Responsive Ads Here

कैलासराणा शिव चंद्रमौळी


कैलासराणा शिव चंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥
रवींदुदानावल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमीरौघ  जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी तुजवीण शंभो मज कोण  तारी ॥२॥
जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥
वैराग्य योगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी
उमानिवासा त्रिपुरान्तकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥४॥
उदारमेरु पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी तो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥५॥
ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरी दोष महविदारी ।  तुजवीण शंभो मज कोण तारी ॥६॥
कपूरगौरी गिरीजा विराजे । हळाहळें कंठ निळाच साजे ।
दारिद्र्य दुःख स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥७॥
स्मशानक्रीडा करिता सुखावे तो देवचूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥८॥
भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥९॥
नंदी हराचा हर नंदिकेश । श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१०॥
भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी । तुजवीण शंभो मज कोण
तारी ॥११॥ इच्छा हराची जग हे विशाळ । पाळी रची तो हरि ब्रह्मगोळ
उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१२॥
भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१३॥
प्रयाग वेणी सकळा हराच्या । पदारविंदी वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१४॥
कीर्ती हराची स्तुती बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१५॥
सर्वांतरी व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरुपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१६॥
सदा तपस्वी असे कामधेनु । सदा सतेज शतकोटी भानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१७॥
कर्पूरगौर स्मरल्या विसावा । चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंती स्वहितसुचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१८॥
विरामकाळी विकळे शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनि चित्तहारी ।तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१९॥
सुखावसानीं सकळें सुखाची । दुःखावसानी टळती जगाचीं ।
देहावसानी धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२०॥
अनुहतशब्द गगनी न माय । तिचेनि नादें भव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२१॥
शांतिस्वलीला वदनीं विलासे ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२२॥
पीतांबरें मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणींची ।
श्रीवेददत्त दुरितान्तकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२३॥
जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंचीं तुटली उपाधी ।
शुद्धस्वरे गर्जती वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२४॥
निदान कुंभ भरला अभंग । पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२५॥
मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२६॥
जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळा मालतिमाळ हातीं ।
प्रतापसूर्य शरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२७॥
अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।
नेई सुपंथे भवपैलतारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२८॥
नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जप रे शिवयंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यानगुहा विहारी तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२९॥
एकान्ति ये रे गुरुराजस्वामी । चैतन्यरुपी शिव सूखनामी ।
शिणलों दयाळा बहुसाळ भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३०॥
शास्त्राभ्यास नको व्रतें मख नका तीव्रें तपें ती नको ।
काळाचें भय मानसीं धरु नको दुष्टांस शंकू नका ।
ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥३१॥



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा