Responsive Ads Here

रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

ठाकरे गटाने निवडणूक चिन्ह बदललं?, विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी ओळख मिळणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सुधारित 'मशाल' निवडणूक चिन्ह दिलं आहे. जून २०२२ मध्ये शिंदे गटाने शिवेसेनेतून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दोन तलवारी आणि ढाल हे चिन्ह मिळालं तर, उद्धव ठाकरेंच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, उद्धव गटाचे निवडणूक चिन्ह 'मशाल' हे आइस्क्रीमच्या कोनसारखं दिसतं असं म्हणत विरोधकांकडून खिल्ली उडवण्यात आली होती. त्यामुळे या निवडणूक चिन्हात थोडा बदल करण्यात आला असून निवडणूक चिन्हात 'मशाल' स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना ईव्हीएमवर सुधारित मशाल निवडणूक चिन्ह दिसणार आहे. पक्ष विभाजनानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मशाल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक चिन्ह म्हणून दोन तलवारी आणि ढाल दिली होती.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने १९८५ मध्ये 'ज्वलंत मशाल' हे निवडणूक चिन्ह वापरून निवडणूक यशस्वीपणे लढवली होती. शिवसेनेने स्थापनेपासून अनेक चिन्हांवर निवडणूक लढवली आहे. त्यात रेल्वे इंजिन, ताडाच्या झाडांची जोडी, तलवार आणि ढाल यांचा समावेश आहे. तर १९८९ मध्ये शिवसेनेने धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत चार खासदार लोकसभेवर पाठवले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेली महायुतीकडून सध्या सत्ता टिकविण्यासाठी खूप प्रयत्न सुरु आहेत. तर शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सत्ता मिळवण्यासाठी जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने कमाल करत राज्यात आघाडी घेतली. तोच विश्वास त्यांना विधानसभा निवडणुकीतही असल्याचं नेते सांगतात. तर, विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचच सरकार येणार असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी बोलून दाखवला. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा