काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच होणार जाहीर !

* विदर्भातील ४ जागांवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद


 
मुंबई: विधानसभा निवडणुका आता अवघ्या महिनाभरावर आल्या आहेत. पण, अजूनही सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपला आघाडी घेत रविवारी आपल्या ९९ उमेदवारांच्या नावांसह पहिली यादी जाहीर केली. दुसरीकडे, महाविकास आघाडीही आपली पहिली यादी जाहीर करेल असं वाटत असताना मविआत नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. विदर्भातील ४ जागांवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद झाला असून उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यामुळे मविआच्या घटकपक्षांमध्ये एकच गोंधळ उडाला. शरद पवारांकडूनही मध्यस्थीचे प्रयत्न झाले. पण तेही निष्फळ ठरले. शिवसेना ठाकरे गटाने वेगळा निर्णय घेण्याचा विचार करु असं सांगितलं. या सर्व घडामोडींनंतर आता काँग्रेसने मात्र आपले उमेदवार निश्चित केले असून काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. 

विदर्भातील माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला,  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले , विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , विदर्भ काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार , मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे .

 माळी समाजाचे विदर्भात जवळपास पंचवीस लाख मतदान आहे . माळी समाजाला सत्ताकारणात सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्षित ठेवले.  एक छगन भुजबळ वगळता एकही नेता माळी समाजातून राजकारणात स्वीकारला गेला नाही.  छगन भुजबळ यांचे राजकारणही माळी समाजाऐवजी स्वकेंद्रित आणि स्वकुटुंब केंद्रित राहिले . छगन भुजबळ यांची विदर्भातील बाहुबली म्हणून ओळखले जाणारे किशोर कन्हेरे यांनी आपल्या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आज अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला . मध्यंतरी त्यांनी जवळपास बारा वर्ष शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते म्हणूनही कार्य केले.  शिवसेनेत विदर्भात फार लक्ष दिले जात नसल्याने आणि माळी समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी राष्ट्रीय पक्ष सोबत असण्याची आवश्यकता लक्षात घेऊन किशोर कन्हेरे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला . माळी समाजासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची मनोकामना त्यांनी यावेळी व्यक्त केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आणि आपल्या समाजाला निश्चित न्याय देण्यात येईल याबाबत आश्वस्थ केले.  महाराष्ट्रातील नेत्यांनी किशोर कन्हेरे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसला विदर्भात निश्चित खूप फायदा होईल आणि माळी समाजाला किशोर कन्हेरे यांच्या नेतृत्वात निश्चितपणे न्याय देण्यात येईल याबाबत खात्री व्यक्त करून किशोर कन्हेरे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत आनंद व्यक्त केला.

समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा !

 


पृथ्वीवर स्वर्ग अवतरला आहे. आपल्या भारतात हा स्वर्गीय नजारा पहायला मिळत आहे. चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यांवर अंधारात चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या रहस्यमयी लाटा उसळल्या आहेत. चमकणाऱ्या लाटा हा एक नैसर्गिक चमत्कार नसून वैज्ञानिक चमत्कार असल्याचे संशोधक सांगतात. आहे. या लाटांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

तामिळनाडूतील चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यांवर या निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. चेन्नईतील नीलंकराई, इंजांबक्कम, विल्लुपुरम आणि मारक्कनम समुद्रकिनाऱ्यांवर या लाटा पहायला मिळत आहेत. या निळ्या रंगाच्या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहे. या लाटा पाहाण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटकांनी या लाटांचे व्हिडिओ आणि फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. 

दिल्लीमध्ये शाळेजवळ मोठा स्फोट

 

नवी दिल्ली : आज सकाळी दिल्ली येथील एका शाळेजवळ भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. शाळेच्या एका भिंतीजवळ हा स्फोट झाला असून यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. मात्र संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्लीमधील प्रशांत विहार परिसरात स्फोट झाला. स्फोटानंतर लगेचच धुराचे मोठे लोट दिसू लागले. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांसह एफएसएलची टीम घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता आणि याबाबतचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. दिल्ली पोलिसांसह एफएसएलची टीम या घटनेबाबत अधिक तपास करत आहे.

ठाकरे गटाने निवडणूक चिन्ह बदललं?, विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी ओळख मिळणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सुधारित 'मशाल' निवडणूक चिन्ह दिलं आहे. जून २०२२ मध्ये शिंदे गटाने शिवेसेनेतून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दोन तलवारी आणि ढाल हे चिन्ह मिळालं तर, उद्धव ठाकरेंच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, उद्धव गटाचे निवडणूक चिन्ह 'मशाल' हे आइस्क्रीमच्या कोनसारखं दिसतं असं म्हणत विरोधकांकडून खिल्ली उडवण्यात आली होती. त्यामुळे या निवडणूक चिन्हात थोडा बदल करण्यात आला असून निवडणूक चिन्हात 'मशाल' स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना ईव्हीएमवर सुधारित मशाल निवडणूक चिन्ह दिसणार आहे. पक्ष विभाजनानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मशाल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक चिन्ह म्हणून दोन तलवारी आणि ढाल दिली होती.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने १९८५ मध्ये 'ज्वलंत मशाल' हे निवडणूक चिन्ह वापरून निवडणूक यशस्वीपणे लढवली होती. शिवसेनेने स्थापनेपासून अनेक चिन्हांवर निवडणूक लढवली आहे. त्यात रेल्वे इंजिन, ताडाच्या झाडांची जोडी, तलवार आणि ढाल यांचा समावेश आहे. तर १९८९ मध्ये शिवसेनेने धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत चार खासदार लोकसभेवर पाठवले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेली महायुतीकडून सध्या सत्ता टिकविण्यासाठी खूप प्रयत्न सुरु आहेत. तर शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सत्ता मिळवण्यासाठी जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने कमाल करत राज्यात आघाडी घेतली. तोच विश्वास त्यांना विधानसभा निवडणुकीतही असल्याचं नेते सांगतात. तर, विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचच सरकार येणार असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी बोलून दाखवला. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे.