तुम्ही मुली जगवा, मी त्यांना
शिक्षण देतो, परंतु त्यांना गर्भात मारू नका, असे आवाहन करत स्त्रीभ्रूणहत्येला कडाडून
विरोध करणारे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांनी लोकवर्गणी व स्वतः रुग्णसेवेच्या
पैशातून निर्माण केलेल्या भव्य शारदामाता गर्ल्स होस्टेलच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण
झाले असून, लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या इमारतीचे लोकार्पण अपेक्षित
आहे. या इमारतीसाठी साडेचार कोटी रुपये खर्च आला असून, अत्यल्पदरात गोरगरिबांच्या मुली
या होस्टेलमध्ये राहून आपले शिक्षणाचे स्वप्न साकार करू शकणार आहेत.
खेड्यापाड्यांतील मुलींना शिक्षणाची
सोय नसल्याने या मुली दहावी-बारावीनंतर उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांना उच्चशिक्षणासाठी
शहरी भागात जावे लागते व शहरात त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही पालकांना सतावत होता.
त्यामुळे खेड्यापाड्यांतील पालकांनी आमच्या मुलींच्या शिक्षण व राहण्याची सोय विवेकानंद
आश्रमात करा, अशी विनंती प.पू. शुकदास महाराजांना केली होती. पालकांच्या आग्रहास्ताव
महाराजश्रींनी आपले हजारो कार्यकर्ते लोकवर्गणीसाठी खेडोपाडी पाठवून शारदामाता गल्र्स
होस्टेलचा प्रकल्प हाती घेतला होता. समाजात विलक्षण वाढलेले स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण
पाहून कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज हे प्रचंड व्यथित झाले होते. त्यामुळे त्यांनी
हिवरा आश्रम येथेच आध्यात्मिक व भयमुक्त वातावरणात गोरगरिबांच्या मुलींना शिक्षण घेता
यावे यासाठी भव्य गर्ल्स होस्टेल उभारण्याचा निर्णय घेतला होता.
गर्ल्स होस्टेलची अद्यावत इमारत
गर्ल्स होस्टेलची अद्ययावत इमारत
असून तब्बल चारमजली आहे.गर्ल्स होस्टेल हे
९६ खोल्याचे आहे. विशेष बाब म्हणजे, या इमारतीचे भूमीपूजनही महाराजश्रींनी मुलींच्याच
हस्ते करवून घेतले होते. एकूण चार मजले असलेल्या या इमारतीत प्रत्येक मजल्यावर २४ खोल्या
आहेत. तर एका खोलीत सहा मुली राहू शकतात. अशाप्रकारे ९६ खोल्यांमधून ५७६ मुलींच्या
राहण्याची सोय या गल्र्स होस्टेलमध्ये झाली आहे. निवास व भोजन अशी सोय या इमारतीत आहे.
विवेकानंद आश्रमाच्या भयमुक्त
वातावरणात आता या सावित्रीच्या लेकी शिकू शकतील, त्यांचे भवितव्य घडवू शकतील. या होस्टेलचे
बांधकाम पूर्ण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे
लोकार्पण नियोजित आहे. त्यासाठी विवेकानंद आश्रमातर्फे त्यांना निमंत्रणही पाठविण्यात
आले आहे.
संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा