Responsive Ads Here

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

’तुम्ही तानाजी ! मी शिवाजी !

‘तुम्ही तानाजी! मी शिवाजी!’ हे उद्गार विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष प.पू.शुकदास महाराजश्रींनी दि.13/12/1988 साली तोरणवाडा, ता.चिखली येथील कार्यक्रम प्रसंगी काढले होते. म्हणजे तब्बल 30 वर्षापूर्वी! 

तोरणवाडा या गावाला संत संगतीचा इतिहास आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेलं हे गाव. या गावामध्ये राष्ट्रसंत 1954 साली आले होते. त्यावेळी त्यांनी ‘गुरूदेव सेवा मंडळाची’ स्थापना केली. 1959 साली तुकडोजी महाराजांचे शुभहस्ते मंडळाचे शीलापूजन करण्यात आले होते. या गावामध्ये गुरूदेव सेवा मंडळाचे कार्य खुप छान पध्दतीने सुरू होते. कर्मयोगी शुकदास महाराजश्रींना विवेकानंद आश्रमाची स्थापना करावयाची होती. गुरूदेव सेवा मंडळाचं कार्य कसे चालते हे पाहण्यासाठी पू. महाराजश्रींनी तोरणवाड्याला जायचे ठरवले. उंद्री पर्यंत एस.टी. बसने प्रवास केला. तेथून 3 किमी महाराजश्री पायी गेले. गावात गेल्यानंतर पहिली भेट गरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष स्व.श्रीराम पाटलांशी झाली. पाटील महाराजश्रींशी परिचित होतेच. त्यावेळी निसर्गाचा व भौगोलीक परिस्थितीचा यथार्थ अभ्यास करून जमीनीच्या आत कुठे जलस्रोत आहे हे महाराजश्री तंतोतंत सांगत असत. म्हणून महाराजश्रींची ‘पाणी सांगणारे महाराज’ अशी प्रसिध्दी होती. श्रीराम पाटलांनी मंडळाची सर्व माहिती महाराजश्रींना दिली. त्यांतर तोरणवाडा गावाशी महाराजश्रींचा ऋणानुबंध कायम घट्ट झाला. श्रीराम पाटलांच्या शेतात विहीर कोठे खोदावी हेही महाराजश्रींनी सांगीतले होते. व त्या विहीरीला आजही बऱ्यापैकी पाणी आहे!

पुढे गावातील नरेश पाटील, संजय पाटील, ह.भ.प.मुरलीधर महाराज लांडे, कै.त्र्यंबक पाटील, हरीभाऊ लांडे, विष्णु पाटील ही सर्व मंडळी महाराजश्रींच्या व्यक्तिमत्वाने व सेवा कार्याने प्रभावित होऊन आश्रमाशी जोडल्या गेले. त्यांनी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या विधायक कार्याला पुरूषोत्तम पाटीलांनी सहकार्य करून त्यांचा उत्साह वाढविला.
 छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण सेवाव्रतींच्याच शुभहस्ते व्हावं असा आग्रह सर्व ग्रमस्थांचा व या सेवाभावी मंडळींचा होता. त्यासाठी पू. महाराजश्रींना निमंत्रित करावं असं ठरलं. आठवडाभर महाराजश्रींचा रूग्णसेवेचा कार्यक्रम व्यस्त असायचा. म्हणून महाराजश्री कुठेही बाहेरगावी कार्यक्रमासाठी जात नव्हते. परंतू प्रथमच महाराजश्रींनी होकार दिला. महाराजश्रींच्या सोबत स्व. आबासाहेब थोरहाते, पंढरीनाथ शेळके, नारायणराव भारस्कर, अशोकभाऊ थोरहाते ही मंडळी तोरणवाड्यासाठी रवाना झाली. पू. महाराजश्रींचा शुभहस्ते व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरन मोठ्या थाटात व मराठमोळ्या दिमाखात करण्यात आले. 
आजूबाजूच्या सर्व खेडेगावातून आलेल्या भाविकांनी महाराजश्रींना ऐकण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यावेळी प्रास्ताविक रा.ना.पवार उपाख्य भाऊसाहेब पवार यांनी केले. व्यासपीठावर त्यावेळचे सरपंच दयासागरजी महाले, नारायणराव आव्हाळे उपस्थित होते. 
त्यांतर पू .महाराजश्रींचे खुपच मार्मिक आशिर्वचन झाले. पू. महाराजश्री म्हणाले, *“तुम्ही ‘तानाजी’! मी शिवाजी!”* सर्व उपस्थितांना आश्चर्य वाटले. उत्सुकतेने सर्व ऐकत होते. महाराजश्री पुढे म्हणाले, *“तुम्ही ताणत जा, मी शिवत जातो! समाज सध्या ताणन्याच्या भूमिकेत वावरत आहे. परंतू मी मात्र शिवण्याचं काम करत राहील. समाजातील जातीयवाद, उच्च नीचतेच्या मनोवृत्तीमुळे ताणतणाव निर्माण होतात. मतभेद होतात. हे समाजाने बंद करावं. तसेच समाजातील सज्ञान प्रतिष्ठित मंडळींनी शिवाजींच्या भूमिकेत वावरावं. तणातणाव, जातीभेद निर्माण होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. गावातील तंटे गावातच मिटवावे. 
आपल्या लोकांना कोर्टकचेऱ्या परवडणाऱ्या नाहीत. भांडणे मिटली तर डोके शांत राहतील. घराकडे आणि शेतीकडे लक्ष देता येईल. कोर्टकचेऱ्यात लागणारा पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च करा. युवकांना व्यसनांपासून दूर ठेवा. गावागावात बंधुभाव निर्माण होऊन गावं आदर्श बनावीत यासाठी प्रयत्न करा. येवढं जरी केलं तरी आपण शिवाजी महाराजांच्या संस्कारांचे व विचारांचे खरे वारसदार आहोत असे आपल्याला स्वाभिमानाने सांगता येईल.”*
किती सोप्या शब्दांमध्ये प्रबोधन! आज ह्याच विचारांना कृतीत आणण्याची गरज आहे. आजही तोरणवाडा गावातील गावकरी पू.महाराजश्रींच्या आठवणी मोठ्या उत्साहाने भरभरून सांगतांना दिसतात.


आत्मानंद थोरहाते
विवेकानंद आश्रम
मो. 9767897309
(लेखक हे विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा