वाचनातून देवत्वाच्या प्रवासास प्रारंभ !


मानव आणि इतर सजीवांच्या तुलनेत हे जग समृध्द,जीवन जगण्यास उपयुक्त आणि सुंदर करण्यासाठी मानवाने आपल्या बुध्दीचा वापर केला तर मानवेत्तर सजीवांनी सृष्टीचे सौंदर्य अबाधित राखले. मानवी जीवनाला लाभलेली उंची ही त्याला त्यांच्या जगण्याचे महत्व,जगण्याची दिशा त्याच्या सामर्थ्यांची जाणिव झाल्यावरच कळते. थोरा, मोठयांचे विचार वाचूनच जीवनाला कलाटनी मिळते. ज्ञानेश्वर, तुकाराम, विवेकानंद, गांधी, टागोर,कबीर,मुन्शी प्रेमचंद,आंबडेकर यांनी विपुल लेखन केले. त्यामागे वाचनाची सुप्त शक्ती दडलेली होती. वाचनाने शब्द साठा तर वाढतोच, शब्दांचे अर्थ उमगायला लागले की विचारांचे महत्व कळते आणि सुविचार  हे मनाचे खाद्य असल्याचे संत साहित्याचे अभ्यासक तथा विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दैनिक सकाळशी सोमवारी ता.१४ मुलाखती दरम्यान प्रकाशझोत टाकला. दरम्यान वाचन यथार्थ जीवनाचा पथदर्शक असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी पुढे बोलतांना गोरे म्हणाले की, केवळ पदवी पर्यंत शिक्षण घेतलेला नरेंद्र दत्तच्या बुध्दीमत्तेचा आवाका सर्व शास्त्राच्या आकलनापासून ते देश, विदेशाच्या विचारवंताच्या समृध्द करणा-या विचारांशी जोडल्या गेला ते केवळ त्यांच्या वाचनाच्या अफाट सामर्थ्यांने. संस्कृत, इंग्रजी अशा अनेक भाषांवर प्रभूत्व असलेला नरेद्र दत्त स्वामी विवेकानंद या पदापर्यंत पोहचला अखिल मानव समूहाला विचारांचा समृध्द वारसा ठेवून गेला. वाचनाने शब्द साठा तर वाढतोच, शब्दांचे अर्थ उमगायला लागले की विचारांचे महत्व कळते आणि सुविचार  हे मनाचे खाद्य आहे. जगभरात अनेक विद्वानांनी मानवी जीवन समृध्द करण्यासाठी आपल्या दृष्टीकोनातून पाहीलेले जग वाचकांपुढे ठेवले. घरातील पुस्तकांच्या कपाटाची जागा शोभेच्या वस्तुंनी घेतली. बंद पडत चालेल्या प्रकाशन संस्था,छपाई खर्चासही परवडत नसलेले वर्तमान पत्रे,साप्ताहीके आणि मासिके अधोगतीला गेलेल्या वाचन संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. आपल्या लेखनीने जग गाजविणारे लेखक सुध्दा दररोज सोशल मिडीयावर  स्वतःला न्याहळत आनंदीत होत आहेतवाचनाने खरच उमजतो का जगण्याचा अर्थ असे विचारल्यास त्याचे उत्तर होयच येते. वाचन करतांना का? कोणते? कशासाठी? हा प्रश्न विचारूनच पुस्तकांची निवड करावी. महापुरूषांच्या जीवनातील दोष काठून त्यांचे चरित्र किती ठिसूळ होते. हे स्वबुध्दीने एसी अभ्यासिकेत बसून रेखाटणारा लेखक किंवा विचारांच्या मतभेदांना हाड वैराशी जोडून उभ्या केलेल्या भिंती अधिक उंच करणारे नतद्रष्टे विचारवंत, संप्रादायाच्या नावाने संमेलने भरविणारे, विषमता उराशी बाळगून समतेचे गीत रचणारे, अभिजनांच्या रांगेत बसून कल्पनेच्या सागरात मनोसक्त डुंबणारे तथाकथित अभ्यासक यांना आपल्या वाचनातून टाळलेलेच बरे. अवघ्या जगातील दुर्जनता नष्ट होवून मानवाची सत्कर्माकडे रती वाढविण्याचे पसायदान मागणारे ज्ञानेश्वर. कोणत्याही जीवाला झालेली इजा माझ्या मनावर वार करते असे म्हणणारे करूणासागर बुध्द रंजल्या, गांजलेल्यांना आपले म्हणणा-यातच देव शोधणारे तुकाराम नक्किच आणि नक्किच आपले इवलेशे जीवन जगण्याचा मतीतार्थ व्यापकतेकडे घेवून  जाईल. काळानुरूप हातात आलेले इलेक्ट्रानिक्स गॅजेट पुस्तकातून मांडलेल्या शब्दांवर मात करू पाहत आहे.

भौतिक प्रगती साधतांना संवेदना बोधट
भौतिक प्रगती साधतांना बोधट झालेल्या संवेदना, हातातून निसटून चाललेले मानवीमूल्य आणि बधिर झालेल्या जाणिवा या देहाच्या कुडीत कोंमबून आपल्या जगण्याला करीयर संपन्नतेकडे घेवून जाणारे दुबळे जीव केवळ वाचनाच्या अभावाने निर्माण होतात.

वाचनाने उमजतो  जगण्याचा अर्थ
वाचणासाठी चित्ताची एकाग्रता, बैठकीसाठी शारीरीक संपन्नता आकलनासाठी पंचेद्रीयांचे नियंत्रण झाल्याने शब्दबध्द केलेले विचार बुध्दीतून हदयापर्यंत पोहचातात आणि मग सुरूवात होते हदय परिर्वतनाला. हदय परिर्वतनानेच हाडामासाचा मनुष्य देह मानवातून देवत्वाच्या प्रवासाला प्रारंभ करतो. मानवाचा देव बनण्याला तिथेच सुरूवात होते. देव बनण्याचा प्रवास वाचनातून सुरू होत असेल कृतीतून संपन्न होत असेल तर चला मग वाचनाला सुरूवात करू या.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

विवेकानंद कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्याचे माजी विद्याथ्र्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परिक्षा उत्तीर्ण करीत घवघवीत यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेमध्ये विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रवीण महादेव अप्पा नंदकुळे, सचिन राजू मोरे, विशाल सत्यनारायण जिरवणकार या तीन  विद्यार्थ्यांची  मंडळ कृषी अधिकारी नियुक्ती झाली.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने २००३ मध्ये विवेकानंद कृषी महाविद्यालय सुरू केले. या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतक-यांसाठी कृषी मार्गदर्शन चर्चा सत्रे,कृषी प्रदर्शनी,माती परिक्षण,किड व्यवस्थापन, तण व्यवस्थापन तसेच नवनवे कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येते. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी नियमीत शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन करीत असतात. या विद्यार्थ्यांच्या कृषी मार्गदर्शनाचा जवळपासच्या खेडयातील शेकडो शेतकरी बांधवांनी लाभ घेवून शेतीमध्ये सुधारणा केल्या. विवेकानंद  कृषी महाविद्यालयातून अनेक गुणवंत विद्यार्थी उत्तीर्ण होवून अनेक यश संपादन केले. विवेकानंद कृषी महाविद्यालयातील या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई वडील व विवेकानंदन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य ,सर्व प्राध्यापकांना  दिले आहे.

नीलीमा काळे यांनी रोवली ग्रामीण भागात उद्योगाची मुहूर्तमेढ


तालीमें नही दी जाती परिंदो को उडानो की... वे खुद ही तय करते है उॅचाई आसमानो की...रखते है जो हौसला आसमां को छुने का वो नही करते परवाह जमीन पे गिर जाने की.. या ओळीचा प्रत्यय हिवरा आश्रम येथील उच्चशिक्षीत निलीमा दत्तात्रय काळे यांच्या रूपाने दिसून येतो. निलीमा काळे यांनी नोकरीची कास धरता ग्रामीण भागात सिमेंट उद्योग उभा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. आपला सिमेंट उद्योग सुरू करण्याचा मनोदय पती दत्तात्रय काळे यांना पटवून दिला. निलीमा काळे यांनी चिखली मेहकर रोडच्या बाजूला एका एकराच्या शेतात समृध्दी सिमेंट उद्योग सुरू केला. ग्रामीण भागातील  उघडयावर शौचास जाणा-या महिलांची होणारी कुचंबना लक्षात घेवून कमीत कमी खर्चात रेडीमेड शौचालय निर्मिती करण्याचे ठरले. समृध्दी सिमेंट कारखान्याच्या माध्यमातून दहा ते पंधरा लोकांना मजूरी मिळवून त्यांना उपजिवीकेचा साधन मिळाले आहे. निलीमा काळे यांच्या समृध्दी कारखान्यामध्ये रेडीमेड सिमेंट चौकटी, सिमेंट खिडक्या, सिमेंट बाक, पाण्याचे हौद, रेडीमेड शौचालय इत्यादी सिमेंटचे स्वस्त टिकाऊ उत्पादन निर्मिती होत आहे. सदर कारखान्यातील रेडीमेड शौचालय अत्यंत माफक दरात मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेकडून या सिमेंट रेडिमेड शौचालयाला बुलडाणा, वाशिम अकोला येथून मोठया प्रमाणात मागणी आहे. सदर कारखान्यातील रेडीमेड शौचालय चार बाय चार या आकाराच्या जागेत बसविता येतो. समृध्दी सिमेंट कारखान्यातील रेडीमेड शौचालय विकत घेण्यासाठी ग्रामीण भागातील जनेतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

ग्रामीण भागातल्या ठरल्या पहिल्या उद्योजिका
हिवरा आश्रम सारख्या छोट्याशा खेड्यामध्ये उद्योग सुरु करुण्याचे धाडस नीलिमा काळे यांनी केले.यामाध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. नीलिमा काळे यांनी सिमेंट कारखाना सुरु केल्यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

ऑरगॅनिक प्रॉडक्ट निर्मितीचा मानस
रासायनिक उत्पादनामुळे मानवाच्या शरीरावर परिणाम होवून दिवसेंदिवस माणसाचे आरोग्य धोक्यात येवून अनेक आजार उदभवत आहे. याकरीता निलीमा काळे यांनी ऑरगॅनिक उत्पादन निर्मिती करणार आहे. यामध्ये मधुमेह व्यक्तीसाठी शुगर फ्री ऑरगॅनिक शुगर,ग्रीन टी,आयुर्वेदीक औषधी,घरघुती  महिलांचे सौंदर्य प्रसादने अशी ऑरगॅनिक, हर्बल उत्पादने निर्मिती करणार आहे.

उत्पादनाला तीन जिल्हयातून मागणी
सदर कारखान्यातील रेडीमेड शौचालय अत्यंत माफक दरात मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेकडून या सिमेंट रेडिमेड शौचालयाला बुलडाणा, वाशिम व अकोला येथून मोठया प्रमाणात मागणी आहे. सदर कारखान्यातील रेडीमेड शौचालय चार बाय चार या आकाराच्या जागेत बसविता येतो.

महिला सुध्दा उद्योग सुरू करून यामध्ये यशस्वी होऊ शकतात. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत असतांना ग्रामीण भागातील महिला मागे का? या हेतूने समृध्दी सिमेंट उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. समृध्दी सिमेंट उद्योगाच्या माध्यमातून इतरांना रोजगार मिळाला आहे.
नीलीमा काळे, ग्रामीण उद्योजिका हिवरा आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८