किसान सन्मान योजनेसाठी बळीराजाची लगबग !

शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. मेहकर तालुक्यात त्यांच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली असून त्याअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना प्रती शेतकरी कुटुंबाला वार्षिक ६००० रूपये इतके आर्थिक सहाय्य तीन टप्यात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मेहकरचे तहसिलदार संतोष काकडे यांनी दैनिक सकाळशी बोलतांना दिली.
दोन दिवसांमध्ये पात्र शेतकरी कुटूंबांच्या यादी तयार करण्यात येईल. सदर यादया तलाठी मुख्यालयी प्रसिध्द करण्यात येतील. पात्र शेतक-यांनी आवश्यक कागदपत्रांची यादी कृषी सहाय्यक किंवा  तलाठी यांचेकडे जमा करावी. योजनेअंतर्गत प्रत्येक गावनिहाय पात्र शेतक-यांची संगणीकृत यादी करण्यात येणार आहे. या योजनेत दोन हेक्टरपर्यंत शेती असणा-या अल्प व अत्यल्प शेतक-यांच्या बँकेतील खात्यामध्ये दरवर्षी ६००० रूपये जमा करण्यात येणार आहेत. यासाठी मेहकर तालुक्यातील अल्प व अत्यल्प शेतजमीन असणा-या शेतक-यांच्या यादया तयार करण्याच्या कामाला गती आली आहे. खातेदरांचे कुटूंबनिहाय वर्गीकरण केल्यांनतर ज्या कुटूंबाचे लागवडी योग्य एकूण धारण क्षेत्र दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटूंबाची यादी तयार करण्यात येणार आहे. सदर यादीत खातेदारांचे नाव,लिंग,जातीचा प्रवर्ग,आयएफसी कोडसह बँक खाते क्रमांक,आधार क्रमांक,मोबाईल नंबर इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे. मेहकर तालुक्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यासाठी प्रशासन सरसावल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने तहसीलदार संतोष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,तलाठी या कामाला लागले आहेत. सरकारच्या या योजनेचा लाभ पात्र शेतक-यांना देण्यासाठी महसूल विभाग,ग्रामविकास व कृषी विभाग  कामाला लागले असल्याची माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दैनिक सकाळशी बोलतांना सांगीतले.

यांना घेता येणार नाही लाभ 
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ आजी,माजी आमदार,मंत्री,माजी महापौर,आजी माजी जि.प.अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून, गतवर्षामध्ये आयकर भरलेल्या व्यक्ती,दहा हजार किंवा  त्यापेक्षा अधिक निवृत्तीधारक व्यक्ती,व्यावसायिक डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंट  अशा व्यक्तींना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेता येणार नाही.

दोन दिवसांमध्ये पात्र शेतकरी कुटूंबाच्या यादया तयार करण्यात येतील. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पात्र शेतकरी कुटूंबाच्या याद्या तलाठी मुख्यालयी प्रसिध्द करण्यात येतील. शेतक-यांनी आवश्यक कागदपत्रे कृषी सहाय्यक किंवा  तलाठी यांचेकडे जमा करावीत.
                                                                       संतोष काकडे,तहसीलदार मेहकर


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा