Responsive Ads Here

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

अंबादेवी दर्शने नासती तूटती चिंता !


भारतीय संस्कृतीमध्ये शक्ती उपासनेला अनन्य साधारण असे महत्व आहे. भारतातील हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक स्थळांना खूप महत्त्व असते. प्रत्येक धार्मिक स्थळाचे एक वेगेळे वैशिष्टय आणि इतिहास असतो. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या धार्मिक स्थळांचे एक स्थान निर्माण झालेले असते.

लोक मोठ्या आशेने आणि श्रद्धेने या धार्मिक स्थळांवर जाऊन नतमस्तक होतात. विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांच्यामुळे अमरावतीच्या अंबादेवीच्या दर्शनाचा योग घडून आला. अंबादेवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती काळ्या रंगाच्या वाळूकेची असून अतिशय पुरातन आहे. या मंदिराचा संबंध रुक्मिणी हरणाशी जोडला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे सुध्दा इतिहासात नमूद आहे. भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होते, अशी श्रद्धा दर्शनार्थी व्यक्त करतात. अमरावती येथील अंबादेवीच्या मंदिराचे अस्तित्व हजार वर्षांपूवीपासून असल्याची अधिकृत नोंद आहे


हे मंदिर जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून आहे. मोगलांनी १५०० च्या कालखंडात -हाडावर आक्रमण करून कब्जा केल्यानंतर त्यांनी नगरांची लुटालूट, नासधूस केली. याठिकाणी अनेक हिंदू मंदिर सुध्दा उद्ध्वस्त केली. त्यामध्ये अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतरही आतील गाभारा अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली असावी. त्यानंतर १६६० च्या सुमारास श्री जनार्दन स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराच्या उभारणीत फार मोठे योगदान दिले.
मंदिर बांधकामात दक्षिण शिल्पकेलचा प्रभाव 
अंबादेवी मातेची मूर्ती काळया रंगाच्या वाळुका पाषाणाची असून मातेची पूर्णाकृती मूर्ती आहे. अंबादेवीच्या मंदिराच्या बांधकामात विशेषत्वाने दक्षिण शिल्पकेलचा मोठा प्रभाव दिसून येतो. अंबादेवीचा मुखवटा सुवर्णाने मढवलेला असून दागिन्यांमध्ये नथ, बिंदी,बाजूबंद,गळयात एकदाणी,कमरपट्टा,बांगडया आदींचा साज चढविलेला आहे. अंबादेवीच्या दर्शनासाठी देशभरातून विविध जाती,धर्म,पंथाचे लोक मंदिरात दर्शनाला येतात.



संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
'
श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा