Responsive Ads Here

बुधवार, २३ मे, २०१८

विवेकानंद आश्रम व इफकोचा स्तुत्य उपक्रम- उपविभागीय कृषि अधिकारी गिरी



शुकदास महाराज माती परिक्षण सप्ताहास प्रारंभ, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार माती परिक्षण

माती परिक्षण ही काळाची गरज असून शेतक-यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मातीचे आरोग्य कोणत्याप्रकारे आहे हे समजून घेणे आवश्यक बनले आहे. विवेकानंद आश्रम व इफको चा मोफत माती परिक्षणाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यामुळे परिसरातील शेतक-यांना मोठा लाभ होणार आहे असे प्रतिपादन उपविभागीय कृषि अधिकारी यांनी बुधवारी( दि.२३) रोजी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना केले.
विवेकानंद कृषि महाविद्यालयात आयोजित संत शुकदास महाराज माती परिक्षण सप्ताहाच्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मेहकरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी गणेश गिरी यांच्या हस्ते झाले.  यावेळी प्रभारी तालुका कृषि अधिकारी विजय सरोदे व इफकोचे जिल्हा व्यवस्थापक कल्याण अटकळे हे होते तर अध्यक्षस्थानी विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे हे उपस्थित होते. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी दि. २३ मे बुधवार रोजी सुमारे शंभर शेतक-यांनी आपल्या शेतातील मातीचे नमुने तपासणीसाठी आणले होते.

प्रभारी कृषि अधिकारी विजय सरोदे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले की, प्रत्येक शेतक-याने शेतीची कुंडली तयार करावी त्यात आपल्या शेतीचे आरोग्य जपावे. माती तपासणी नंतरच योग्य पिकांची निवड करून लागवड केल्यास उत्पादनात वाढ होईल. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे यासाठी शासनाचा कृषि विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील असून विवेकानंद आश्रमासारख्या सेवाभावी संस्थांनी या कामी पुढाकार घेवून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अर्चना बळी तर आभार प्रदर्शन प्रा.आकाश इरतकर यांनी मानले.

विवेकानंद आश्रम व इफको च्या वतीने परिसरातील शेतक-यांना अत्याधुनिक पध्दतीने मोफत माती परिक्षण करून दिले जाणार आहे.सात दिवस चालणा-या या मोफत माती परिक्षणाचा लाभ शेतक-यांनी घ्यावा.
                                   डॉ.सुभाष कालवे प्राचार्य,विवेकानंद कृषि महाविद्यालय

शेतक-यासाठी माती परिक्षण व तात्काळ रिपोट
विवेकानंद कृषी महाविद्यालयात दि. २३ मे ते २९ मे हा सप्ताह कर्मयोगी संत शुकदास महाराज माती परिक्षण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून  मोफत माती परिक्षण करून तात्काळ रिपोर्ट दिले जात आहे.


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा