विवेकानंद आश्रमात बुध्द पौर्णिमा साजरी

 


विवेकानंद आश्रमात दरवर्षी प्रमाणे वैशाख पौर्णिमेला बुध्द जयंती साजरी करण्यात आली. विवेकानंद आश्रमात भगवान बुध्दाच्या प्रतिमेसमोर भाविक जमा झाले होते. सकाळी ८ वाजता झालेल्या पूजनाच्या कार्यक्रमात सर्व प्रथम परिसराची स्वच्छता करण्यात आली. आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. भगवान बुध्ददेवांनी संपूर्ण जगाला शांती आणि करूणेचा संदेश दिला. सर्व जीवांशी करूणेच्या भावनेतून वागणूक निर्माण झाली तर सर्व व्देष आणि शत्रूमुक्त जीवन जगतील. परस्परांचे सहजीवन चारित्र्य नावाच्या मूल्यांने जोडले गेल्यास ते जीवन सुखी आणि सार्थकी होईल असे विचार संतोष गोरे यांनी बोलतांना व्यक्त केले. भगवान बुध्दांच्या जीवनातील सर्व पैलू व त्‍यांचा उपदेश विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यातून व प.पू.शुकदास महाराजांच्या चरित्रातून आढळतो. मानवाचे कल्याण हाच बुध्दतत्‍वज्ञानाचा पाया आहे. समाजाची सेवा करण्यासाठी विवेकानंद आश्रमात सुरू झालेले सेवाउपक्रम ही खरी उपासना असल्याचे प्रतिपादन शिवाजीराव घोंगडे यांनी केले. कार्यक्रमात प्राचार्य आर.डी.पवार,डी.भास्कर महाराज,अशोक गिऱ्हे व माजी नायब तहसिलदार बी.टी.सरकटे यांची समायोजित भाषणे झाली. यावेळी बुध्दवंदना घेण्यात आली. कार्यक्रमाला आश्रमाचे पदाधिकारी व परिसरातील नागरीक मोठया उपस्थित होते. 

विवेकानंद स्मारक राज्यातील अग्रगण्य पर्यटन केंद्र बनणार - आ.डॉ.संजय रायमूलकर

 

शासनाची पर्यटनक्षेत्र विकासाची महत्‍वकांक्षी योजना आहे. पर्यटनक्षेत्राचा विकास झाल्यास रोजगाराची समस्या कमी होऊन वाढत्‍या व्यवसाने महसूलातही भर पडते. बुलडाणा जिल्हा पर्यटनदृष्टया महत्‍वाचा असून जिल्हयातील सिंदखेड राजा, लोणार, विवेकानंद आश्रम,  शेगाव इत्‍यादी पर्यटनस्थळे विकासाच्या टप्यात आहेत. मेहकर मतदार संघात असलेले विवेकानंद स्मारक हे अव्दितीय असे पर्यटनकेंद्र बनून नावारूपास येत असून कोराडी धरणाच्या मध्ये असलेल्या सहा एकराच्या बेटावर निर्माण केलेले विवेकानंद स्मारक हे अल्पावधीतच राज्यातील पर्यटनक्षेत्रांच्या यादीत अग्रगण्य केंद्र बनणार असल्याचा आशावाद मेहकर मतदार संघाचे आ. डॉ. संजय रायमूलकर यांनी रविवारी (ता. १५) रोजी विवेकानंद स्मारकास भेट दिल्यानंतर बोलतांना व्यक्त केले. आश्रमात आगमन प्रसंगी त्‍यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी त्‍यांच्या सोबत संस्थेचे पदाधिकारी व परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. बोटीने विवेकानंद स्मारकावर जाऊन त्‍यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन केले. या परिसरात पर्यटकांना सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्‍न करेल व शासन दरबारी पाठपुरावा करून विकासासाठी निधी खेचून आणेल असे विचार त्‍यांनी यावेळी व्यक्त केले. पर्यटन हा व्यवसाय असून पर्यटकांच्या संख्येवर व त्‍यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांवर हा व्यवसाय अवलंबून आहे. कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारका नंतर देशातील हे सर्वात मोठे विवेकानदं स्मारक बनणार असल्याचे व त्‍यासाठी विवेकानंद आश्रमासोबत शासनाच्या सहकार्याने मदत करणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले. स्मारकानंतर त्‍यांनी हरिहरतीर्थाला भेटी दिली. या ठिकाणी असलेले मनमोहक शिव गार्डन सुध्दा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बनला आहे. या परिसरातील प्राचीन मंदिरे अखंड वाहणारी जलधारा,गो संगोपन केंद्राला त्‍यांनी भेट दिली. कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती दिलीपबापू देशमुख,शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर,माजी अध्यक्ष महाराष्ट्र अर्बनचे बबनराव भोसले,जि.प.सदस्य तथा गटनेते आशीष रहाटे,माजी जि.प.सदस्य मनिष शेळके,माजी उपसभापती बननराव लहाने,माजी.पं.स.सदस्य गजानन पाटील,सरपंच मनोहर गिऱ्हे,शाखा प्रमुख विठ्ठल भाकडे,पत्रकार यांच्यासह विवेकानंद आश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते. 


विवेकानंद ज्ञानपीठच्या सौरभची नवोदयसाठी हिमाचलमध्ये निवड


 विवेकानंद आश्रमाचे शैक्षणिक संकुल हे नर्सरी ते पदवी पर्यंतच्या दर्जेदार व गुणवत्‍तायुक्त शिक्षणासाठी प्रसिध्द आहे. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींनी सुरू केलेला आरोग्य, कृषी, शिक्षण, ज्ञाननिर्मिती, ग्रामविकास त्‍यातून मानव कल्याणाचा महायज्ञ आश्रमात तेवत ठेवला आहे. संस्थेव्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठ  ही निवासी  इंग्रजी माध्यमाची शाळा अल्पावधीच यशाचे अनेक शिखरे पार करीत आहे. नुकत्‍याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ज्ञानपीठात शिकलेला सौरभ कुरूडे यांची नवोदय विद्यालयातून पुढील शिक्षणासाठी हिमाचल प्रदेश येथे निवड झाली आहे. सौरभ हा विवेकानंद ज्ञानपीठात  शिक्षण घेतलेला व वसतिगृहात राहीलेला विद्यार्थी आहे. मूळचा हिंगोली जिल्हयातील सौरभ पाचव्या वर्गापर्यंत त्‍याने विवेकानंद ज्ञानपीठात शिक्षण घेतले. सहाव्या वर्गात त्‍याची नवोदय विद्यालयात शेगांव येथे निवड झाली. शेगाव येथील विद्यार्थ्यांमधून वर्ग ९ वी साठी त्‍याची हिमाचल प्रदेश येथे निवड झाली आहे. विवेकानंद आश्रमात महाराष्ट्रभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. सौरभ सारख्या ग्रामीण भागातून व गरीब कुटूंबातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना आश्रमाचे शैक्षणिक संकुलाने जीवनात यश मिळवून दिले आहे. शैक्षणिक गुणवत्‍ता देण्यासाठी हा परिसर सदैव तयार आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या ज्ञानपीठात शिक्षणासोबतच नवोदय विद्यालयासाठी व स्कॉलरशिपसाठी  तयारी वर्गाचे नियोजन केल्या जाते.त्‍याचा लाभ शाळेतील विद्यार्थ्यांना होत आहे.  सौरभच्या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या प्रणिता गिऱ्हे व सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले असून आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्‍याचे कौतुक केले आहे.

 

 

कृतिशील शिक्षकाच्या शिबीरातून तेवली चिमुकल्यांच्या ज्ञानाची ज्योती !

हिवरा आश्रम : शिबीरातील शिबीरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अनंत शेळके 
आधुनिक जग हे खूप गतिमान आहे. संगणक आणि स्मार्टफोनच्या विश्वात चिमुकल्यांचे भावविश्व कोमजून जात आहे. माणूसकी,आत्‍मीयता दया, परोपकार, अध्यात्‍म या गोष्टी हद्दपार होत आहे. त्‍यामुळे भावी पिढीमध्ये सुसंस्कृतपणा टिकवायचा असेल व उद्याच्या सुसंस्कृत पिढीच्या जडणघडणीसाठी संस्कारक्षम मानसिकता व दुर्दम्य इच्छा शक्तीची गरज आहे. बालसंस्कार शिबीराच्या माध्यमातून चिमुकल्यांना हसतखेळत शिक्षणाचा आनंद लुटता यावा. मुलांच्या दर्जेदार व सर्वांगिण शिक्षणाची ही गरज ओळखून हिवरा आश्रम येथील विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी उन्हाळी बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले. विवेकानंद ध्यान केंद्राव्दारे आयोजित शिबीराला १ मे पासून प्रारंभ झाला असून हे दि.१६ जून रोजी सदर शिबीराचा समारोप होणार आहे. यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्‍व विकासावर विशेष भर देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. परिसरातील १५० ते २०० मुलांचा सक्रिय सहभाग मिळाला आहे. बालमनावर नैतिकता, निर्भीडपणा, सत्‍याचरण, निर्व्यसनी, प्रामाणिकता, सचोटी,थोर महापुरूषांचे जीवनचरीत्रा सोबत मूल्यांचे संवर्धन या शिबीरात सातत्‍याने होत असल्याची माहिती विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी दैनिक सकाळशी बोलतांना दिली. या शिबीरातील मुलांना निसर्गरम्य वातावरण, तणावमुक्त शिक्षण पध्दतीत शिकविले जाते. विवेकानंद ध्यान केंद्राच्या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेबाहेरच्या जगाची अनुभूती मुलांना मिळून मुलांचे भावविश्व समृध्द केले जात आहे. परिसर,पर्यावरण,समाज,स्वावलंबन या विषयीचे भान येऊन बांधिलकीची भावना निर्माण होईल असा विश्वास विवेकानंद ध्यान केंद्राचे संचालक अनंत शेळके यांनी दैनिक सकाळशी बोलतांना व्यक्त केला.

  चिमुकल्यांना शाळेबाहेच्या जगाची अनुभूती 
 या बालसंस्कार शिबीरात श्लोक,सुसंस्कार, इंग्रजी भाषा, संभाषण कौशल्य, बौध्दिक क्षमतांचा विकास, चर्चा सत्र, हस्ताक्षर सुधारणा उपक्रम, कागदापासून पिशवी व फुले बनविणे, चित्रकला, रंगभरण स्पर्धा, मनोरंजक खेळ, स्टेज डेअरींग, प्रार्थना, कथाकथन, हरिपाठ, पाऊली या विविध विषयावर शिक्षकतज्ञ शिबीरार्थींना मार्गदर्शन करीत आहे.

 कोरोनामुळे उन्हाळी शिबीराला खंड पडला मात्र आता कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे यावर्षी बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले. या उन्हाळी शिबीराच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगिण विकासाकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. संस्काराच्या शिदोरीतून नवीन पिढी घडत आहे. यामध्ये मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा बाह्य जगातील वास्तव ज्ञानाची अत्‍यंत गरज आहे. त्‍यामुळेच या शिबीरात उद्योगाभिमुख, रोजगाराभिमुख लघु प्रयोग राबविण्यात येत आहे.
  अनंत शेळके संचालक विवेकानंद ध्यान केंद्र हिवरा आश्रम

अष्टावधानी निवेदक : शिक्षक अरविंद शिंगाडे

आपल्या निसर्गदत्त निवेदन शैलीच्या जोरावर, कल्पक शब्दफुलांच्या मोगऱ्याच्या दरवळाने अनेक राज्यस्तरीय समारंभमध्ये श्रवण सौख्यच्या हिरवळी फुलवत, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून मान्यवरणसह रसिकाना वैचारिक मेजवानीची दिव्य भेट प्रदान करून,, काळजात भरजारी वस्त्र विणणारे महाराष्ट्रातील खायत्नाम अष्टावधानी निवेदक, एक संवेदनशील बहुआयामी साहित्यिक, अभ्यासू व व्यासंगी वक्ते तथा महापुरुष्याच्या जीवनाचे भाष्यकार,वऱ्हाडी भाषेतील लोकमान्य कथा कथनकार,स्तंभलेखक, हजारो विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन करणारे बुलढाणा डायटचे कौनशिलर, मुक्त पत्रकार, उत्तुंग प्रतिभासम्पन्न कवी, प्रभावी समुपदेशक, सामाजिक तीव्र भान व तळागाळातील समाजातील शोषितांच्या जगण्याचा वैशाख आपल्या लेखणीतून प्रकट करणारे द्रष्टे समाजाभिमुख लेखक, उदंड लोकप्रियता लाभलेले अग्रगण्य सूत्रसंचालक, ब्रिटिश कौन्सिल या जागतिक संस्थेचे राज्य स्तरीय तजमार्गदर्शक, आपल्या अंगी असलेल्या उपजत नेतृत्व, कर्तृत्व, व वक्तृत्व गुणाने विविधांगी क्षेत्रातील अनेक कार्यक्रमातील उत्तम व यशस्वी संयोजक म्हणून साहित्य, शिक्षण, कला, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील सर्वाना सोबत घेऊन चालणारे सर्वसमावेशक मानवनिष्ठ चळवळीचे पुरस्कर्ते, विदयार्थी प्रेमात आकंठ बुडालेले उपक्रमशील उत्तुंग व दैदीप्यमान कल्पकतेचे धनी, बुलढाणा जिल्ह्यासाह अनेक सामाजिक व पर्यावरण प्रकलपांचे आधारवड, अशी कित्येक सार्थ विशेषणे ज्यांची आभूषणे आहेत, असे महाराष्टातील ख्यातानाम अष्टपैलू साहित्यिक, आदरणीय अरविंदजी शिंगाडे सर यांचा आज वाढदिवस. आदरणीय सरांना सर्व प्रथम जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. "वेडे हवे जगाला तारून न्यावयाला घे एक वेडं कुठले माणूस व्हावायला "' या ओळीचे सारथी बनत, जिद्द चिकाटी, अभ्यासू वृत्ती, व्यासंगी वृत्ती, व जिज्ञासा या गुणांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, व साहित्यवर्तुळत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कुठल्याही कार्यक्रमातील त्यांचे बहारदार संचलन अनेकांना भावून जाते. कोणताही कार्यक्रम म्हटला की सूत्रसंचलन महत्वाचे असते. अरविंद शिंगाडे यांचे विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक , सांस्कृतिक कार्यक्रमातील संचलनासोबत विविध काव्य मैफीलींचे निवेदन रसिकांची दाद मिळविणारे असते . संचलन कसे करावे ? त्यातील बारकावे समजतील अशा अत्यंत सोप्या शब्दात अरविंद शिंगाडे सर यांनी 'सुत्रसंचालनाची सुत्रे ' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांच्या या पुस्तकाला भरघोस असा प्रतिसाद सुध्दा मिळाला. विशेष म्हणजे हे पुस्तकरूपी अनमोल धन अनेक चाहत्यांच्या घरापर्यंत मोफत घर पोहोच करत, आगळी वेगळी कृतिशील साहित्य निष्ठा त्यांनी अधोरेखित केली आहे.सोबतच त्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल असे 'क करिअरचा ' हे ई - बुक सुद्धा प्रकाशित झाले आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी करिअर कौन्सिलिंग, मानसशास्त्रीय समुपदेशन, ताणतणाव व्यवस्थापन तसेच वक्तृत्व व निवेदनाच्या कार्यशाळा घेण्यावर त्यांचा नेहमीच भर असतो." "बुडते हे जन, न देखवे डोळा! म्हणोनी कळवळा येत असे!" ह्या संत वचनाचे सारथ्य पत्करून ते मार्गस्थ होतं, अनेक विदयार्थ्यांना उत्तम करिअर ची संजीवनी बहाल करत आहेत. मोबाईल द्वारा त्यांनी घेतलेल्या अनेक करिअर ऑनलाईन कार्यशाळा प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांनी आकाशवाणी जळगाववरुन भाषण सुध्दा दिले आहे. त्यांनी एका शैक्षणिक लघुचित्रपटात शिक्षकाची भूमिकाही केलेली आहे . त्यांचे वऱ्हाडी बोलीतील ' ऑफ पिरियड ' हे शैक्षणिक स्तंभलेखन सर्वदूर परिचित आहे. कथाकथन, कथालेखनही ते करतात .मराठी भाषेतील विविध बोलींचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने राज्यातील उपक्रमशील शिक्षक यांनी स्थापन केलेल्या मायबोली प्रतिष्ठानअंतर्गत अनेक कवितांचा 'वऱ्हाडी ' बोलीतून अनुवाद ते करीत असतात. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर व्याख्यानाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधन नेहमीच करत असतात. कानातून मनात आणि मनातून हृदयात उतरविण्याचं प्राबल्य यांच्या दमदार प्रबोधनात जाणवते. याच कारण त्यांचं प्रबोधन फक्त स्टेज पुरतं मर्यादित नाही, करणी आणि कथनी यामध्ये एकवाक्यता आणण्याची त्यांची प्रामाणिक धडपड अनेकांना भावते. "पुढे स्नेह पाझरे,, मागे चलती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा माझी """ ही दिव्य अनुभूती त्त्यांच्या लेखणी आणि वाणीमधून प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अभिजात मराठी शिक्षक साहित्य संघ अशा साहित्यिक व विवेकी चळवळीमध्ये अरविंद शिंगाडे यांचा नेहमीच प्रामुख्याने सहभाग राहला आहे. त्यांना दोन्हीही मुली आहेत. मोठी मुलगी MBBS मध्ये शिकत असून दोघींनाही उच्चशिक्षित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसावे, तसे कर्तृत्व त्यांच्या अवन्ति मुलीने सिद्ध केले आहे.स्कॉलर शिपच्या परीक्षेत अव्व्ल स्थान पटकवात आपल्या गुणवत्तेची चुनुख सिद्ध केली आहे, तिच्या दर्जेदार कविता आणि उत्कृष्ट संवाद कौशल्याची प्रचिती, सरांचा वकृत्वाचा वारसा तिच्यात संक्रमित झाल्याची दिव्य प्रचिती येते. समाजाच्या सर्वच स्तरात समरस होण्याची निसर्ग दत्त संवेदना लाभल्याने खूप मोठा चाहता वर्ग महाराष्ट्र भर विस्तारित आहेत. मैत्रीच्या बाबतीत सर तर कुबेर आहेत. अफाट लोकसंसंग्रह आणि प्रचंड व्यस्त अशी जीवन शैली असतांना देखील,, मित्रासाठी काहीपण,,,, हा त्याचा मूळ स्वभाव. "आपण आहोत "हे त्यांचे शब्द अनेक मित्रांना भक्कम बळ देतात. शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी विवेकानंद ध्यान केंद्र हिवरा आश्रमच्या वतीने राज्यस्तरीय सेवासमर्पण पुरस्कार २०१५ सुध्दा त्यांना मिळाला आहे. अशा या अल्पावधीत सर्वच क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शिक्षक अरविंद शिंगाडे सर यांचा प्रेरणादायी प्रवास खरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या विविधांगी पैलूवर प्रकाश टाकताना शब्दांच दारिद्र्य वेळोवेळी जाणवते. आपल्या अमोघ वाणीच्या जोरावर त्यांनी गझल नवाब भीमराव दादा पंचांळे यांच्या स्वर मैफिलीचे उत्कृष्ट निवेदन करत. "जैसे साच आणि मवाळ! मितले आणि रसाळ! शब्द जैसे कल्लोळ! अमृताचे " ही दिव्य अशी अमृतानुभूती घडवून दिली. विद्वता प्रखर, जळजळीत, तेजस्वी असते असं आपण नेहमीच म्हणतो, परंतु विद्वता शारदेच्या चांदण्यासारखी शीतल असते, याचा अनुभव सरांच्या सहवासात तुम्हास नक्कीच मिळेल. त्यांचं अभिष्टचिंतन करतांना त्यांचं व्यक्तिमत्व शब्दबद्ध करतांना एवढंच म्हणावं लागेल, "पायाखाली घ्यावी दुनिया नितीने कमवावी भाकरं. जीवच व्हावा असा गोड की अश्रूतूनही यावी साखर.. श्री.अनंत शेळके शिक्षक हिवरा आश्रम मो.9373836853