जगाचे होणारे आधुनिकीकरण व त्यासोबत ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात होणारे झपाट्याने बदल यांचा फटका प्रत्येकाला सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवसे तापमानात होणा-या वाढीमुळे आता पशूपालकांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दृश्य मेहकर तालुक्यात दिसून येत आहे. उन्हाची दाहकता कमी न होता ती अधिकच तीव्र होत असल्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त होत आहे. मेहकर तालुक्यातील तापमान ४० अंशापेक्षा जास्त आहे. त्यामुळे संपूर्ण पशूधनपालक उष्णतेपासून पशूधनाच्या रक्षणासाठी जीवाचे रान करतांना दिसत आहे. त्यातच काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय शेतक-यासमोरील मोठे आव्हान ठरत आहे. दुपारच्या उष्ण झळापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी गोठयाच्या भोवताली तु-हाटयांचा कूड शेतकरी लावत असल्याचे दिसून येत आहे. जनावरांना सावली मिळावी म्हणून काही शेतकरी ग्रीन नेटचा वापर करीत आहे. उन्हाळयात जनावरांना साधारणपणे उष्माघात हा आजार होत असतो. उन्हाळयात तापमान ४० ते ४३ अंशांवर
गेल्यास जनावरांना उष्माघात होण्याची शक्यता असते. महाराष्ट्र ,विदर्भ,मराठवाडा व खांदेश या भागात उन्हाळयात हा आजार उदभवतो. महाराष्ट्रात दरवर्षी उष्माघाताने १० टक्के जनावरे दगावतात. शरीरातील तापमान १०५ फॅ-हेनाईटपेक्षा जास्त वाढून जनावरे चारापाणी बंद करतात.
अशी आहे उष्माघाताची लक्षणे
या रोगामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येतो. डोळे खोल जातात. तोंडास कोरड पडते. जनावर तोंड उघडे ठेवून जोरजोरात श्वास घेतात. त्यांना धाप लागते. नाडी जलद चालते. शरीराचे तापमान १०५ फॅ-हेनाईट अंश पुढे वाढते. जनावर एक टक लावून पाहतात. जनावरांच्या सर्व अंगास घाम फुटतो. त्वरित उपचार न केल्यास जनावर दगावते.
उन्हाळायच्या दिवसात गाई,म्ह्शी भर उन्हात बांधू नका. जनावरांना झाडाच्या सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यावे. जनावरांना भरपूर पाणी पिण्यास द्यावे. जनावरांच्या अंगावर बर्फाचे थंड पाणी शिंपडावे. शरीराचे तापमान हळूहळू उतरेल याची काळजी घ्यावी. त्वरीत पशूवैद्यकांचा सल्ला घ्यावा.
डॉ.सुनील देशमाने, पशुधन पर्यवेक्षक,विवेकानंद कृषि महाविद्यालय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा