|
हिवरा आश्रम : शिबीरातील शिबीरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अनंत शेळके |
आधुनिक जग हे खूप गतिमान आहे. संगणक आणि स्मार्टफोनच्या विश्वात चिमुकल्यांचे भावविश्व कोमजून जात आहे. माणूसकी,आत्मीयता दया, परोपकार, अध्यात्म या गोष्टी हद्दपार होत आहे. त्यामुळे भावी पिढीमध्ये सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल व उद्याच्या सुसंस्कृत पिढीच्या जडणघडणीसाठी संस्कारक्षम मानसिकता व दुर्दम्य इच्छा शक्तीची गरज आहे. बालसंस्कार शिबीराच्या माध्यमातून चिमुकल्यांना हसतखेळत शिक्षणाचा आनंद लुटता यावा. मुलांच्या दर्जेदार व सर्वांगिण शिक्षणाची ही गरज ओळखून हिवरा आश्रम येथील विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी उन्हाळी बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले. विवेकानंद ध्यान केंद्राव्दारे आयोजित शिबीराला १ मे पासून प्रारंभ झाला असून हे दि.१६ जून रोजी सदर शिबीराचा समारोप होणार आहे. यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. परिसरातील १५० ते २०० मुलांचा सक्रिय सहभाग मिळाला आहे. बालमनावर नैतिकता, निर्भीडपणा, सत्याचरण, निर्व्यसनी, प्रामाणिकता, सचोटी,थोर महापुरूषांचे जीवनचरीत्रा सोबत मूल्यांचे संवर्धन या शिबीरात सातत्याने होत असल्याची माहिती विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी दैनिक सकाळशी बोलतांना दिली. या शिबीरातील मुलांना निसर्गरम्य वातावरण, तणावमुक्त शिक्षण पध्दतीत शिकविले जाते. विवेकानंद ध्यान केंद्राच्या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेबाहेरच्या जगाची अनुभूती मुलांना मिळून मुलांचे भावविश्व समृध्द केले जात आहे. परिसर,पर्यावरण,समाज,स्वावलंबन या विषयीचे भान येऊन बांधिलकीची भावना निर्माण होईल असा विश्वास विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी दैनिक सकाळशी बोलतांना व्यक्त केला.
चिमुकल्यांना शाळेबाहेच्या जगाची अनुभूती
या बालसंस्कार शिबीरात श्लोक,सुसंस्कार, इंग्रजी भाषा, संभाषण कौशल्य, बौध्दिक क्षमतांचा विकास, चर्चा सत्र, हस्ताक्षर सुधारणा उपक्रम, कागदापासून पिशवी व फुले बनविणे, चित्रकला, रंगभरण स्पर्धा, मनोरंजक खेळ, स्टेज डेअरींग, प्रार्थना, कथाकथन, हरिपाठ, पाऊली या विविध विषयावर शिक्षकतज्ञ शिबीरार्थींना मार्गदर्शन करीत आहे.
कोरोनामुळे उन्हाळी शिबीराला खंड पडला मात्र आता कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे यावर्षी बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले. या उन्हाळी शिबीराच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगिण विकासाकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. संस्काराच्या शिदोरीतून नवीन पिढी घडत आहे. यामध्ये मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा बाह्य जगातील वास्तव ज्ञानाची अत्यंत गरज आहे. त्यामुळेच या शिबीरात उद्योगाभिमुख, रोजगाराभिमुख लघु प्रयोग राबविण्यात येत आहे.
अनंत शेळके संचालक विवेकानंद ध्यान केंद्र हिवरा आश्रम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा