरोधक यंत्र बसविले असून  या यंत्राच्या होणा-या आवाजामुळे  पक्षी शेतात येत नाही. या पक्षीरोधक यंत्रामुळे पक्ष्यांपासून होणा-या पिकांच्या नुकसाला आळा बसल्याचे त्यांनी दैनिक सकाळशी बोलतांना सांगीतले. शेतातील हिरव स्वप्न बहरल की बळीराजाचा ऊर आनंदाने भरून येतो. शेतातील याच हिरव्या स्वप्नाच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरहनिर्वाह असल्यामुळे पिकाची तो पोटच्या गोळया प्रमाणे काळजी घेतो. शेतातील हिरव्या पिकांचे नुकसान होवू नये म्हणून बळीराजा नेहमीच चिंतातूर असतो. दरवर्षी पक्ष्यांपासून पिकांचे जवळपासतीस ते चाळीस टक्के नुकसान होते. पुर्वीकाळापासून शेतातील पिकांच्या  सरवंक्षणासाठी पारंपारीक साधनाचा मोठया प्रमाणात उपयोग होत होता. यासाठी अनेकदा मजुर न मिळाल्यास पिकांचे सुध्दा नुकसान होते. शेतातील पिकांवर बसणा-या पक्ष्यांना हुसकाविण्यासाठी पुर्वी गोफण,गुलेर,बुजगावणे किंवा रिकामे डब्बे बाजवून पक्ष्यांना अटकाव केला जात असे. यामध्ये मनुष्यबळ मोठया प्रमाणात लागत असे मात्र परशुराम बो-हाडे यांनी बनविलेल्या पक्षीरोधक यंत्रामुळे हे काम अगदी सोपे झाले आहे. या पक्षीरोधक यंत्रामुळे दिवसा उभ्या पिकांचे पक्ष्यांपासून तर रक्षण होतेच परंतु रात्रीसुध्दा रानडुक्कर, हरीण व इतर जंगली प्राण्यांपासून पिकांचे रक्षण होवून त्याचा उत्पादन वाढीसाठी मदत मिळते.

असे बनविले पक्षीरोधक यंत्र
परशुराम बो-हाडे यांनी जुन्या कुलरचा फॅन,सायकल एक्सल,पातले व दोन लोखंडी पट्ट्या एवढया  घरातील टाकाऊ साहित्या पासून अवघ्या दिडशे ते दोनशे रुपयांमध्ये हे पक्षीरोधक यंत्र बनविले आहेपक्षीरोधक यंत्राचाफॅन फिरल्यामुळे दोन लोखंडी पट्टया पातेल्यावर आदळयाने आवाज होतो. पक्षी रोखण्यासाठी या यंत्राची मोठी मदत होते.

उभ्या पिकांचे पक्ष्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पक्षीरोधक यंत्र मोलाची कामगिरी पार पाडते. एक पक्षीरोधक यंत्र एक हेक्टर क्षेत्रात पक्ष्यांना रोखण्यास मदत करते. शेतक-यांनी हे यंत्र शेतात बसविल्यास नक्कीच फायदा होतो.
                                                  परशुराम बो-हाडे,शेतकरी कळंबेश्वर


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

1 टिप्पणी: