देऊळगाव माळीच्या पिता पुत्रांनी फुलविली गुलाब शेती




पारंपारीक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडून ग्रामीण भागातील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असल्याचे विद्यायक चित्र दिसून येत आहे. जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची तयारी ठेवल्या अपारंपारीक शेती सुध्दा यशस्वीपणे करता येते. याचाच प्रत्यय  मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील व्यवसायाने कुंभार असलेल्या अल्पभूधारक शेतकरी हरिभाऊ राजाराम राऊत यांनी दाखवून दिले आहे. दिवसेंदिवस निसर्गाच्या अवकृपेचा फटका शेतक-याला सहन करावा लागत असतांना मात्र या बिकट परिस्थितीत सुध्दा न डगमगता घामाच्या धारांनी व कष्टांनी हरिभाऊ राऊत व कैलास राऊत या पिता पुत्रांनी गेल्या चार ते पाच वर्षापासून गुलाबशेतीत आपले पाय भक्कमपणे रोवत ही शेती यशस्वी केली आहे. पाण्यासोबत संघर्ष करीत गुलाबासह शेवंती,निशीगंध,मोगरा,झेंडू आदी फुलांच्या उत्पादनातून त्यांनी कुटूंबाची आर्थिक प्रगती साधली आहे.
हरिभाऊ राऊत यांनी  ३० गुंठयात गुलाबाची लागवड केली. आधुनिक पद्धतीने त्यांनी ही गुलाबाची शेती फुलवली आहे. नियोजनबद्ध मशागत आणि आधुनिक पद्धतीची लागवड यामुळे दर्जेदार गुलाबाचे पीक त्यांना मिळत आहे. शेतात पाण्याची सोय नसल्यामुळे ३५ लीटरच्या दोन कॅनानी दीड किलो मीटर वरून पाणी आणून झाडाना पाणी दिले. याशिवाय २०० मातीची मडकी व सलाईव्दारे गुलाबाच्या झाडाखाली ठेवून शेतातील गुलाबशेतीला ठिबकच्या माध्यातून संजीवनी दिली. आपल्या शेतातील फुलांची किरकोळ विक्री मेहकर,साखरखेर्डा,लोणार,जानेफळ,रिसोड येथील फुलभांडार विक्रेत्यांना करतात. हरीभाऊ राऊत यांना पत्नी शांताबाई राऊत,मुलगा कैलास राऊत शेतीमध्ये मदत करतात. हरिभाऊ राऊत यांना गुलाब शेती व फुलशेतीतून वर्षाला ८० ते ९० हजार रूपायाचे उत्पन्न मिळते. हरीभाऊ राऊत यांना मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट मुर्तीकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

गुलाबजल निर्मितीचा मानस
हरीभाऊ राऊत येणा-या काही वर्षात तीन एकरात गुलाशेती करणार आहेत. ग्रामीण भागात पहिला गुलाबजल निर्मीती करण्याचा त्यांचा मानस आहे. या गुलाबजल निर्र्र्मितीतून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल.

सद्या एका फुलाला एक रुपयाचा बाजारभाव मिळत आहे. दररोज दोन ते अडीच हजारांचे उत्पन्न मिळत आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांनी फुलशेतीकडे वळल्यास आर्थिक उन्नती साधता येते.
हरीभाऊ राजाराम राऊत देऊळगांव माळी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा