वृक्ष संवर्धनाने होळी साजरी करावी - संतोष गोरे


निसर्ग आपल्या सतत शिकवित असतो. माणसे आपआपसात भेद निर्माण करतात. माणसे माणसात दरी निर्माण करतात. नदीचे पाणि सर्व जाती धर्मासाठी उपलब्ध असते तेथे भेद नसतो. तो संस्कार आपल्या निर्माण व्हावा. विकास करतांना निसर्गाचा -हास होतो. निसर्गाचा -हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेच आहे. प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाने होळी साजरी करावी असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी बोलतांना काढले.
विवेकानंद आश्रमात दरवर्षी होळी सण वृक्ष पूजन करून साजरा करण्याची परंपरा गत अनेक वर्षापासून  कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी घालून दिली आहे. वृक्षांचे संवर्धन व्हावे, निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे. वृक्ष पूजन करून त्यांना आपलेसे करावे ही  भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी दरवर्षी प्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीच्या सणानिमित्त  बुधवारी ता.२० रोजी वृक्ष पूजनाचा कार्यक्रम विवेकानंद आश्रमात आयोजित करण्यात आला होता.
सकाळी दहा वाजता कर्मयोगी संत .पू. शुकदास महाराजश्रींच्या निवासस्थानाजवळ लागून असलेल्या बकुळ वृक्षाचे विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पूजन करण्यात आले. विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, पत्रकार समाधान म्हस्के, संतोष थोरहाते, श्रीराम मानघाले आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना संतोष गोरे म्हणाले की, होळीच्या दिवशी होळी करायची असल्यास दुर्गूणांची होळी करा. कुविचारांची होळी करून सुविचारी बनावे. रंग पंचमी साजरी करतांना कृत्रिम रंगाचा वापर करता पर्यावरण पूरक सभ्यतेने रंगपंचमी साजरी करावी असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्की तिरके तर आभार प्रा.प्रतिक उगले यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राध्यापक,प्राध्यपकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थीनी बहूसंख्येने उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनाचा केला संकल्प

आम्ही होळी उत्सावात कोणत्याही प्रकारची पर्यावरणाची हानी करणार नाही. वृक्ष संगोपन संवर्धनासाठी कटीबध्द राहू.पर्यावरण रक्षणाच्या प्रचार,प्रसारासाठी प्रयत्नशील राहू.रंगपंचमीच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या घातक रसायनयुक्त रंगांचा वापर करणार नाही. नैसर्गीक रंगांचा वापर करू असा संकल्प विद्याथ्र्यांनी केला.



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८




जनावराच्या आजाराचे गांभीर्य ओळखावे - डॉ. हेमंत बि-हाडे


ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात पशूंचे पालन करतो. पशूधन संगोपनाचा त्याला जोडधंदासाठी उपयोग होतो. ग्रामीण भागातील शेतक-याला पशूंच्या आजाराबाबत माहिती नसल्यामुळे तो पशु आजाराकडे दुर्लक्ष करतो. शेतक-यांची जनावरे आजारी असल्यास त्यांचा शेती कामावर सुध्दा परिणाम होतो. दुधाळ जनावरे आजारी असल्यास त्यांचा दुध उत्पादनावर परिणाम होवून दुध व्यवसायात तोटा सहन करावा लागतो.  शेतक-यांनी जनावरांच्या आजारांचे गांभीर्य ओळखावे असे प्रतिपादन  स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशूविज्ञान संस्था अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत बि-हाडे यांनी  केले.
कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर व स्नातकोत्तर पशुवैदयक व पशु विज्ञान संस्था अकोलाचे संयुक्त विद्यामाने आयोजीत भव्य मोफत पशु रोगनिदान व उपाचार शिबीराच्या उदघाटन प्रसंगी शनिवार ता.१६ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद व कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते तर प्रमुख पाहूणे म्हणून स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्था अकोला चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत बि-हाडे, डॉ.सी.एच.पावशे, डॉ.एम. जी. थोरात, डॉ.डे.एस. पजई, डॉ.एम व्ही. इंगवले, डॉ. एस.डी.चेपटे, वि.कृ.व्य.व्य.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे तथा आदि उपस्थित होते.
याशिबीरात डॉ.पी.डी. पाटील,डॉ. भास्कर वाघमारे,डॉ.नेहा भावे,डॉ.सुमीत वैद्य यांनी शिबीरातील जनावराची तपासणी करून गरजु जनावरावर शस्त्रक्रिया केली. या शिबीराचा लाभ परिसरातील शेतक-यांच्या जनावरांना झाला. शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रा. ज्ञानेश्वर जाधव,प्रा.प्रतिक उगले,प्रा.हर्षल मगर,प्रा.निलेश देशमुख,प्रा.कु.अनिता अरूळकर,प्रा.निलेश शिंदे ,प्रा.दिपक निकम,डॉ.सुनिल देशमाने, दिपक मगर,शिवहारी हाडे,राज रौंदळकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे,सूत्रसंचाल प्रा.जी.के.ठाकरे तर आभार प्रदर्शन प्रा.मिनाक्षी कडू यांनी मानले.

हिवरा आश्रम येथे पशू रोगनिदान शिबीर संपन्न
विवेकानंद आश्रमाच्या हरिहर तीर्थावर आयोजित भव्य मोफत पशु रोगनिदान व उपचार शिबीरात यावेळी ६० ते ७० जनावरांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. या शिबीरात जनावर माजावर न येणे,जनावरे गाभण न राहणे,जनावरांच्या वाताची शस्त्रक्रिया,शिंगाची शस्त्रक्रिया, शेपटीची शस्त्रक्रिया तसेच खरूज खाज येणे,जनावरांची केश गळणे इत्यादी वर शिबीरात उपचार करण्यात आला.

ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेल्या  भव्य मोफत पशु रोगनिदान व उपाचार शिबीरात ६० ते ७० जनावरांची तपासणी करण्यात आली. शिबिरातील काही जनावरांवर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली.                                     डॉ.सुधाकर चांगाडे,प्राचार्य विवेकानंद कृषी व्य.व्य. महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८