Responsive Ads Here

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार ?

 * बारामती विधानसभा निवडणूकीकडे राज्यासह देशाचे लक्ष

लोकसभेच्या निवडणूकीमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष बारामती निकालाकडे लागले होते. आता विधानसभा निवडणूकीमध्ये मध्ये चित्र वेगळे नसल्याचे दिसून येत आहे. पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांच्या विरोधात चक्क त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार दंड थोपटण्याची शक्यता आहे.  असे झाल्यास बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळू शकते.

बारामती शहरात अजित पवार यांच्या प्रचार यंत्रणेकडून त्यांच्या नावाच्या प्रचाराच्या वाहनांचा ताफा तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे.  या प्रचार रथावर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आता  बारामतीतून राष्ट्रवादीचे  उमेदवार अजित पवार हेच असतील हे आता स्पष्ट झालंय. 

यापूर्वी अजित पवारांनी तब्बल सहा वेळा बारामतीचं नेतृत्व केलंय आता सातव्यांदा अजित पवार  बारामतीच्या मैदानात उतरलेत. येत्या  28 तारखेला अजित पवार  उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आजपर्यंत अजित पवारांच्या विरोधात लढणा-याचं डिपॉझिट जप्त झालंय. मात्र, बारामतीची यंदाची लढाई अजित पवारांसाठी तितकी सोपी नसणार आहे.  यंदा अजित पवारांच्या विरोधात शरद पवार युगेंद्र पवारला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुळेंच्या विरोधात मैदानात उतरवलं.  मात्र मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा यांना  पराभवाचा सामना करावा लागला.  सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून 48 हजारांचे लीड मिळालं होतं. 

लोकसभेला काकांनी पुतण्याला आसमान दाखवलं.  आता  विधानसभेतही काकांच्या  विरोधात पुतण्या दंड ठोकून उभा राहण्याची शक्यता असल्यानं बारामतीत लोकसभेनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?  

युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र असून

फलटण तालुक्यातील शरयू खाजगी साखर कारखान्याचे काम ते पाहतात.विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत.


सरकारी नोकरीची सुशिक्षतांना सुवर्णसंधी !

 ० कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये रिक्त पदांसाठी भरती 

० अर्ज करण्याची २५ ऑक्टोबर अंतिम तारीख 

मुंबई : सुशिक्षीत तरूणांसाठी  व नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता समोर आली आहे. या सरकारी नोकरी भरतीमुळे भरघोस पगाराची संधी सुशिक्षीतांना प्राप्त होणार आहे.  कर्मचारी राज्य विमा महामंडळाने रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची २५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी राज्य विमा महामंडळाने सीनियर रेजिडेंट, स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट या पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

काय आहे वयोमर्यादा

कर्मचारी राज्य विमा महामंडळात सीनियर रेजिडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. तसेच स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६९ वय असावे.

शैक्षणिक पात्रता

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/डीएनबी/ डिप्लोमा केला असावा. तर सुपर स्पेशलिस्ट पदासाठी नेफ्रोलॉजी आणि न्युरोलॉजी पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.

वेतन

स्पेशलिस्ट पदासाठी उमेदवारांना १ लाख २१ हजार रुपये पगार मिळणार आहे. तसेच सुपर स्पेशलिस्ट पदासाठी २ लाख रुपये पगार मिळणार आहे.

निवड प्रक्रिया

ईएसआयसी भरतीमधील नोकरीसाठी लॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती केली जाणार आहे. हा इंटरव्ह्यू २९ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांना २०७, दुसरा माळा, ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल, जयपुरस राजस्थान येथे उपस्थित राहावे लागणार आहे.

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी !

० सणासुदीच्या काळात ८० हजारांचा आकडा पार

मुंबई : दिवाळीचा सण काहि दिवसांवर येवून ठेपला असतांना सोन,चांदिच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अशातच सध्या सणासुदीचा काळ सुरु असून या कालावधीत अनेकजण सोनं- चांदी करतात. मात्र साततत्याने वाढत चाललेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. पाहा बाजारात काय आहेत आजचे दर. 

आज सोन्याच्या दरात प्रति तोळा ४५० रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा दर ७८ हजार १७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तसेच चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे २ हजार ८०० रुपयांची वाढ झाली.

दरम्यान, दिवाळी सण अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपला आहे. धनतेरस, भाऊबीज या सणांच्या मुहूर्तावरही लोक सोनं खरेदी करतात. त्यामुळे सोनं चांदीच्या दरात घट होणार की दराचा उच्चांक वाढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


देशातील १ लाख तरुणांना राजकारणात आणणार !

 वाराणसीमध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा

० मोदींच्या हस्ते ६७०० कोटी रुपयांच्या २३ प्रकल्पांचे उद्घाटन



वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. वाराणसीमध्ये बोलत असताना, देशातील एक लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचं वक्तव्य मोदींनी केलं आहे. तरुणांचे कुटुंबवादामुळे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठीच आम्ही राजकारणात अशा एक लाख तरुणांना आणण्याचा संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

काल दि.२० ऑक्टोंबर २०२४ रोजी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली. देशामधील १ लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचं ते म्हणाले. ज्या कटुंबामधील राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या तरुणांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवलं जाईल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आज ६७०० कोटी रुपयांच्या २३ प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले.

पंतप्रधान मोदींचा तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा वाराणसी दौरा होता. आरजे शंकरा नेत्र रुग्णालयाचे या भेटीदरम्यान त्यांनी उद्घाटन केले. तसेच शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांची प्रकृती देखील जाणून घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आमच्या सरकारमध्ये कोणाशीही भेदभाव केला जात नाही. घराणेशाहीच्या राजकारणापासून आणि भारताला जातीय मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशात तरुण राजकारण आलं की, लोकशाही जास्तीत- जास्त मजबूत होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.राम मंदिराच्या उभारणीचा आपल्या भाषणात संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर बांधले जाईल, असे आम्ही सांगितले होते. लाखो लोक आज रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात असल्याचे मोदी म्हणाले. सरकारने तिहेरी तलाकपासून स्वातंत्र्य आणि महिलांना आरक्षण देण्याचे काम केलं आहे. एनडीए सरकारने कोणाचाच हक्क हिरावून घेतलेला नाही, गरिबांनासुद्धा दहा टक्के आरक्षण देण्याचे काम केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

उध्दव ठाकरेंनीच मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावे !

 अमरावती येथे काँग्रेस युवक मेळाव्यात आ.यशोमती ठाकूर यांचे विधान 


काहि दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांना आव्हान देत आहेत. मविआ आणि महायुती मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहिर करण्यास टाळाटाळ करत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उध्दव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानामुळे मविआच्या नेत्‍यांमध्ये खदखद सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र उध्दव ठाकरेंनीही मविआने जाहिर केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला माझा पाठिंबा असेल अस म्हणत वाद मिटवण्याचा प्रयत्‍न केला होता. त्‍यानंतर आता काँग्रेसच्या आ. यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केले आहे. उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत असे यशोमती ठाकूर यांनी म्हटल आहे. 



राहुरी तालुक्यात भाजपची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या माजी आमदार चंद्रशेखर कदम यांना पहिल्या यादीतून डावललं

 अनेक मतदारसंघात भाजपातील निष्ठावान या यादीवर नाराज 

भाजपने पहिली यादी जाहीर करत बाजी मारली खरी, मात्र आता अनेक मतदारसंघात भाजपातील निष्ठावान या यादीवर नाराज असल्याच समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात मागील वेळी पराभूत झालेल्या शिवाजी कर्डिले यांना पहिल्या यादी स्थान मिळालं. मात्र राहुरी तालुक्यात दोन वेळेस आमदार असलेले आणि भाजपची  तालुक्यात मुहूर्तमेढ रोवणारे माजी आमदार चंद्रशेखर कदम हे मात्र नाराज झाल्याचे समोर आल आहे.

आपला मुलगा सत्यजित कदम याला उमेदवारीचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी त्याला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. यापूर्वी शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीसाठी मी विद्यमान आमदार असतानाही थांबलो होतो. मात्र पक्षाने मला शब्द देऊन तो पूर्ण केला नाही, त्यामुळे भविष्यात मुलगा जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी बोलून दाखवला आहे. 

दरम्यान, चंद्रशेखर कदम यांचे पुत्र सत्यजित कदम यांनी गेल्या दहा वर्षात देवळाली प्रवरा नगरपालिकेच नगराध्यक्ष पद भूषवतांना मतदारसंघात देखील आपला ठसा उमटवला आहे. शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीनंतर सत्यजित कदम यांनी देखील बंडखोरीचे संकेत दिले असून ज्या कार्यकर्त्यांनी मला नेता केलं त्या कार्यकर्त्यांचा निर्णय पुढील दोन दिवसात जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट करू, असा इशाराच भाजपला दिलाय. दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांमुळे भाजपातील निष्ठावंतांची मोठी कोंडी निर्माण होत असल्याचं आता पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात कदम कुटुंबाने वेगळा निर्णय घेतला तर भाजप आणि महायुतीसाठी तो मोठा धक्का ठरेल यात शंका नाही, असेही ते म्हणाले आहे. 

2019 मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजी कर्डीले हे सज्ज झाले असून राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच मला राहुरीतून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला असल्याचं शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

विवेकानंद आश्रमाच्या प्रगतीत सार्वजनिकहितांची वृध्दी- मुंबई हायकोर्ट न्यायमूर्ती जी.ए. सानप

 


हिवरा आश्रम: सार्वजनिक संस्था हया जनकल्याणासाठी झटणा-या असाव्यात. विवेकानंद आश्रमाचे समाजोपयोगी कार्य गेल्या अनेक वर्षापासून मी जाणून आहे. संस्थेच्या उद्दिष्टात सामान्य माणसाचे हित दडलेले असावे लागते. आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यावरण सुरक्षा, निसर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे. या गरजा पूर्ण करणे त्यातच सार्वजनिकहित आहे आश्रमाच्या भेटीत हे सर्वकार्य स्पष्टपणे दिसत आहे. आश्रमाच्या प्रगतीत सार्वजनिकहितांची वृध्दी होत आहे. असे उद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी आश्रमास आज दि. 20.10.2024 रोजी सदिच्छा भेटी प्रसंगी काढले. 

आश्रमात आगमन प्रसंगी त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. संस्थेच्या दर्जेदार शिक्षण उपक्रमांमुळे लक्षावधी विद्याथ्र्यांना शिक्षण मिळाले असून त्यांच्या जीवनात समाधानकारक परिवर्तण झाल्याचे परिणाम दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरक्षित व संस्कारक्षम वातावरण त्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी पुरक ठरत आहेत. त्यामुळे मुलींना मोठयाप्रमाणात फायदा मिळत आहे. आरोग्य सेवेचे महाराजांनी सुरु केलेले कार्य अव्याहतपणे सुरु असून पर्यावरण सुरक्षेच्या बाबतीत संस्था गंभीर आहे. विवेकानंद स्मारक व नयनरम्य गार्डन, चिड्रेनपार्क, भव्य गोशाळा व निसर्ग संवर्धन यामुळे संस्थेला भेट देणा-या पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. या सर्व सेवाउपक्रमांना व परिसराला न्यायमूर्ती सानप यांनी प्रत्यक्ष भेट दिली. विवेकानंद स्मारक हे अत्यंतीक प्रेरणादायी व सद्विचारांना चालना देणारे ठिकाण आहे. स्वामीजींची प्रतिमा पाहून या ठिकाणी तरुणांना जीवन जगण्याचा दृष्ट्रीकोण मिळतो व आत्मशक्तीचे भान निर्माण होते. सत्पुरुषाच्या पश्चात त्याच्या विचारांचा वसा घेवून त्यांनी सुरु केलेले कार्य नेटाणे पुढे नेण्यासाठी झोकुन देणारी माणसे लागत असतात. आश्रमात आल्यानंतर अशी माणसे या ठिकाणी आहेत याचा प्रत्यय आला. संस्थेच्या भविष्यातील सर्वउपक्रमांना व वाटचालीला त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. आजचा त्यांचा दौरा ही आश्रमास पारिवारीक भेट असल्याचे आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले. याप्रसंगी आश्रमाचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात चार आमदारांना भाजपाची पुन्हा उमेदवारी

 सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर आणि दीपक बोरसे यांना उमेदवारी 


नाशिक : भाजपाने नाशिक जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे, नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले, चांदवड मधून राहुल आहेर आणि बागलान मधून दीपक बोरसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे या यादीत प्रतीक्षेत आहेत, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सीमा हिरे आणि राहुल आहेर यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपा नेत्यांकडून विरोध करण्यात आला होता. विशेषतः राहुल आहेर यांचे बंधू केदा आहेर देखील चांदवड मधून उमेदवारीसाठी इच्छुक होते. केदा आहेर यांच्या समर्थनार्थ राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा केली होती.

आता राहुल आहेर यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने केदा आहेर यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले जात आहे. नाशिक पश्चिम मधून देखील सीमा हिरे यांच्या उमेदवारीला विरोध झाल्यामुळे स्थानिक नेत्यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या स्थितीचा परिणाम काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

लाडकी बहीण योजनेवरुन बँक कर्मचाऱ्यांचं संपाचं हत्यार !

 

महाराष्ट्र राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला आहे. यादरम्यान आता लाडकी बहीण योजनेवरुन बँक कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. महाराष्ट्रात बँक कर्मचाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी संपाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर ती राबवताना सुरक्षित वातावरण मिळत नसल्याचं बँक कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडून बँक कर्मचाऱ्यांचा झालेला छळ आणि हल्ला यामुळे हे संपाचं हत्यार उचलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.


काय आहे बँकांचे  संपामागचे कारण ? 

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला आहे. UFBU ही नऊ बँक युनियनची संघटना आहे. UFBUचे राज्य समन्वयक देवीदास तुळजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लाडकी बहीण योजनेमुळे बँकांमध्ये मोठा गोंधळ माजला आहे. सरकारकडून नियोजनाचा तसंच संवाद साधण्याचाही अभाव आहे. या योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.'

काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच होणार जाहीर !

* विदर्भातील ४ जागांवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद


 
मुंबई: विधानसभा निवडणुका आता अवघ्या महिनाभरावर आल्या आहेत. पण, अजूनही सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपला आघाडी घेत रविवारी आपल्या ९९ उमेदवारांच्या नावांसह पहिली यादी जाहीर केली. दुसरीकडे, महाविकास आघाडीही आपली पहिली यादी जाहीर करेल असं वाटत असताना मविआत नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. विदर्भातील ४ जागांवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद झाला असून उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यामुळे मविआच्या घटकपक्षांमध्ये एकच गोंधळ उडाला. शरद पवारांकडूनही मध्यस्थीचे प्रयत्न झाले. पण तेही निष्फळ ठरले. शिवसेना ठाकरे गटाने वेगळा निर्णय घेण्याचा विचार करु असं सांगितलं. या सर्व घडामोडींनंतर आता काँग्रेसने मात्र आपले उमेदवार निश्चित केले असून काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. 

विदर्भातील माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला,  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले , विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , विदर्भ काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार , मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे .

 माळी समाजाचे विदर्भात जवळपास पंचवीस लाख मतदान आहे . माळी समाजाला सत्ताकारणात सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्षित ठेवले.  एक छगन भुजबळ वगळता एकही नेता माळी समाजातून राजकारणात स्वीकारला गेला नाही.  छगन भुजबळ यांचे राजकारणही माळी समाजाऐवजी स्वकेंद्रित आणि स्वकुटुंब केंद्रित राहिले . छगन भुजबळ यांची विदर्भातील बाहुबली म्हणून ओळखले जाणारे किशोर कन्हेरे यांनी आपल्या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आज अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला . मध्यंतरी त्यांनी जवळपास बारा वर्ष शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते म्हणूनही कार्य केले.  शिवसेनेत विदर्भात फार लक्ष दिले जात नसल्याने आणि माळी समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी राष्ट्रीय पक्ष सोबत असण्याची आवश्यकता लक्षात घेऊन किशोर कन्हेरे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला . माळी समाजासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची मनोकामना त्यांनी यावेळी व्यक्त केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आणि आपल्या समाजाला निश्चित न्याय देण्यात येईल याबाबत आश्वस्थ केले.  महाराष्ट्रातील नेत्यांनी किशोर कन्हेरे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसला विदर्भात निश्चित खूप फायदा होईल आणि माळी समाजाला किशोर कन्हेरे यांच्या नेतृत्वात निश्चितपणे न्याय देण्यात येईल याबाबत खात्री व्यक्त करून किशोर कन्हेरे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत आनंद व्यक्त केला.

समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा !

 


पृथ्वीवर स्वर्ग अवतरला आहे. आपल्या भारतात हा स्वर्गीय नजारा पहायला मिळत आहे. चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यांवर अंधारात चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या रहस्यमयी लाटा उसळल्या आहेत. चमकणाऱ्या लाटा हा एक नैसर्गिक चमत्कार नसून वैज्ञानिक चमत्कार असल्याचे संशोधक सांगतात. आहे. या लाटांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

तामिळनाडूतील चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यांवर या निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. चेन्नईतील नीलंकराई, इंजांबक्कम, विल्लुपुरम आणि मारक्कनम समुद्रकिनाऱ्यांवर या लाटा पहायला मिळत आहेत. या निळ्या रंगाच्या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहे. या लाटा पाहाण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटकांनी या लाटांचे व्हिडिओ आणि फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. 

दिल्लीमध्ये शाळेजवळ मोठा स्फोट

 

नवी दिल्ली : आज सकाळी दिल्ली येथील एका शाळेजवळ भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. शाळेच्या एका भिंतीजवळ हा स्फोट झाला असून यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. मात्र संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्लीमधील प्रशांत विहार परिसरात स्फोट झाला. स्फोटानंतर लगेचच धुराचे मोठे लोट दिसू लागले. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांसह एफएसएलची टीम घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता आणि याबाबतचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. दिल्ली पोलिसांसह एफएसएलची टीम या घटनेबाबत अधिक तपास करत आहे.

ठाकरे गटाने निवडणूक चिन्ह बदललं?, विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी ओळख मिळणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सुधारित 'मशाल' निवडणूक चिन्ह दिलं आहे. जून २०२२ मध्ये शिंदे गटाने शिवेसेनेतून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दोन तलवारी आणि ढाल हे चिन्ह मिळालं तर, उद्धव ठाकरेंच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, उद्धव गटाचे निवडणूक चिन्ह 'मशाल' हे आइस्क्रीमच्या कोनसारखं दिसतं असं म्हणत विरोधकांकडून खिल्ली उडवण्यात आली होती. त्यामुळे या निवडणूक चिन्हात थोडा बदल करण्यात आला असून निवडणूक चिन्हात 'मशाल' स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना ईव्हीएमवर सुधारित मशाल निवडणूक चिन्ह दिसणार आहे. पक्ष विभाजनानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मशाल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक चिन्ह म्हणून दोन तलवारी आणि ढाल दिली होती.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने १९८५ मध्ये 'ज्वलंत मशाल' हे निवडणूक चिन्ह वापरून निवडणूक यशस्वीपणे लढवली होती. शिवसेनेने स्थापनेपासून अनेक चिन्हांवर निवडणूक लढवली आहे. त्यात रेल्वे इंजिन, ताडाच्या झाडांची जोडी, तलवार आणि ढाल यांचा समावेश आहे. तर १९८९ मध्ये शिवसेनेने धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत चार खासदार लोकसभेवर पाठवले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेली महायुतीकडून सध्या सत्ता टिकविण्यासाठी खूप प्रयत्न सुरु आहेत. तर शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसची महाविकास आघाडी सत्ता मिळवण्यासाठी जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने कमाल करत राज्यात आघाडी घेतली. तोच विश्वास त्यांना विधानसभा निवडणुकीतही असल्याचं नेते सांगतात. तर, विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीचच सरकार येणार असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी बोलून दाखवला. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

बुलडाणामध्ये रविकांत तुपकर की जालिंधर बुधवत बुधवत, की जयश्री शेळके ?

 











जिल्ह्यात विधानसभेसाठीही लोकसभेचीच पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता?

- रविकांत तुपकर हे आंबेडकरांच्याही संपर्कात; अपक्ष लढले तरी महाआघाडीला सहाही मतदारसंघात फटका निश्चित?

बुलढाणा (खास प्रतिनिधी) - शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना महाआघाडीत घेऊन त्यांना बुलढाण्यातून उमेदवारी द्यावी, याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बहुतांश वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले असताना, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मात्र निष्ठावंत की उपरा? असा प्रश्न निर्माण झाला असून, निष्ठावंत जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, की शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना उमेदवारी द्यावी, की अ‍ॅड. जयश्रीताई शेळके यांना संधी द्यावी, असा गहन आणि मोठा राजकीय पेच उद्धव ठाकरे यांच्यापुढे निर्माण झाला असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. रविकांत तुपकर यांना महाआघाडीत घ्यावे, जेणे करून लोकसभेची पुनर्रावृत्ती टाळता येईल, व त्यांचा बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा व 

विदर्भातील काही जागांवर राजकीय फायदा होईल, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाआघाडीच्या काही नेत्यांना विश्वास असल्याचे कळते आहे. तर तुपकरांना बुलढाण्यातून उमेदवारी दिल्यास आम्ही राजकीय संन्यास घेऊ, अशी धमकी जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांनी दिल्याचीही जोरदार चर्चा बुलढाण्यात रंगते आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यासमोर निर्णय घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत या शिवसेना (ठाकरे) नेत्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. महाआघाडीसोबत येण्यास तुपकर यांनी तयारी दर्शविली असून, वेळप्रसंगी जेथे त्यांचा प्रभाव आहे, तेथे महाआघाडीला सहाय्य करण्याचीही तुपकरांनी तयारी दर्शविली होती. खुद्द उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांनीही लोकसभेला झालेली चूक विधानसभेला होऊ नये, यासाठी आपण महाआघाडीसोबत येऊन 'मशाल' हाती घ्या, अशी सूचना तुपकरांना केली होती. त्यालाही तुपकर तयार झाले होते, अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे. परंतु, काही स्थानिक नेत्यांनी तुपकरांना बुलढाण्यातून उमेदवारी देण्याला तीव्र विरोध केला. तसेच, राजीनामे देण्याची व राजकीय संन्यास घेण्याचीही धमकी दिली, त्यामुळे उद्धव ठाकरे हे भावनिक पेचात पडले असल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून कळते आहे. तुपकर हे महाआघाडीत आले तर त्यांचा महाआघाडीला बुलढाणाच नाही तर सिंदखेडराजा, चिखली, मेहकर या तीन मतदारसंघात मोठा फायदा होणार आहे, हे महाआघाडीच्या नेतृत्वाला माहिती असतानाही, केवळ स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे तुपकरांना उमेदवारी जाहीर करण्यास उद्धव ठाकरे हे विलंब लावत असल्याचेही या सूत्राने सांगितले.
दुसरीकडे, बुलढाण्याची जागा काँग्रेसने प्रतिष्ठेची केली असून, त्यासाठी महाराष्ट्र निवडणूक प्रभारी तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. मुकूल वासनिक यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे यांच्यावर दबाव वाढविला असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे हे ज्या त्यांच्या निष्ठावंत उमेदवाराला उमेदवारी देण्याची शक्यता आहे, त्या उमेदवाराला मते मिळणार नाहीत, त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड हे मोठ्या मताधिक्क्याने व आरामशीर निवडून येईल, ही बाबही काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे अ‍ॅड. जयश्रीताई शेळके व हर्षवर्धन सपकाळ हे सक्षम उमेदवार असून, त्यात अ‍ॅड. जयश्रीताई शेळके यांच्या बाबतीत विविध सर्वेक्षणांचे रिपोर्ट हे सकारात्मक आलेले आहेत. जयश्रीताईंना शिवसेना (ठाकरे) किंवा काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर त्या संजय गायकवाड यांचा पराभव करू शकतात. किंवा, रविकांत तुपकर यांना 'मशाल' चिन्हावर लढायला भेटले तरी, ते संजय गायकवाड यांचा पराभव करून उद्धव ठाकरे यांचे 'गद्दाराला पराभूत करण्याचे स्वप्न' पूर्ण करू शकतात. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या ठोस निर्णयाअभावी महाआघाडी या मतदारसंघात चांगलीच अडचणीत आलेली दिसते आहे.


दुसरीकडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आणखी काही दिवस उद्धव ठाकरे यांच्या निरोपाची वाट पाहण्याचे ठरवलेले दिसत असून, सकारात्मक व सन्मानजनक प्रतिसाद भेटला नाही तरच अपक्षच निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केलेले आहे. तुपकर हे किमान १६ ते १८ जागा राज्यांत उभे करू शकतात, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात ते उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, त्यांची वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही सकारात्मक चर्चा झालेली असून, त्यामुळेच अ‍ॅड. आंबेडकर यांनी बुलढाण्यातील सिंदखेडराजा वगळता इतर जागांवरील उमेदवार जाहीर करण्याबाबत 'वेट अ‍ॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली असल्याचे कळते आहे. तुपकर अपक्ष लढले काय, किंवा आंबेडकरांसोबत गेले काय? त्याचा सर्वाधिक फटका हा महाआघाडीलाच बसणार असून, घाटावरील सर्व जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव होणे निश्चित मानले जात आहे. त्यामुळेच, उद्धव ठाकरे यांनी भावनिकतेला प्राधान्य न देता, निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावून तातडीने निर्णय घ्यावेत, यासाठी महाआघाडीचे नेते प्रयत्न करत असल्याचेही वरिष्ठस्तरीय राजकीय सूत्राने सांगितले आहे.
-------------

बुलडाणा जिल्हयात भाजपाचे उमेदवार जाहिर !

जामोदमधून डॉ.संजय कुटे, खामगाव ॲड आकाश फुंडकर, चिखली श्वेताताई महाले यांना  पुन्हा संधी 

बुलडाणा :-  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 राजकारण आता चांगलंच पेटलं आहे. अशातच आज भाजपने  99 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपाने बुलडाणा जिल्हयात उमेदवार जाहिर केले असून जळगाव जामोदमधून डॉ.संजय कुटे तर खामगाव मधून ॲड आकाशदादा फुंडकर तर चिखली मधून श्वेताताई महाले यांची नावे जाहिर केले आहे.  भाजपाने पुन्हा बुलडाणा जिल्हयात डॉ.संजय कुटे,आकाश फुंडकर,श्वेताताई महाले यांना  पुन्हा संधी देण्यात आली.महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.राज्यात पहिल्यांदाच भाजप दोन मोठ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिगंणात उतरली आहे. अशावेळी महायुतीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून मागील काही दिवस तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आज भाजपच्या पहिल्या यादीनंतर त्याबाबतचा सस्पेन्स हा काहीसा कमी झाला आहे

2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने किती जागा लढवलेल्या ? 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. तर  शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. त्यांनी या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या

यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहेत. ज्यामध्ये दोन्हीकडे 3-3 पक्षांचा समावेश आहे.


तानाजी सावंतांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला

 विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, भेटी घेणे सुरू आहे, अशातच महायुतीशी संबंध चांगले असलेल्या नेत्यांचे संबधित काहीजण यावेळी शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याचं दिसून आलं. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वर पोहोचले आहेत. तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 

धैर्येशील मोहिते पाटलांनी याआधी पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील इच्छूक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती. यामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत देखील उपस्थित होते. त्यानंतर अनिल सावंत आज पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूकीसाठी अनिल सावंत इच्छूक आहेत. मात्र, ही जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छूक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत.

उमेदवारीसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी आधी पुण्यात थेट शरद पवारांची भेट घेतली.  पंढरपूर मंगळवेढा परिसरातील भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार ते पाहतात. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी माढा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दावा केल्यानंतर त्यांचा पुतण्या अनिल सावंत यांनी पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघाच्या जागेसाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमदारकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करत तुतारी हाती घेण्याची शक्यता देखील या निमित्ताने वर्तवली जात आहे.

कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार?

पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांचा प्रचारही सुरु झाला आहे. तर दुसरीकडे भाजपचे दुसरे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे. ते देखील इच्छु उमेदवार असून त्यांनी निवडणुकीसाठीची चाचपणी सुरू केली आहे. तर प्रशांत परिचारक यांच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केलेली आहे. तर बिआरएस पक्षाचे भगीरथ भालके यांनी देखील पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे आपली पावले वळवली आहे.

भाजपचे तिकिट जवळपास समाधान आवताडे यांना मिळेल अशी शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवारांकडे आली तरी उमेदवार कोण असेल हे निश्चित झालेलं नाही. कारण महाविकास आघाडीकडून भगिरथ भालके, प्रशांत परिचारक, अनिल सावंत यांचेही मोठे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये कोणाच्या हाती तुतारी येते आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०२४

महिला व बालविकास विभागाद्वारे 236 पदांवर भरती सुरू; या उमेदवारांना मोठी संधी!

 

महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाने विविध पदांसाठी एकूण 236 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, लिपिक, स्वयंपाकी आणि काळजी वाहक यांसारख्या पदांचा समावेश आहे. 14 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, 3 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. सरकारी नोकरीची संधी साधायची असेल तर ही भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. चला तर मग, आता आपण या लेखात वरील भरतीबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया.

महिला बाल विकास विभाग भरती

भरती करणारा विभाग: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग

रिक्त पदांची संख्या: एकूण 236 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 नोव्हेंबर 2024 Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 – पदांची माहिती

जाहिरात क्रमांक: 01/2024


महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत खालील पदांसाठी भरती होणार आहे:

संरक्षण अधिकारी (गट – ब) – 02 पदे

परिविक्षा अधिकारी (गट – क) – 72 पदे

3. लघुलेखक (उच्च श्रेणी), गट – क – 01 पद

लघुलेखक (निम्न श्रेणी), गट – क – 02 पदे

वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक – 56 पदे

संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट – क – 57 पदे

वरिष्ठ काळजी वाहक, गट – ड – 04 पदे

कनिष्ठ काळजी वाहक, गट – ड – 36 पदे

स्वयंपाकी, गट – ड – 06 पदे

एकूण पदे: 236


शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria

या भरतीसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक ठरणार आहे.

नोकरीचे ठिकाण | Job Place

संपूर्ण महाराष्ट्र भर या भरती अंतर्गत तुमची नियुक्ती करण्यात येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात नोकरी करण्यासाठी सज्ज रहावे लागेल.

महत्त्वाच्या तारखा | Mahila Bal Vikas Vibhag Bharti Imprtant Dates

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 नोव्हेंबर 2024

टीप: अर्ज करण्यासाठी दिलेली अंतिम तारीख लक्षात ठेऊन अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणींमुळे अर्ज सादर करण्यात अडथळे येऊ शकतात, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.

अर्जाची पद्धत | Application Process


या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

14 ऑक्टोबर 2024 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

3 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे, त्यामुळे वेळेत अर्ज सादर करणे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे.

टीप: अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचा.


अर्ज प्रक्रिया कशी करावी? | Mahila Bal Vikas Vibhag Bharti How to apply?

नोंदणी करा: संकेतस्थळावर नवीन खाते उघडा किंवा आधीपासूनच सुरू असलेल्या खात्यात लॉगिन करा.

अर्ज भरा: तुमची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूकपणे भरून अर्ज पूर्ण करा.

कागदपत्रे अपलोड करा: गरजेप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड करा.

अर्ज सादर करा: अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवा.

महत्त्वाची सूचना | Important Note


भरतीसाठी अर्ज प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे.

3 नोव्हेंबर 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे अत्यावश्यक आहे. अर्ज चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास रद्द केला जाऊ शकतो.


अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचण्याचा सल्ला दिला जातो.

महत्त्वाच्या लिंक्स | Important Links

अधिकृत जाहिरात लवकरच उपलब्ध होईल.