कांदा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव


 मेहकर तालुक्यातील अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहे. कांदा हे व्यापारी दृष्टया सर्वात महत्वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रमध्ये अंदाजे १.०० लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते.  कांदा हे पीक भाजी वर्गीय असून व्यापारी दृष्टया या पिकाला चांगले महत्व आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळच्या धुक्यामुळे फुलोरा अवस्थेत असलेल्या कांदा पिकाला इजा होवून उत्पादनात घट होवू शकते. सध्या मेहकर तालुक्यात कांदा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला  असून योग्य कीड नियंत्रण केल्यास फुलकिडीपासून कांदा पिकाचे होणारे नुकसान टाळून कांदा उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
कांदा पिकावर फुलकिडीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कांद्यामध्ये फुलकिडीची पिल्ले आणि प्रौढ किटक पानातील रस शोषून घेतात. पानांवर पांढरे ठिपके दिसतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वाळतात.

असे करा नियंत्रण
शेतकरी विशिष्ट प्रकारच्या किटक नाशकांची फवारणी करून यशस्वी बंदोबस्त करू शकतात. फुलकिडयांनी कांद्याच्या पानामधील रस शोषण केल्यामुळे क्लोरीफील चे प्रमाण कमी होऊन पाने पिवळट रंगाची होऊन कांदा उत्पादनात घट दिसून येते. शेतक-यांनी फेप्रोनिल १० मिली प्रती पंप, प्रोपॅकोनोझोल २० मिली प्रति पंप व ०-५२-३४ यांची खत पाणी मिश्र खताची फवारणी केल्यास फुलकिडीचे नियंत्रण शक्य होते.

असा आहे जीवनक्रम
फुलकिडे हे आकाराने लहान असून पूर्ण वाढलेली कीड सुमारे १ मिलीमिटर लांबीची असतात. हे कीड रंगाने पिवळसर तपकीर असून शरीरावर फुलीच्या आकाराचे गडछ चट्टे असतात. मांदी पानावर पांढ-या रंगाचे ५० ते ६० अंडी घालते. या किडीची जास्तीत जास्त संख्या फेबु्रवारी ते मार्च महिन्यात असते.

तालुका कृषी अधिकारी अनभिज्ञ
कांदा पिकावरील या  आजाराबाबत तालुका कृषी अधिका-यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तालुक्यातील कांदा पिकावरील फुलकीडीविषयी कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना देता आली नाही. कांदा पिकावरील असा आजार आपल्या निदर्शनास आला नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून किडीवरील नियंत्रण तर सोडा मात्र साधी याविषयी तालुका कृषी अधिका-यांना माहितीही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा