हिवरा आश्रम
येथे २५ ते २७ जानेवारी दरम्यान आयोजित विवेकानंद जयंती महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात
झाली असून, सुमारे दोन लाख भाविकांच्या स्वागतासाठी विवेकानंद नगरी सज्ज झाली आहे.
तीनही दिवस यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
शेवटच्या
दिवशी ४० एकराच्या विस्तीर्ण शेतात २०० क्विंटल गहूपुरी व १०० क्विंटल वांगेभाजी यांच्या
महाप्रसादाचा वेत ठेवण्यात आलेला आहे. हा महाप्रसाद चवीसाठी राज्यभर प्रसिद्ध आहे.
विवेकानंद
आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे व विश्वस्त
मंडळाच्या नेतृत्वात विवेकानंद जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, जन्मोत्सवाच्या
नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळ महोत्सवाचे चोख
नियोजन करत असून, आश्रमाच्या मुख्य विचारपीठासमोर १६ हजार चौरस फूटाचा मंडप टाकण्याचे
काम वेगात सुरु आहे. या मंडपात विविध कार्यक्रमांचा लाभ राज्यभरातून आलेल्या भाविकांना
घेता येणार आहे. तीनही दिवस आश्रमातील विचारपीठावरून ज्ञानयज्ञ सुरु राहणार असून, नामवंत
कीर्तनकार, प्रवचन व व्याख्यानकार आपली सेवा देणार आहे.
तीन दिवसांच्या
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमानंतर २७ जानेवारी रोजी भव्य महापंगतीने या महोत्सवाची
सांगता होणार आहे. त्यासाठी २०० क्विंटल गव्हाच्या पिठापासून बनविलेल्या पु-या, १००
क्विंटल वांग्यापासून बनविलेली भाजी यांचा बेत ठेवण्यात आलेला आहे. पुरी-भाजीचा हा
महाप्रसाद आपल्या अनोख्या चवीसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. तब्बल दोन लाख भाविक या
महाप्रसादाचा लाभ घेणार असून, दोन रांगांमधून १०० ट्रॅक्टरद्वारे आणि तीन हजार स्वयंसेवकांच्या
मदतीने या महाप्रसादाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष
अशोक थोरहाते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
विवेकानंद
जन्मोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण
गतवर्षीप्रमाणे
याहीवर्षी विवेकानंद जन्मोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण यूट्युबवरील विवेकानंद आश्रम चॅनलसह
फेसबुक, ट्वीटर आणि विवेकानंद आश्रमाच्या विवेकानंद आश्रम डॉट कॉम या वेबसाईटद्वारे
केले जाणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. त्यासाठी
आश्रमाच्या मीडिया व पब्लिक रिलेशन विभागाच्यावतीने जोरदार तांत्रिक तयारी करण्यात
आली आहे. गतवर्षी झालेल्या महोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण जगभर पाहिले गेले होते. तसेच
सव्वालाखापेक्षा जास्त दर्शक मिळाले होते. यावर्षी ही संख्या निश्चितच जास्त असेल,
असा विश्वासही सचिव संतोष गोरे यांनी व्यक्त केला आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा