Responsive Ads Here

मंगळवार, ९ एप्रिल, २०१९

आजपासून प.पू. शुकदास महाराज समाधी सोहळयास प्रारंभ !


                                 
विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या तृतीय समाधी सोहळयास  आज बुधवार ता.१० पासून प्रारंभ होत आहे. तर उद्या ता.११ पासून सुप्रसिध्द रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य संगीत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून समाधी सोहळयासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या गर्दीने विवेकानंद आश्रम फुलून गेला आहे.
गुरुवारपासून ही कथा रंगणार असून, १३ एप्रिलपर्यंत दररोज ११ ते २ व दुपारी साडेतीन ते साडेसहा वाजेदरम्यान ही संगीतमय कथा पार पडणार आहे. तालवाद्यांच्या स्वरात आणि ढोक महाराज यांच्या स्वर्गीय सुरात ही कथा ऐकण्याची पर्वणी भाविकांना तीनही दिवस लाभणार आहे. यासह दररोज ८ ते १० वाजेदरम्यान नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा पार पडणार आहे. त्यात १० एप्रिलरोजी हभप. कान्होबा महाराज देहूकर, ११ एप्रिलरोजी हभप. अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, १२ एप्रिल रोजी हभप. पांडुरंग महाराज गिरी-बावीकर तर १३ एप्रिल रोजी हभप. रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन होणार आहे.
दिनांक १३ एप्रिलला पू. शुकदास महाराज यांच्या समाधी सोहळ्याची सांगता होणार असून, यानिमित्त भव्य महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. तर याच दिवशी सायंकाळी वेदांताचार्य हभप. गजाननदादा शास्त्री यांचे प्रवचन पार पडणार असून, विवेकानंद विचारांच्या अभ्यासिका डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे. यासह दररोज सकाळी प्रार्थना व प्रवचन तर सकाळी ९ व दुपारी २ वाजता पसायदान प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली आहे.

स्वर्गीय आनंदात न्हाऊन निघणार विवेकानंद नगरी
दि १० एप्रिल पासून विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर संगीत श्रीराम कथेला सुरुवात होणार  असून, १३ एप्रिलपर्यंत दररोज ११ ते २  व दुपारी साडेतीन ते साडेसहा वाजेदरम्यान ही संगीतमय कथा पार पडणार आहे. तालवाद्यांच्या स्वरात आणि ढोक महाराज यांच्या स्वर्गीय सुरात ही कथा ऐकण्याची पर्वणी भाविकांना तीनही दिवस लाभणार आहे.

 श्रीराम कथेचे केले होते तोंड भरून कौतुक
देशभरात हिंदी भाषेतून श्रीराम कथा सादर केल्या जाते. पंरतु मराठी भाषेत सुरेल आवाजात श्रीराम कथा सांगणारे व प्रभू श्रीरामांच्या जीवनाचे निरुपण करणारे हभप. रामराव महाराज ढोक हे एकमेव कीर्तनकार तथा निरुपणकार आहेत. त्याबद्दल यापूर्वी २०१३च्या विवेकानंद जन्मोत्सवात त्यांनी सादर केलेल्या संगीतमय श्रीराम कथेनिमित्त पू. शुकदास महाराज यांनी तोंड भरून कौतुक केले होते.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा