जग हे ज्ञानामुळे
समृद्ध झाले आहे. ज्ञानामुळेच जीव मुक्तीची प्राप्ती करू शकतो. विज्ञानाची प्रगती आणि
मानवमुक्तीची उच्चावस्थाही ज्ञानातूनच साध्य होऊ शकली. म्हणून ज्ञानापेक्षा जगात काहीही
श्रेष्ठ नाही, असे प्रतिपादन वेदाताचार्य हभप. गजाननदादा शास्त्री यांनी केले. शुक्रवारी
विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त आपल्या व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफताना गजाननदादा
बोलत होते.
आपल्या रसाळ
व मंत्रमुग्ध करणाèया व्याख्यानात गजाननदादा शास्त्री म्हणाले, जगाने भौतिक प्रगतीची
शिखरे गाठली असल्याचे आजकाल दिसत आहे. ही प्रगती व सर्व शोध ज्ञानामुळेच लागले आहेत.
ज्ञानामुळे मानवी जीवन जसे सुखाचे झाले, तसेच ज्ञानामुळेच त्याला ईश्वराचा शोध लागला.
ईश्वराच्या शोधात गेलेल्या मानवाला ज्ञान हे अंतरंगात असल्याचे जाणवले, बुद्धी हे ज्ञानाचे
वाहक आहे. जीवाला मुक्तीचा मार्ग ज्ञानामुळेच गवसला. जे ज्ञान मुक्ती प्रदान करते,
तेच ज्ञान शाश्वत सत्य. तर जे ज्ञान मनुष्याला भौतिक सुखाची चटक लावते, ते ज्ञान विषासम
आहे. पू. शुकदास महाराज यांनी दुःखाने ग्रस्त जीवांना आपल्या वैद्यकीय ज्ञानामुळे व्याधीमुक्त
केले तसेच त्यांनी आपले उच्चकोटीचे अध्यात्मिक ज्ञान सर्वसामान्यांना देऊन या जीवांना
मोक्षाचे धनीही बनविले, असेही गजाननदादा यांनी सांगितले.
संत तुकाराम,
संत ज्ञानेश्वर यांनी विश्वाला ज्ञान दिले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानाशिवाय
पर्याय नाही, म्हणून ज्ञान हे श्रेष्ठ आहे. ज्ञानातून देवदेखील प्राप्त होतो, म्हणून
ज्ञानाची कास धरा, असे सांगून गजाननदादा शास्त्री यांनी सांगितले, की संत हे प्रेमाचा
सतत वाहणारे निर्झर आहेत. त्यांनी जगाला ज्ञान तर दिलेच, तद्वतच भरपूर प्रेमही दिले.
ज्ञान हे श्रेष्ठ आहेच परंतु प्रेम हे ज्ञानापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. भक्ती, ज्ञान,
कर्म या योगाद्वारे ईश्वरापर्यंत पोहोचता येते. त्यातील ज्ञानयोग हा शाश्वत योग आहे,
असेही हभप. गजाननदादा यांनी सांगितले.
पू. शुकदास
महाराज यांच्या अनुभूति ग्रंथासह ज्ञानेश्वरांच्या ओव्या व तुकोबांच्या अभंगांचे मधुर
गायन व बोलीभाषेतील जात्यावरील ओव्यांच्या गायनाने उपस्थित रसिकश्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध
झाले होते.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा