समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा !

 


पृथ्वीवर स्वर्ग अवतरला आहे. आपल्या भारतात हा स्वर्गीय नजारा पहायला मिळत आहे. चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यांवर अंधारात चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या रहस्यमयी लाटा उसळल्या आहेत. चमकणाऱ्या लाटा हा एक नैसर्गिक चमत्कार नसून वैज्ञानिक चमत्कार असल्याचे संशोधक सांगतात. आहे. या लाटांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

तामिळनाडूतील चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यांवर या निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. चेन्नईतील नीलंकराई, इंजांबक्कम, विल्लुपुरम आणि मारक्कनम समुद्रकिनाऱ्यांवर या लाटा पहायला मिळत आहेत. या निळ्या रंगाच्या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहे. या लाटा पाहाण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटकांनी या लाटांचे व्हिडिओ आणि फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. 

दिल्लीमध्ये शाळेजवळ मोठा स्फोट

 

नवी दिल्ली : आज सकाळी दिल्ली येथील एका शाळेजवळ भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. शाळेच्या एका भिंतीजवळ हा स्फोट झाला असून यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. मात्र संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्लीमधील प्रशांत विहार परिसरात स्फोट झाला. स्फोटानंतर लगेचच धुराचे मोठे लोट दिसू लागले. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांसह एफएसएलची टीम घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता आणि याबाबतचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. दिल्ली पोलिसांसह एफएसएलची टीम या घटनेबाबत अधिक तपास करत आहे.

ठाकरे गटाने निवडणूक चिन्ह बदललं?, विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी ओळख मिळणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सुधारित 'मशाल' निवडणूक चिन्ह दिलं आहे. जून २०२२ मध्ये शिंदे गटाने शिवेसेनेतून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दोन तलवारी आणि ढाल हे चिन्ह मिळालं तर, उद्धव ठाकरेंच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, उद्धव गटाचे निवडणूक चिन्ह 'मशाल' हे आइस्क्रीमच्या कोनसारखं दिसतं असं म्हणत विरोधकांकडून खिल्ली उडवण्यात आली होती. त्यामुळे या निवडणूक चिन्हात थोडा बदल करण्यात आला असून निवडणूक चिन्हात 'मशाल' स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना ईव्हीएमवर सुधारित मशाल निवडणूक चिन्ह दिसणार आहे. पक्ष विभाजनानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मशाल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक चिन्ह म्हणून दोन तलवारी आणि ढाल दिली होती.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने १९८५ मध्ये 'ज्वलंत मशाल' हे निवडणूक चिन्ह वापरून निवडणूक यशस्वीपणे लढवली होती. शिवसेनेने स्थापनेपासून अनेक चिन्हांवर निवडणूक लढवली आहे. त्यात रेल्वे इंजिन, ताडाच्या झाडांची जोडी, तलवार आणि ढाल यांचा समावेश आहे. तर १९८९ मध्ये शिवसेनेने धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत चार खासदार लोकसभेवर पाठवले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेली महायुतीकडून सध्या सत्ता टिकविण्यासाठी खूप प्रयत्न सुरु आहेत. तर शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सत्ता मिळवण्यासाठी जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने कमाल करत राज्यात आघाडी घेतली. तोच विश्वास त्यांना विधानसभा निवडणुकीतही असल्याचं नेते सांगतात. तर, विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचच सरकार येणार असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी बोलून दाखवला. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

बुलडाणामध्ये रविकांत तुपकर की जालिंधर बुधवत बुधवत, की जयश्री शेळके ?

 











जिल्ह्यात विधानसभेसाठीही लोकसभेचीच पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता?

- रविकांत तुपकर हे आंबेडकरांच्याही संपर्कात; अपक्ष लढले तरी महाआघाडीला सहाही मतदारसंघात फटका निश्चित?

बुलढाणा (खास प्रतिनिधी) - शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना महाआघाडीत घेऊन त्यांना बुलढाण्यातून उमेदवारी द्यावी, याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बहुतांश वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले असताना, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मात्र निष्ठावंत की उपरा? असा प्रश्न निर्माण झाला असून, निष्ठावंत जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, की शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना उमेदवारी द्यावी, की अ‍ॅड. जयश्रीताई शेळके यांना संधी द्यावी, असा गहन आणि मोठा राजकीय पेच उद्धव ठाकरे यांच्यापुढे निर्माण झाला असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. रविकांत तुपकर यांना महाआघाडीत घ्यावे, जेणे करून लोकसभेची पुनर्रावृत्ती टाळता येईल, व त्यांचा बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा व 

विदर्भातील काही जागांवर राजकीय फायदा होईल, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाआघाडीच्या काही नेत्यांना विश्वास असल्याचे कळते आहे. तर तुपकरांना बुलढाण्यातून उमेदवारी दिल्यास आम्ही राजकीय संन्यास घेऊ, अशी धमकी जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांनी दिल्याचीही जोरदार चर्चा बुलढाण्यात रंगते आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यासमोर निर्णय घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत या शिवसेना (ठाकरे) नेत्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. महाआघाडीसोबत येण्यास तुपकर यांनी तयारी दर्शविली असून, वेळप्रसंगी जेथे त्यांचा प्रभाव आहे, तेथे महाआघाडीला सहाय्य करण्याचीही तुपकरांनी तयारी दर्शविली होती. खुद्द उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांनीही लोकसभेला झालेली चूक विधानसभेला होऊ नये, यासाठी आपण महाआघाडीसोबत येऊन 'मशाल' हाती घ्या, अशी सूचना तुपकरांना केली होती. त्यालाही तुपकर तयार झाले होते, अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे. परंतु, काही स्थानिक नेत्यांनी तुपकरांना बुलढाण्यातून उमेदवारी देण्याला तीव्र विरोध केला. तसेच, राजीनामे देण्याची व राजकीय संन्यास घेण्याचीही धमकी दिली, त्यामुळे उद्धव ठाकरे हे भावनिक पेचात पडले असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून कळते आहे. तुपकर हे महाआघाडीत आले तर त्यांचा महाआघाडीला बुलढाणाच नाही तर सिंदखेडराजा, चिखली, मेहकर या तीन मतदारसंघात मोठा फायदा होणार आहे, हे महाआघाडीच्या नेतृत्वाला माहिती असतानाही, केवळ स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे तुपकरांना उमेदवारी जाहीर करण्यास उद्धव ठाकरे हे विलंब लावत असल्याचेही या सूत्राने सांगितले.
दुसरीकडे, बुलढाण्याची जागा काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असून, त्यासाठी महाराष्ट्र निवडणूक प्रभारी तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. मुकूल वासनिक यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे यांच्यावर दबाव वाढविला असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे हे ज्या त्यांच्या निष्ठावंत उमेदवाराला उमेदवारी देण्याची शक्यता आहे, त्या उमेदवाराला मते मिळणार नाहीत, त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड हे मोठ्या मताधिक्क्याने व आरामशीर निवडून येईल, ही बाबही काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे अ‍ॅड. जयश्रीताई शेळके व हर्षवर्धन सपकाळ हे सक्षम उमेदवार असून, त्यात अ‍ॅड. जयश्रीताई शेळके यांच्या बाबतीत विविध सर्वेक्षणांचे रिपोर्ट हे सकारात्मक आलेले आहेत. जयश्रीताईंना शिवसेना (ठाकरे) किंवा काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर त्या संजय गायकवाड यांचा पराभव करू शकतात. किंवा, रविकांत तुपकर यांना 'मशाल' चिन्हावर लढायला भेटले तरी, ते संजय गायकवाड यांचा पराभव करून उद्धव ठाकरे यांचे 'गद्दाराला पराभूत करण्याचे स्वप्न' पूर्ण करू शकतात. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या ठोस निर्णयाअभावी महाआघाडी या मतदारसंघात चांगलीच अडचणीत आलेली दिसते आहे.


दुसरीकडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आणखी काही दिवस उद्धव ठाकरे यांच्या निरोपाची वाट पाहण्याचे ठरवलेले दिसत असून, सकारात्मक व सन्मानजनक प्रतिसाद भेटला नाही तरच अपक्षच निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केलेले आहे. तुपकर हे किमान १६ ते १८ जागा राज्यांत उभे करू शकतात, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात ते उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, त्यांची वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही सकारात्मक चर्चा झालेली असून, त्यामुळेच अ‍ॅड. आंबेडकर यांनी बुलढाण्यातील सिंदखेडराजा वगळता इतर जागांवरील उमेदवार जाहीर करण्याबाबत 'वेट अ‍ॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली असल्याचे कळते आहे. तुपकर अपक्ष लढले काय, किंवा आंबेडकरांसोबत गेले काय? त्याचा सर्वाधिक फटका हा महाआघाडीलाच बसणार असून, घाटावरील सर्व जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव होणे निश्चित मानले जात आहे. त्यामुळेच, उद्धव ठाकरे यांनी भावनिकतेला प्राधान्य न देता, निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावून तातडीने निर्णय घ्यावेत, यासाठी महाआघाडीचे नेते प्रयत्न करत असल्याचेही वरिष्ठस्तरीय राजकीय सूत्राने सांगितले आहे.
-------------

बुलडाणा जिल्हयात भाजपाचे उमेदवार जाहिर !

जामोदमधून डॉ.संजय कुटे, खामगाव ॲड आकाश फुंडकर, चिखली श्वेताताई महाले यांना  पुन्हा संधी 

बुलडाणा :-  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 राजकारण आता चांगलंच पेटलं आहे. अशातच आज भाजपने  99 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपाने बुलडाणा जिल्हयात उमेदवार जाहिर केले असून जळगाव जामोदमधून डॉ.संजय कुटे तर खामगाव मधून ॲड आकाशदादा फुंडकर तर चिखली मधून श्वेताताई महाले यांची नावे जाहिर केले आहे.  भाजपाने पुन्हा बुलडाणा जिल्हयात डॉ.संजय कुटे,आकाश फुंडकर,श्वेताताई महाले यांना  पुन्हा संधी देण्यात आली.महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.राज्यात पहिल्यांदाच भाजप दोन मोठ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिगंणात उतरली आहे. अशावेळी महायुतीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून मागील काही दिवस तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आज भाजपच्या पहिल्या यादीनंतर त्याबाबतचा सस्पेन्स हा काहीसा कमी झाला आहे

2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने किती जागा लढवलेल्या ? 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. तर  शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. त्यांनी या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या

यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहेत. ज्यामध्ये दोन्हीकडे 3-3 पक्षांचा समावेश आहे.