माणसाच जगण अमूल्य आहे. जगण्यातल्या वास्तवापासून दूर गेल्याने आभासी जगाचे आकर्षण वाटू लागते. जगण्यात येणा-या समस्या सोडवतांना तोल न ढळू देता वास्तवाचे भान ठेवावे. कुठलाही चमत्कार आपल्या जगण्यातील गती कमी अधिक करू शकत नाही. शाश्वत मूल्यांचा अंगिकार केल्याने जगण्याला बळ मिळते. आभासी दुनियेतून बाहेर या, आयुष्याकडे डोळे उघडून बघायला शिका!असा मौलिक संदेश प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी दैनिक सकाळशी मंगळवारी (ता.५) मुलाखती दरम्यान दिला. दरम्यान अंतरिक प्रेरणा चिरंतन प्रवाहीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, संघर्ष करण्याची शक्ती ही निसर्गदत्त देणगी परमेश्वरांने प्रत्येकाला दिलेली आहे. आपल्यात असलेल्या प्रचंड उर्जेपुढे आपण करीत असलेला संघर्ष क्षुल्लक आहे. सतपुरूष माणसाच्या या दिव्यत्वाच्या प्रगटीकरण्याच्या प्रक्रीयेला वाट मोकळी करून देतात. कधीकाळी समस्येचा डोंगर खाद्यावर घेवून उध्दवस्त अवस्थेत जगणारी सिंधुताई सपकाळ हे सर्व सहन करू शकते याचा अर्थ प्रत्येकात ती शक्ती आहे. सिंधुताई आज भावनिक झालेल्या दिसल्या. अनेक वर्षापूर्वी मी या आश्रमात आले होते. माझे दुःख पाहून महाराजांचे डोळे पाणावले होते. अनेक निराधारांचा आधार बनू शकणारी तू अनेकांच्या जगण्यात आनंद पेरण्याचे सामर्थ्य असलेली तू खचुन न जाता संकटाशी सामना कर हे शुकदास महाराजांचे प्रेरणादायी विचार जगण्याची दिशाच बदलून गेले. कधीकाळी नकोशा झालेले जीवन आज कृतार्थ वाटते. आश्रमाच्या वृध्दाश्रमाला भेट दिली. उच्चशिक्षीतांची आई वडील तिथे राहतात परंतू कमी शिकलेला,साधा भोळा शेतकरी मात्र आजही आईवडीलांना स्वतःपासून दूर करत नाही. कोणते शिक्षण दिले आपण या उच्चशिक्षीतांना? काय दिले या उच्चशिक्षीतांना आपल्या शिक्षण पध्दतीने? माणूसपण जागविणारे शिक्षण कधी मिळणार आहे असेही पुढे बोलतांना सांगितले.
विवेकानंद आश्रम समाजाचे शक्तीस्थळ
विवेकानंद आश्रमासारख्या याच अर्थाने समाजाचे शक्तीस्थळ आहे. या परिसरात आल्याने मानवी संवेदनांना पाझर फुटतो. आपल्यात असलेल्या अलौकीक सामर्थ्याची जाणिव निर्माण होते व लक्षात येते की, त्याच्यात आणि माझ्यात काहीच अंतर शिल्लक नाही.
तरुणांमध्ये उर्जेचा प्रचंड स्त्रोत
तरूणांना मी हेच सांगेन मशाली पेटत्या ठेवा. अंधाराचे साम्राज्य केंव्हाही विस्तारू शकते. कणखरपणे उभे राहा. जीवनात संघर्ष करायला शिका. तुमच्यात सॉक्रेटीस,जिझस,बुध्द,विवेकानंद ,टागोर आहेत. विसरू नका तरुणांमध्ये उर्जेचा प्रचंड स्त्रोत आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
मो.९९२३२०९६५८७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा