शिबीरातून विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहे. प्रत्येकाला आवडीप्रमाणे कला जोपासण्याची संधी दिली जात आहे. हस्तकला,शिल्पकला,गीत,संगीत यांची ओळख करून दिली जात आहे. या कला जीवनाच्या परिपूर्णतेचे माध्यम आहे असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी विवेकानंद ज्ञानपीठात आयोजीत संस्कार शिबीरात बोलतांना व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते तर प्रमुख पाहूणे म्हणून सचिव संतोष गोरे उपस्थित होते.
पुढे बोलतांना गोरे म्हणाले की, सुगंध देणे हा फुलांचा गुणधर्म आहे काही काळ फुलणारे फुले हे वातावरणाला सुगंधी करून जातात. हसणा-या मुलाला जात, धर्म,वर्ण, पंथ याचे ज्ञान नसते त्याचे हसणे इतरांच्या दु:खाचा नाश करते. वाहणारी झरे माणसाची तहान भागवितात. तदवतच मानवी जीवन आहे. विद्यार्थी अवस्था ही जगण्यातील अत्यंत महत्वाची अवस्था झाली आहे. वाढती स्पर्धा पालकांच्या अपेक्षांचे ओझे,काळाच्या बरोबरीत स्वतःला सिध्द ठरविण्याचा खटाटोप यामुळे शिक्षणातून मिळणा-या आनंदाला आपण मुकत चाललेलो आहोत. ज्ञान हे केवळ पुस्तकातूनच मिळते असे नाही तर निसर्ग माणसाचा सर्वात मोठा गुरू असून फुलणारी फुले,हसणारी मुले,वाहणारे झरे हेच ज्ञानाचे व आनंदाचे खरे स्त्रोत आहेत आपण फुलासारखे फुलून इतरांना सुगंध देत राहावा आपल्या निरागस हास्याने इतरांच्या ह्रदयात घर करावे शिक्षणातून जगण्याचे भान निर्माण व्हावे व जगण्यावर प्रेम करण्याची वृत्ती निर्माण व्हावी. कारण ज्ञान हे सदा सर्वकाळ मनुष्याला प्रकाशाच्या मार्गावरून पुढे नेत राहते. माहिती आणि ज्ञान यात प्रचंड फरक असून माहितीचा साठा सुख आणि आनंद निर्माण करेल असे नाही याउलट ज्ञानाने सत चित्त आनंद स्वरूपाची प्राप्ती होवून मानवी जीवन सफल होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रांत राजपूत तर आभार प्रदर्शन प्राचार्य रवि लोखंडे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा