Responsive Ads Here

मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

तरूणांच्या बुध्दीमत्तेची,कौशल्याची आज देशाला गरज !



तरुणांच्या ठायी मोठ्या प्रमाणात शक्ती, सामर्थ्य आहे.  प्रत्येक देशातील तरूण हा देशाचा आत्मा आहे. तरूणांच्या मनगटातील ताकद,  बुद्धिमत्ता व कौशल्याने देशाचा सर्वांगीण विकास होतो. तरूण पिढी चारित्र्यसंपन्न, सदविवेकी, नीतीमूल्यांचे पालन करणारी, जेष्ठांचा आदर करणारी, नवीन आव्हाने व जबाबदारी आपल्या खांदावर घेण्यास समर्थ असेल तर देशाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. तरुणांनी थोर, महापुरूषांचे आदर्श ठेवावे. तरूणांच्या बुध्दीमत्तेची, कौशल्याची देशाला गरज असल्याचे मौलीक विचार समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी  सकाळशी  नुकताच मुलाखती दरम्यान व्यक्त केले. दरम्यान तरुण पिढी उर्जेचा मोठा स्त्रोत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सत्यपाल महाराज म्हणाले की, सत्यमेव जयते अर्थात सत्याचा नेहमीच विजय होतो. म्हणून सत्याची कास धरा. सत्याचे पालन करा. सत्य हे त्रिकालबाधीत असल्यामुळे सत्याचाच नेहमी विजय होतो. सत्याची वाट ही अनेकदा कठीण व संघर्षमय असते. सत्याचे पालन करतांना न डगमगता सत्याचा अंगीकार करा. सत्याचरण करणारी व्यक्तीच सामाजिक व्यवस्थेत बदल घडवून आणू शकते. तरूणांनी आपले ध्येयाप्रती नेहमी जागृक राहावे, आयुष्यात मोठे व्हावे परंतु त्यासोबतच आपले देशाप्रती असलेल्या कर्तव्याचा, सामाजिक दायित्वाचा विसर पडू देऊ नका. सत्यशोधक विचारांची देशाला गरज आहे. भारत मातेची आपण एक लेकरे आहोत, प्रत्येकाशी बंधूभावाने रहा. प्रत्येकाने आपल्या वाटयाला आलेले काम निष्ठेने व प्रामाणिकपणे केल्यास बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी,जिद्द ठेवा म्हणजे कोणत्याही क्षेत्रात यश मिळते. जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश ही सूत्र ओळखून तयारीला लागा. असेही पुढे बोलतांना सांगितले.

सोशल मिडीया नाही सोशल वर्कवर सक्रीय राहा.
सोशल मिडीया हे एक दुधारी शस्त्र आहे. सोशल मिडीयाचा वापर आपण कशाप्रकारे करतो यावर त्यांची उपयुक्तता अथवा तोटा अवलंबून असतो. सोशल मिडीयाचा अतिरेकी वापर तरूण पिढीकडून होत आहे. मौल्यवान असा वेळ तरूण पिढी सोशल मिडीयाच्या वापराकरीता खर्च करीत असल्यामुळे मोठे दुःख होते. तरूणांनी सोशल मिडीयावर सक्रीय राहण्यापेक्षा समाजिक उपक्रमामध्ये आपला वेळ कसा जास्तीजास्त देता येईल यावर लक्ष केंद्रित करावे.

युवाशक्ती उर्जेचा मोठा स्त्रोत
तरूण म्हणजे उर्जा, तरूण म्हणजे उत्साह, तरूणांच्या ठायी असलेल्या शक्तीचा विद्यायक कार्यासाठी वापर करता आल्यास देशात मोठया प्रमाणात बदल झाल्याशिवाय राहत नाही,फेसबुक,व्हॉटअ‍ॅप्स वर आपला अमूल्य वेळ वाया न घालवता त्या वेळेचा सदुपयोग करा.


संतोष श्रीथोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा