Responsive Ads Here

गुरुवार, २२ मार्च, २०१८

शुकदास महाराजांचे अस्तित्व चैतन्यरूपाने भक्तांमध्ये - स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती


कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज नावाचे साधू देहरूपाने जरी आज आपल्या सोबत नसले तरी चैतन्यरूपाने ते आपल्यामध्येच आहे. महाराजांचे जीवन अनुभूती संपन्न होतेपरमपुरूषार्थयुक्त होते कारण साधुत्व हा मानवजीवनाचा परमपुरूषार्थ असे भावपूर्ण विचार श्रीश्रीश्री १००८ हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज यांनी विवेकानंद आश्रमात संपन्न होत असलेल्या संत शुकदास महाराज संजीवन समाधी सोहळयानिमित्त आयोजित संगीत रामकथेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.२२) रोजी कथेला प्रारंभ करतांना केले.



दुपारी १२ वाजता त्यांचे विवेकानंद आश्रमात आगमन झाले. प्रवेशव्दारावर आश्रमाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. आश्रमस्थीत कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजांच्या समाधीचे दर्शन घेवून त्यांनी पूजन केले. याप्रसंगी प.पू.शुकदास महाराजांच्या स्मृतींनी सर्वांचाच कंठ दाटून आला व डोळयाच्या कडा पाणावल्या. कथा मंडपात ते विराजित झाल्यावर दादासाहेब मानघाले यांनी त्यांचे पुष्पहार घालून पूजन केले.
पुढे बोलतांना स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज म्हणाले की,साधु हा अंतर बाहय शुध्द असतो. त्याच्या अंतःकरणाची शुध्दता ह्रदयाची विशालता सर्वांना कवेत घेते. विकारमुक्तजड देहाच्या नैसर्गिक गुणधर्मांना पार करून उपाध्यांनी जखडून न जाता,साक्षीभावाने जीवनातील घटनांना सामोरे जाणारा साधु असतो. अखंड मानवकल्याणाच्या वार्ता करणारा साधु असतो. सत्पुरूषाच्या सत्कार्याने पुनित झालेल्या परिसरात आल्यानंतर मन प्रफुल्लीत होते. मानवी चिंतनाला स्वस्वरूपाच्या जाणिवेची ओढ निर्माण होते म्हणून तीर्थक्षेत्रे मानसाचे अंतरबाहय परिवर्तन घडवून आणू शकतात. ज्या ठिकाणी संतांचे अस्तित्व असते त्याठिकाणी दुर्जनातील खल प्रवृत्तीचा नाश होतो व त्याला त्याच्यातील दिव्यत्वाच्या शोधाचा मार्ग सापडतो. जीवांच्या कल्याणासाठी देह झिजविणारे परमेश्वराला प्रिय असतात त्यांच्यासाठी दुखीतांच्या सेवेतच खरा परमार्थ असतो. असेही विचार त्यांनी कथेतून व्यक्त केले. संगीत रामकथा वेळेवर सुरू होत असल्यामुळे भाविकांनी एक वाजेपूर्वीच कथामंडपात येवून बसावे व आज रात्री संपन्न होणारे हभप प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर पंढरपूर यांच्या कीर्तनाचाही लाभ घ्यावा असे आवाहन विवेकानंद आश्रमाच्या वतीने करण्यात आले.
भाविकांची निवास भोजन व्यवस्था
पहिल्या दिवशी कथेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी मंडप भरगच्च भरला होता. उत्कृष्ट संगीतसाथ व प्रभावी विवेचनाने श्रोते तृप्त झाले होते. कथेसाठी दुरदुरून येणा-या भाविकांची निवास भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा