कर्मयोगी प.पू.शुकदास महाराजांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरक,स्फूर्तीदायक,ओजस्वी विचारांपासून प्रेरणा घेवून बुलडाणा जिल्हयातील हिवरा बु या छोटयाशा निर्सगरम्य परंतु दुर्गम खेडयात १४ जानेवारी १९६५ रोजी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. विवेकानंदांच्या ओजस्वी विचांराना पुस्तका पुरते मर्यादित न ठेवता विवेकानंदांच्या विचारांना ख-या अर्थाने कृतीची जोड दिली. स्वामी विवेकानंदा प्रति दृढ निष्ठता,कर्तव्यपालनाची कठोरता आणि अखंड परिश्रमाची तयारी यातुन निर्माण झालेल्या इच्छाशक्तीच्या बळावर प.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमा स्थापना करून उजाड माळ रानावर विवेकानंद आश्रमाच्या रूपाने स्वर्ग निर्माण केला. जे का रंजले गांजले या महान तत्वाची प्रेरणा लाभलेले प.पू.शुकदास महाराज शेवट पर्यंत अनाथ,अपंग,गरीब रूग्णांसाठी चंदनाप्रमाणे झिजत राहिले.
प.पू.शुकदास महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षांपासूनच समाजसेवेचा वसा घेतला. स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी विचार वयाच्या १४ व्या वर्षीच प.पू.शुकदास महाराजांना उमगले आणि मानवसेवा हीच ईश्वर सेवा,तोच खरा धर्म व तेच खरे आध्यात्मीक जीवन, हे जीवनध्येय ठरविले. दारिद्र नारायणाची सेवा हीच खरी परमेश्वराची पुजा हा विचार शुकदास महाराजांच्या जीवन कार्याचा आधार बनला.
ज्या मी देवाचा आहे उपासक। करूनी ओळख देतो त्याची।।
या इकडे तुम्ही पहा तो नयनी। नटला रूपानी दुःखीतांच्या।।
गरीब अनाथ अपंग दलित। तोचि हा पतीत झाला अज्ञ।।
शुकदास म्हणे हेचि माझे देव ।अर्पिला मी जीव त्यांच्यासाठी ।।
विवेकानंद आश्रमाचे मानवाच्या जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करणारे विविध सेवाभावी उपक्रम व सेवा कार्य आखिल समाजोन्नतीसाठी आहे.
भौतिक विकास हा अध्यात्माच्या पायावर उभा करून भूतलावर स्वर्ग कसा निर्माण होऊ शकते हे प.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाचे माध्यमातून समाजाला दाखवून दिली. विवेकानंद आश्रम हे असे एक तीर्थस्थळ आहे की, जिथे माणसाच्या मनाचा मळ धुतला जावून त्याचा विवेक जागृत होतो. धर्म,पंथ,भेद विसरायला लावणारा विवेकानंद आश्रमाचा परिसर मनाला भावणारा आहे. जणूकाही विवेकानंद आश्रम ही सामाजिक विकासाची प्रयोगशाला तसेच धर्माचे यर्थाथरूप स्पष्ट करणारी धर्म शाळा आहे. तीर्थक्षेत्र म्हणून विवेकानंद आश्रमाच्या हरिहर तीर्थक्षेत्रास विवेकाची किनार आहे. हरिहर तीर्थक्षेत्रावरील भगवान बालाजी व भगवान शिव हि दोन्ही मंदिरे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. विवेकानंद आश्रम म्हणजे विज्ञान आणि अध्यात्माचा सुरेख संगम आहे. विवेकानंद आश्रम म्हणजे मानवसेवेचा दिपस्तंभ होय.
आश्रमाचे ग्रामीण भागातील आरोग्य कार्य उल्लेखनीय
प.पू.शुकदास महाराजांनी सव्वा कोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त केले आहे.शनिवार,रविवार व सोमवार या तिन दिवशी हिवरा आश्रम येथे धर्माध रूग्णचिकित्सा सुरू असते. राज्याच्या कान्याकोपयातून हजारो रूग्ण विवेकानंद आश्रम येथे वैद्यकीय उपचारासाठी येवून व्याधीमुक्ततेचा आनंद घेतात. विवेकानंद आश्रम व्दारे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य समस्या दूर होण्याच्या दृष्टीने विविध भव्य आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात येते. या आरोग्य शिबीरामध्ये नामवंत डॉक्टर्स आपल्या सेवा देतात.आरोग्य शिबीरात गरजू,गरीब रूग्णांना मोफत औषधींचे वाटप केले जाते. गरीब रूग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेचा खर्च विवेकानंद आश्रम उचलते.विवेकानंद आश्रम व्दारा आयोजित आरोग्य शिबीराचा दरवर्षी सुमारे दहा हजार ते पंधरा हजार रूग्ण बांधव लाभ घेतात.
ग्रामीण रूग्णालयाचा ४० खेड्यांना होईल लाभ
प.पू.शुकदास महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत रूग्णसेवेला प्राधान्य दिले. प.पू.शुकदास महाराजांनी सव्वा कोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. प.पू.शुकदास महाराजांच्या आरोग्य सेवेची दखल घेत महाराष्ट्र शासनाने हिवराआश्रम येथे विशेष बाब म्हणून ग्रामीण रूग्णालयास मंजूरी दिली. हिवरा आश्रम येथे ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगती पथावर असून लवकरच हे ग्रामीण रूग्णालय जनतेच्या सेवेसाठी सुरू होईल. ग्रामीण रूग्णालयांसाठी विवेकानंद आश्रमाने चार कोटी रूपये किंमतीची जागा उपलब्ध करून दिली असून हया ग्रामीण रूग्णालयाच्या लाभ जवळपास चाळीस ते पन्नास खेडयातील रूग्ण बांधवांना होणार आहे.
विवेकानंद आश्रमाचे शैक्षणिक कार्य
बोध आणि शोध म्हणजे शिक्षण होय असे शिक्षणाबाबत शुकदास महाराजांचे विचार विद्याथ्र्यांच्या जिज्ञासा,शोध वृत्तीला चालना देण्यासाठी प्रेरक ठरतात. शिक्षण हा विकासाचा पाया आहे. ग्रामीण भागातील होतकरू,गरीब,हुशार विद्याथ्र्यांना कमी दरात शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी विवेकानंद आश्रम व्दारे विवेकानंद ज्ञानपीठ, विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,निवासी अपंग विद्यालय,निवासी कर्णबधिर विद्यालय,विवेकानदं विज्ञान महाविद्यालय,कृषी महाविद्यालय,कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय,नामांकित मुलांची इंग्रजी शाळा सुरू करण्यात आली आहे. विवेकानंद आश्रमाच्या वसतिगृहात सुमारे पाच ते हजार मुले मुली निवासी आहे. विद्यार्थ्यांच्या मनात संस्काराची बीजे अंकुरीत होवून देशाला चारित्र्यसंपन्न युवक तयार करण्याचे काम आश्रमाच्या शैक्षणिक संस्थेतून होत आहे.
कृषी कार्य शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी
भारत हा कृषी प्रधान देश आहे. विवेकानंद आश्रम व्दारे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होण्यासाठी विविध कृषी उपक्रम राबविले जातात. यामध्ये पशुसंवर्धन, दुध चारा विकास प्रकल्प, गांडुळ खत निर्मिती प्रकल्प,विज्ञान शेती, कृषी मेळाव्यांचे आयोजन, कृषीप्रदशने, कृषी चर्चासत्रे मोठया प्रमाणात राबविले जातात.
विवेकानंद आश्रमाचे सामाजिक कार्य
वृध्द, निराधार व्यक्तींना मायेची उब मिळावी, त्यांना सन्मानाने, ताठ मानेने जगता यावे यासाठी विवेकानंद आश्रम व्दारे वानप्रस्थाश्रम चालविले जाते. समाजातील अंधश्रध्दा,हुंडाप्रथा निर्मुलन करण्यासाठी महाविद्यालयाचे विद्याथी पथनाटयाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करीत असतात. याशिवाय साक्षरता,पर्यावरण रक्षण, संवर्धन, वृक्षारोपन इत्यांदी उपक्रम विवेकानंद आश्रमाव्दारे राबविले जातात.
विवेकानंद जयंती व भव्य महाप्रसाद
विवेकानंद आश्रमामध्ये पौष वद्य पंचमी ते सप्तमी या दरम्यान विवेकानंदांचा जन्मोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. तीन दिवस चालणा-या या महोत्सवामध्ये नामवंत कीर्तनकार , प्रवचनकार, व्याख्याते, गायक यांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. शेवटच्या दिवशी देशभरात आलेल्या सुमारे तीन ते चार लाख भाविकांना चाळीस एकराच्या शेतात अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने गव्हाची पुरी, वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येतो.
संतोष थोरहाते
"श्रीनिवास" विवेकानंद नगर हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा