पुस्तक वाचा, ज्ञान संपादन करा, गतीमान व्हा व ध्येयाप्रर्यंत पोहचा

पुस्तक हे ज्ञान प्रसाराचे अध्ययन, अध्यापनाचे ,विचार प्रसाराचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. मुद्रण कला विकसीत होण्याच्या अगोदर एखादा विचार, ओवी, कवीता, श्लोक यांना कंठस्त करण्याची पध्दती होती. परंतु ज्यावेळेला विचार, संकल्पना यांची मांडणी पुस्तक रूपाने सुरू झाली अगदी तेंव्हा पासून ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खुली झाली. काहीकाळ वाचनाची आवड ही परमोच्च बिंदूवर होती परंतु आज वाचन कला ही शेवटची घटका मोजत असून ज्या दिवशी हातातील पुस्तकाची जागा यंत्र घेईल. त्‍यादिवशी जगातील एका मोठया आनंदाला व सुखाला आपण गमावून बसू. पुस्तक वाचनातून मिळणारा आनंद हा नवविचारांचा स्पर्श झाल्याची अनुभूती देतो असे मत वाचन चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या  सौ. सुनिता गोरे यांनी दैनिक सकाळशी संवाद साधतांना व्यक्त केले. हल्ली  वाचनालयाकडे  कोणाचे पाऊले वळतांना दिसत नाहीत. पुस्तक विकत घेवून वाचावे व संग्रही ठेवावे अशी धारणा असणारे वाचकही पुढच्या पिढीला पाहावयास मिळतील का ? दरवर्षी बंद पडणाऱ्या प्रकाशन संस्था, छापली जाणारी पुस्तके व ग्रंथे कमी होत आहेत. त्‍यामुळे हे वैचारीक दारीद्रय विकसीत भारतात पाहायला मिळणार आहे का? असेल तर ते दुर्दैव आहे. प्रत्‍येकाच्या घरात छोटशी लायब्ररी असणे त्‍याच्या बौध्दीक व वैचारिक संपन्नतेचे लक्षण आहे. एखाद्या बापाने मुलाच्या वाढदिवसाला पुस्तके भेट द्यावी. मित्र, मैत्रीणीला ग्रंथ गिफ्ट करावी तरच वाचनाची चळवळ गतीशील राहील. माझ्या घरात माझे स्वर्गीय सासरे टी.टी.गोरे यांनी जमा केलेली पुस्तके आहेत. आज त्‍यात भर घालून छोटशी लायब्ररी मी निर्माण करू शकले. विवेकानंद चरित्र, श्यामची आई, बटाटयाची चाळ यासारखी अनेक पुस्तके वाचून काढली. आज जागतिक पुस्तक दिन आहे आजपासूच सुरूवात करू या. संकल्प करू सिद्धीस नेऊ. सकाळच्या या आवाहनास भरभरून प्रतिसाद मिळेल व  वाचन चळवळ समृध्द होईल अशी अपेक्षा आहे.

 

सकाळ समूह सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था

सकाळ समूहासारखी वाचन संस्कृतीस चालना देणारी सामाजिक बांधिलकी जोपासणारी संस्था त्‍यादृष्टीने काम करीत आहे. सकाळने मराठी माणसाचे वैचारीक भरण पोषण केले याचा आनंद होतो.

 

सुनिता गोरे यांच्या कपाटात १२०० पुस्तके

सौ. सुनिता  गोरे यांच्या कपाटात १२०० पेक्षा अधिक पुस्तकांची संख्या आहे. त्‍यात महापुरूषांची चरित्रे ,विवेकानंदांचे सम्रग खंड, बालसाहित्‍य उपलब्ध आहे. ग्रामीण भागात वाचन चळवळ वृध्दींगत होण्यासाठी त्‍या प्रयत्‍नशील असतात. 


शेती मशागतीच्या दरातील वाढीमुळे बळीराजा मेटाकुटीला



पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीचा शेती मशागतीच्या कामांना फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शेती मशागतीचे कामे करण्यासाठी शेतकऱ्याला अधिक पैसे मोजावे लागत आहे. त्‍यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. सद्या हिवरा आश्रम परिसरातील शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. शेतात नांगरीणी, वखरणी, पंची, रोटाव्हेटर इत्यादी कामे करण्यात येत आहे. दिवसें दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शेती मशागतीच्या कामावर होत आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्याने यावर्षी बळीराजाचे शेतमशागतीची गणित चांगले महागले आहे. हिवरा आश्रम परिसरातील बहुतांश शेतकरी आधुनिक यंत्राच्या साह्याने शेती मशागतीचे कामे करण्यास प्राधान्य देतात. इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे यावर्षी नांगरणी,वखरणी या शेती मशागतीच्या कामासाठी अधिक दर मोजावे लागत आहे. पूर्वी शेतकरी शेती मशागतीची कामे पशूधनाच्या मदतीने करत होता. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती मशागतीचे कामे करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आता शेतकरी नांगरणी,वखरणी,पेरणी इत्यादी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने कामे करण्याला पसंती दर्शवितो. प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर नसला तरी भाडयाच्या ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीची कामे केल्या जातात. मात्र पेट्रोल,डिझेलच्या दरात मोठया प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्‍याचा फटका शेती क्षेत्राला बसला. इंधनाचे दर गगनाला भिडले. त्‍यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे. त्‍यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेती मशागतीच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा आर्थिक भार शेतकऱ्यावर पडत पडून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी अगोदरच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित डबघार्इला आले. आहे. आता मशागतीचे दरात वाढ झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आल्याचे दिसून येत आहे.


शेती मशागतीच्या दरात वाढ

यापूर्वी नांगरणीसाठी एका घंटयासाठी  500 रूपये होते त्यासाठी आता 700 रुपये मोजावे लागतात. रोटाव्हेटरला यापूर्वी ८00 रूपये लागत होत मात्र इंधन दरवाढीमुळे रोटाव्हेटरसाठी १००० मोजावे लागतात तर पंजीसाठी मागच्या वर्षी 500 रूपये लागत होत त्यासाठी आता ७00 रूपये लागत आहेत.

आधी लगीन लोकशाहीचं ! मंडपात जाण्यापूर्वी नवरी - नवरदेव मतदान केंद्रावर


देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. आज देशातील 12 राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. दरम्यान सध्या लग्नसराई देखील सुरू आहे. मात्र लग्नाच्या घाईत नवरा-नवरी आवर्जुन मतदानासाठी केंद्रावर हजर राहत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. देशात लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येकाने घराबाहेर पडावे आणि मतदान करावे असा संदेश वारंवार अनेकांकडून दिला जातो. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्‍येकाने मतदान केले पाहिजेत. मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचे हात बळकत होतात. मतदाना बाबत अजून सुध्दा पाहिजे तेवढया प्रमाणात जागृती झाली नाही.लोकशाहीने प्रत्‍येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी ता. २६ रोजी पार पडले. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्त्री,पुरूष,जेष्ठांनी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.बोहल्यावर चढयाआधीच नवरदेव नवरीने सुध्दा आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र दिसून आले. मेहकर तालुक्यातील ब्रह्मपूरी येथील माजी पंचायत समिती सदस्य गजाननदादा पाटील यांचे चिरंजीव अक्षय गजानन म्हस्के या नवरदेवाने सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. नवरदेव अक्षय म्हस्के यांची होणारी अर्धांगिनी वर्दडा येथील डिगांबर आसाबे यांची कन्या चि.सौ.कां.तेजल डिगांबर आसाबे हीने सुध्दा सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला  हिवरा आश्रम परिसरात सुध्दा सकाळपासून मतदान करण्यासाठी नागरीकांचा मोठा उत्‍साह दिसून आला. 

विवेकानंद कृषि महाविद्यालय देशभक्तीच्या घोषवाक्यांनी दुमदुमले !


 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य प्राप्त होवून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव आहे. यानिनित्ताने शासनामार्फत हर घर तिरंगा अभियान १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविल्या जात आहे.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तहर घर तिरंगाया उपक्रमांतर्गत येथील निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने  प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा यासाठी शनिवारी ता.१३ रोजी हर घर तिरंगा जनजागृती अभियान रॅली आयोजन करण्यात आले होते . विवेकानंद कृषि महाविद्यालय परिसरात सकाळी ७.३० वाजता विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर  विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा जनजागृती रॅली काढली. या रॅलीत विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थी,विद्यार्थीनींनी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. यावेळी रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत गावामध्ये हर घर तिरंगा अभियानाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली. यावेळी घर हर मे तिरंगा हर मन तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम,जय जवान जय किसान, चला घरोघरी तिरंगा फडकू स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव मोठया अभिमानाने,हर्ष आणि उल्हासाने सर्व मिळुन साजरा करू या, तिरंगा आपला भारतीय ध्वज उंच उंच फडकवू चला देशासाठी लढुन याची आणखी शान वाढवूच्या घोषणांनी  हिवरा आश्रम परिसर दुमदुमून गेला होता. विविध ठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी देशभक्तीच्या घोषवाक्यांनी परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. रॅलीमध्ये शैक्षणिक विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवसाय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मंगेश जकाते.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुशिल दळवी,कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रतिक उगले यांच्यासह दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.  

विवेकानंद आश्रमात आदिवासी दिन उत्साहात

दरवर्षी विवेकानंद आश्रमात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी मंळवारी (ता. ९ ) रोजी आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद आश्रमात विविध जाती धर्माचे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुणवत्तायुक्त शिक्षण, स्वावलंबी जीवन, निसर्गरम्य व धर्माष्ठित परिसर यामुळे येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. विवेकानंद ज्ञानपीठाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.शाम ठोंबरे हे होते. सुरूवातीला परिसर स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा या प्रसंगी आयोजित करण्यात आल्या. सायंकाळी व्यासपीठावर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते करण्या आले. आदिवासी समाज हा या देशाचा मुळ निवासी असून जल,जमीन आणि जंगल या घटकांचे रक्षण करत आहेत. आदिवासींचे सांस्कृतिक परंपरा अत्यंत समृध्द असून राष्ट्रभक्ती ही या समाजाचे गुणधर्म आहे. इंग्रजा विरूध्द लढतांना या समाजाने बिरसा मुंडा सारखे थोर क्रांतीकारक या देशाला दिले. आज या समाजातील विद्यार्थी आधुनिक शिक्षण घेवून जगाशी स्पर्धा करण्यात समर्थ आहेत असे विचार डॉ.शाम ठोंबरे यांनी काढले. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी आपल्या सेवा कार्याची सुरूवात आदिवासींच्या जंगल्यातील वाडी वस्त्यांवर जाऊन केली. त्यांना आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांचे पुरताता करण्यासाठी प्रयत्न केले. अनेक आदिवासी गावे विवेकानंद आश्रमाने विकासासाठी दत्तक घेतली,आज त्या गावाचा मोठया प्रमाणात परिवर्तन दिसून येत आहे ही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आदिवासींचे नृत्य,त्यांची कला तसेच बिरसा मुंडा यांच्या जीवनावर समायोचित भाषणे केली. कार्यक्रमासाठी डॉ. दिपक जामकर, विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर, विद्या मंदिराचे प्राचार्य आर. डी. पवार, विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या प्रणिता गिऱ्हे होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विक्रांत राजपूत यांनी केले. कार्यक्रमासाठी विवेकानंद ज्ञानपीठचे व वसतिगृहातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.