Responsive Ads Here

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

उन्हाच्या 'माझ्या' घरास, 'मेहनतीच्या' चार भिंती


माणसापासून ते पशू पक्षांपर्यंत प्रत्येकालाच घर हे हवेहवे से वाटते... घराची ऊब प्रत्येकाला भासते... घराच्या चार भिंतीमध्ये मिळणारे समाधान आणि शांती थकलेल्या, भागलेल्या जीवामध्ये चैतन्य, उर्जा, उत्साह भरण्यासाठी पुरेशे असते... घराच्या ऊबेला पोरक्या झालेल्या जीवालाच घराचे महत्व कळते... वादळ,वारा,ऊन व पाऊसापासून संरक्षण मिळण्याची हक्काची एकमेव जागा म्हणजे घर... माणूस घर बनविण्यासाठी जशी धडपड करतो त्याच प्रकारची घर बनविण्यासाठी प्रत्येक जीवाची धडपड असते...
आज काम करीत असतांना टकटक हा आवाज कानी पडला... काय आवाज येतोय म्हणून इकडे तिकडे पाहले तर नवलच? विवेकानंद आश्रमातील पामच्या झाडावर एक सुतारपक्षी आपल्या लांबलचक,धारदार आणि अणुकुचीदार चोचीच्या मदतीने पाम वृक्षावरती आघात करीत होतो. आपल्या चोचीने त्याने पाम वृक्षामध्ये एक मोठे डोल केले. तो गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दररोज सकाळ,दुपार व संध्याकाळी लक्ष्य विचलित न होता झाडावरती आपले घरटे बनविण्याच्या कामात मग्न आहे. .सुतार पक्ष्याची घर बनवितांना पाहलेली धडपड पाहिल्यानंतर एका कवीच्या कवितेच्या ओळी नकळत माझ्या ओठावरती आल्या.
उन्हाच्या माझ्या घरास,
मेहनतीच्या चार भिंती
घामाचा त्यास गिलावा
अन समाधानाची माती.
सुतार पक्ष्याची धारदार, लांबलचक चोच आणि डोक्यावरचा लालभडक तु-यामुळे तो सर्व पक्ष्यामध्ये आपले वेगळेपण जपतो. आज जगभरात यांच्या २०० हून अधिक उपजाती आढळतात.
सुतार पक्ष्यांची खासियत म्हणजे त्यांची लांबलचक, धारदार आणि अणुकुचीदार चोच. एखाद्या ओल्या अथवा सुक्या झाडाच्या खोडावर अतिशय वेगाने आघात करत, त्याला छिन्नीने कोरावे तसे कोरून आतली अळी किंवा किटक लिलया टिपून, ओढून बाहेर काढतात. हे करताना त्यांची विशीष्ट जीभसुद्धा त्यांना फार उपयोगाची ठरते.

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
श्रीनिवास विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा