Responsive Ads Here

सोमवार, १६ मे, २०२२

विवेकानंद स्मारक राज्यातील अग्रगण्य पर्यटन केंद्र बनणार - आ.डॉ.संजय रायमूलकर

 

शासनाची पर्यटनक्षेत्र विकासाची महत्‍वकांक्षी योजना आहे. पर्यटनक्षेत्राचा विकास झाल्यास रोजगाराची समस्या कमी होऊन वाढत्‍या व्यवसाने महसूलातही भर पडते. बुलडाणा जिल्हा पर्यटनदृष्टया महत्‍वाचा असून जिल्हयातील सिंदखेड राजा, लोणार, विवेकानंद आश्रम,  शेगाव इत्‍यादी पर्यटनस्थळे विकासाच्या टप्यात आहेत. मेहकर मतदार संघात असलेले विवेकानंद स्मारक हे अव्दितीय असे पर्यटनकेंद्र बनून नावारूपास येत असून कोराडी धरणाच्या मध्ये असलेल्या सहा एकराच्या बेटावर निर्माण केलेले विवेकानंद स्मारक हे अल्पावधीतच राज्यातील पर्यटनक्षेत्रांच्या यादीत अग्रगण्य केंद्र बनणार असल्याचा आशावाद मेहकर मतदार संघाचे आ. डॉ. संजय रायमूलकर यांनी रविवारी (ता. १५) रोजी विवेकानंद स्मारकास भेट दिल्यानंतर बोलतांना व्यक्त केले. आश्रमात आगमन प्रसंगी त्‍यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी त्‍यांच्या सोबत संस्थेचे पदाधिकारी व परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. बोटीने विवेकानंद स्मारकावर जाऊन त्‍यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन केले. या परिसरात पर्यटकांना सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्‍न करेल व शासन दरबारी पाठपुरावा करून विकासासाठी निधी खेचून आणेल असे विचार त्‍यांनी यावेळी व्यक्त केले. पर्यटन हा व्यवसाय असून पर्यटकांच्या संख्येवर व त्‍यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांवर हा व्यवसाय अवलंबून आहे. कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारका नंतर देशातील हे सर्वात मोठे विवेकानदं स्मारक बनणार असल्याचे व त्‍यासाठी विवेकानंद आश्रमासोबत शासनाच्या सहकार्याने मदत करणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले. स्मारकानंतर त्‍यांनी हरिहरतीर्थाला भेटी दिली. या ठिकाणी असलेले मनमोहक शिव गार्डन सुध्दा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बनला आहे. या परिसरातील प्राचीन मंदिरे अखंड वाहणारी जलधारा,गो संगोपन केंद्राला त्‍यांनी भेट दिली. कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती दिलीपबापू देशमुख,शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर,माजी अध्यक्ष महाराष्ट्र अर्बनचे बबनराव भोसले,जि.प.सदस्य तथा गटनेते आशीष रहाटे,माजी जि.प.सदस्य मनिष शेळके,माजी उपसभापती बननराव लहाने,माजी.पं.स.सदस्य गजानन पाटील,सरपंच मनोहर गिऱ्हे,शाखा प्रमुख विठ्ठल भाकडे,पत्रकार यांच्यासह विवेकानंद आश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा