Responsive Ads Here

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

दिव्यांग 'संजयला' गवसला आयुष्याचा 'सूर'



आज अकोला येथून दैनिक सकाळच्या वर्धापन दिनाचा  कार्यक्रम संपल्यानंतर घराच्या ओढीने पावलांना गती आली....झपाझपा पावले बस स्थानकाच्या दिशने पडत होते. बस स्थानकावर जावून केंव्हा एकदा मेहकर कडे जाणारी बस  शोधतो व त्या बसमध्ये बसतो असे वाटू लागले. एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाच्या झळा,डोक्याव तापणारा सूर्य  व शरीरावरून वाहणा-या घामाच्या धारांनी जीव खूप वैतागून गेला...पाण्याच्या दोन - तीन बॉटल पिल्या  तरी शरीरातील उष्णता कमी होत नव्हती...गाडीत बसावे व सुटकेचा श्वास सोडावा असे वाटू लागले. यासाठी मेहकर कडे जाणा-या बसकडे जाणार एवढयातच बसस्थानकाच्या कोप-यातून "कर्तव्याने घडतो माणूस" हे गाण कुणी तरी गात असल्याचे कानी पडले... कुठल्याही प्रकारीची तबल्याची साथसंगत नसता केवळ हार्मोनिअम वरती कुणी गीत गात होते...
गीत सुरात असल्यामुळे गाण्याच एक कडव ऐकण्याचा मोहाला आवर घालणे अशक्य झाले म्हणून मागे वळून बघतोय तर काय  एक अंध व्यक्ती गात असून त्याच्या बाजूला कुणी महिला बसलेली दिसून आली...त्याचे गाणे सुरू असतांना येणारा जाणारा प्रवासी आपल्याजवळी काही सुट्टे पैसे त्यांना देत होते... कुणी आपल्याला पैसे देत आहे, हे अंध असल्यामुळे त्या अंध  व्यक्तीला दिसत नव्हते...मात्र तो गाणे गाण्यात तल्लीन झाला होता.. अंध व्यक्तीने गायलेल्या कर्तव्याने घडतो माणूस हे गीत नकळत मला अंर्तमुख करून विचार करायला लावू लागले...ज्याला दृष्टी नाही...रोज रोजीसाठी कुणापुढे हात न पसरता आपल्या गायनाच्या भरवशावर येणारा प्रवासी जे देईल त्यावर त्याचा व त्याच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालता हे त्यांच्याशी बोलल्या नंतर कळाले...मला कष्टातून मिळाले थोडे पैसे मिळाले तरी चालेल...मात्र फुकटची दमडी नको असे त्याचे बोल त्याच्यातील स्वाभिमानाचे दर्शन करून देत होते. संजय वानखेडे हा अकोल्यातील खडकी परिसरात  राहतो. सकाळपासून संजयच्या दिनचर्येला सुरुवात होते ती सुद्धा गायनानेच... कुठे हि संगीतच शिक्षण नाही...केवळ कानी पडलेले गीत सुरात जसेच्या तसे गाण्याची देण देवाने त्याला दिली. संजयसाठी तर गाणे हेच जीवन झाले आहे.सकाळ, दुपार व संध्याकाळच्या गायनाच्या भरवशावर च त्याचा कौटुंबिक उदरनिर्वाह चालतो... खरच आयुष्य आहे तरी काय? आयुष्य कसे आहे? आयुष्य जर व्याख्याबध्द केले तर नेमकी आयुष्याची व्याख्या तरी काय असेल? आयुष्याकडे पाहावे तरी कोणत्या दृष्टीने? आयुष्य जगण्याची प्रत्येकाची असलेली भिन्न भिन्न शैलीमुळे प्रत्येकाचे आयुष्य वेगळे भासते.मात्र संजयची आयुष्याकडे पाहण्याची उन्मेद काही वेगळीच जाणवली. संघर्ष जणू त्यांची सावली असला तरी तो आनंदाने जगतो...अशा संघर्ष करणा-या रिअल हिरोला सलाम करण्याचे मलाही राहवले नाही...


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
मो.९९२३२०९६५८
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा

1 टिप्पणी: