ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना !

 ० ब्रिक्स परिषदेसोबत संपूर्ण जगाची नजर पंतप्रधान मोदींवर

० परिषदेत आर्थिक सहकार, जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा 


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी BRICS परिषदेसाठी दोन दिवसांच्या २२-२३ ऑक्टोबर दौऱ्यासाठी रशियाच्या कझान शहराच्या दिशेने रवाना झाले आहेत. ब्रिक्स परिषदेसोबत संपूर्ण जगाची नजर पंतप्रधान मोदींवर असणार आहे. ते रशियामध्ये कोणत्या देशांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील यावर साऱ्यांच्या नजरा असणार आहेत.

रशियात भारताचे राजदूत विनय कुमार यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी कझानमध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या समकक्षांसह द्विपक्षीय बैठक करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिषदेत आर्थिक सहकार, जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

काय आहे BRICS

ब्रिक्स हा असा समूह आहे जो जगातील ४५ टक्के लोकसंख्या, जगातील ३३ टक्के जमीन आणि जगातील २८ टक्के अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतो. ब्रिक्सला BRIC या नावाने ओळखले जात होते. याची स्थापना २००६मध्ये सेंट पीटर्सबर्गमध्ये झाली. पहिल्या ब्रिक शिखर परिषदेचे आयोजन २००९ मध्ये रशियाच्या येकार्टिनबर्ग शहरात झाली होती.

किती आहे ब्रिक्सची ताकद

१० देशांच्या या समूहातील देशांची जर लोकसंख्या पाहिली तर जगाच्या ४५ टक्के आणि जगातील अर्थव्यवस्थेच्या २८.५ टक्के आहे. या आकड्यांवरून तुम्ही ब्रिक्सच्या ताकदीचा अंदाज लावू शकता.

कोणत्या मुद्द्यांवर केली जाते चर्चा

ब्रिक्स सदस्य देशांदरम्यान सहयोगाच्या मुद्द्यांवर नेते परिषदेत चर्चा करतात. याशिवाय व्यापार, आर्थिक, आरोग्य, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण, ऊर्जा, लेबर, लाचविरोधी, तसेच अँटी ड्रग्स सारख्या मुद्द्यांवरही चर्चा केली जाते.

विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्जांची स्विकृती

 मुंबई : निवडणूक मग कोणतीही असली तरी स्पर्धेतील उमेदवारांकडून अर्ज भरताना चांगल्या मुहूर्ताची वाट बघितली जाते. चांगला दिवस, त्या दिवसातील चांगली वेळ याचे गणित बघूनच अर्ज भरला जाण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असली, तरी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधण्यासाठी बहुतांश मतदारसंघांत २४ ऑक्टोबर रोजीच अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी आहे. यापैकी २७ ऑक्टोबरचा रविवार वगळता सहाही दिवस अर्ज भरता येणार आहेत. विशेष म्हणजे हे सहाही दिवस शुभ आहेत. अर्ज माघारीसाठी मात्र दिवाळीनंतरच पडद्यामागच्या हालचालींना वेग येणार आहे.

२२ ते २९ ऑक्टोबर या काळात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. या सात दिवसांत एकच रविवार येतो, अन्य सर्व सहाही दिवस शासकीय सुटी नसल्याने यादिवशी अर्ज भरता येणार आहेत. त्यातही २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत आहे. हा दिवस शुभ मानला जातो, त्यामुळेच याच दिवशी अर्ज भरण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात गर्दी होण्याची शक्यता आहे. २४ ऑक्टोबरशिवाय २८ व २९ ऑक्टोबर हे दिवसही चांगले आहेत. २८ ऑक्टोबरला वसुबारसने दिवाळीच्या पर्वाला सुरुवात होते, तर २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दोन्हीही दिवशी अर्ज मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.

या उमेदवारी अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे एक नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत आहे. दोन नोव्हेंबरला (शनिवार) पाडवा, तर तीन नोव्हेंबरला (रविवार) भाऊबीजेची शासकीय सुटी असणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत अर्ज माघारीचा शासकीय प्रक्रिया नसेल. मात्र, चार नोव्हेंबरला अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच प्रत्येक मतदारसंघात माघारीच्या घडामोडींना वेग येणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास  मंगळवारपासून (ता. २२) सुरुवात होणार असली, तरी या निवडणुकांचा मोठा अनुभव असलेल्यांकडून तत्पूर्वीच डमी अर्ज भरून तो या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तपासून घेतला जातो. अर्जासोबत जोडावी लागणारी संपत्तीची माहिती, शैक्षणिक पात्रतेसह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याबरोबरच कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनुभवी उमेदवारांकडे वकिलांसह तज्ज्ञांची फौज कार्यरत आहे. अनेक पक्षांकडून सर्व उमेदवारांची ही प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच कार्यरत आहे. अशा यंत्रणांनाही यानिमित्ताने ‘अलर्ट’ राहण्याचा सल्ला दिला गेला आहे.

भाजपाने ९९ उमेदवार जाहीर केले असून मनसे, वंचित व अन्य पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही जणांना एबी फार्मचे वाटप करण्यात आले आहे. उबाठा सेना, शिंदे शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी, कॉग्रेसकडून उमेदवारांची यादी जवळपास ‘फायनल’ होत आली असून लवकरच ही यादी जाहीर होणार आहे.

विदर्भातील जागावाटपावरून महायुतीमध्ये तिढा कायम !

 * भाजपाची विदर्भात ५० हून अधिक जागा लढण्याची आग्रही भूमिका

* विदर्भात अजित पवार,एकनाथ शिंदे १० ते १२ जागांवर मानवे लागणार समाधान 

विधानसभा रणधुमाळी जोरात सुरू असून पक्षप्रमुख जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणूकीत विजय मिळविण्यासाठी प्रत्‍येक पक्षाने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरूवात होत आहे. पण दुसरीकडे  जागावाटपाचा तिढा मात्र सुटत नसल्याचे दिसून नाही. मविआ आणि महायुती यांचे विदर्भावरून रस्सीखेच असल्याचे समोर आले आहे. विदर्भातील जागावाटपावरून ठाकरे आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. पण आता महायुतीमध्येही विदर्भाच्या जागावाटपाचा तिढ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. 

विदर्भात भाजपाने ५० जागा लढवण्याची तयारी  केली  आहे. त्‍यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्‍याग करावा लागणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपाने विदर्भात्‍ ५० हून अधिक जागा लढवण्याचा आग्रह धरला असून यामुळे महायुतीमध्ये तणावाचे वातावरण आहे.एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नरमाईची भूमिका घेवून त्‍याग करतील का ? अशा राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे. अमरावती विभागात भाजपाला ३२ पैकी २४ जागा पाहिजे तर नागपूर विभागात ३० पैकी २७ जागा भाजपला मिळवण्याची शक्यता आहे. 


विदर्भात एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या वाटयाला १० ते १२ जागा 

विदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या वाटयाला फक्त १० ते १२ जागा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यात शहराची जागा अजित पवार गटाला, बडनेराची जागा अपक्ष रवी राणा तर एकनाथ शिंदे यांना दर्यापूरची जागा येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीमध्ये भाजप तिवसा,धामणगाव रेल्वे,मेळघाट,वरड – मोर्शी,अचलपूरची जागा लढणार आहे. बुलडाण्यातील पुसदची जागा अजित  पवार यांना मिळेल असा अंदाज आहे. तर मेहकर .सिंदखेड राजा आणि बुलडाणा शिंदेना मिळतील. नागपूर विभागातील रामटेक आणि भंडारा या जागा शिंदेच्या वाटयाला येतील तर सडक अर्जुनाची जागा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे.



प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी' ची 16 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर !

 *बारामती मतदारसंघात दिला 'हा' उमेदवार

*विविध समाज घटकांतील लोकांना संधी

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र विधानसभेसाठी 16 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केलीय. पाचव्या यादीत बारामती मतदारसंघातून मंगलदास तुकाराम निकाळजे यांना उमेदवारी दिलीय.राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल हे अखेर वाजलं आहे. विधानसभा निवडणुकांचं काउंटडाऊन आता सुरू झाला आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आणि या घोषणेनुसारच येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत . त्यापुढे तीन दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हे जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष ॲक्शन मोडमध्ये आला आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून एकामागून एक सर्वच पक्ष त्यांच्या त्यांच्या पक्षांची यादी जाहीर करत आहेत. काल भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजप पक्षाकडून अधिकृतपणे पहिल्या यादीमध्ये ९९ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. आज सकाळपासूनच राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. तर आता नुकतीच वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर झाली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आज (दि.21) उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये १६ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांनी 11 उमेदवारांची पहिली, 10 उमेदवारांची दुसरी, 30 उमेदवारांची तिसरी आणि 16 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली होती.

पहिल्या यादीत तृतीयपंथी असलेल्या शमिभा पाटील यांना स्थान दिले, तर दुसरी 10 उमेदवारांच्या यादीत सर्वच्या सर्व उमेदवार मुस्लीम समाजातील आहेत. वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत 83 उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या 288 जागांपैकी किती जागा लढवणार आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, उमेदवार जाहीर करण्यात इतर पक्षांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.


'वंचित'ची 11 जणांची पहिली यादी

रावेर (जळगाव) - शमीभा पाटील

सिंदखेड राजा (बुलडाणा) - सविता मुंडे

वाशिम - मेघा किरण डोंगरे

धामणगाव रेल्वे (अमरावती) - निलेश टी. विश्वकर्मा

नागपूर दक्षिण पश्चिम - विनय भांगे

साकोली (भंडारा) - डॉ. अविनाश नान्हे

नांदेड दक्षिण - फारुख अहमद

लोहा (नांदेड) - शिवा नरांगळे

औरंगाबाद पूर्व - विकास रावसाहेब दांडगे

शेवगाव (अहमदनगर) - किसन चव्हाण

खानापूर (सांगली) - संग्राम माने


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार ?

 * बारामती विधानसभा निवडणूकीकडे राज्यासह देशाचे लक्ष

लोकसभेच्या निवडणूकीमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष बारामती निकालाकडे लागले होते. आता विधानसभा निवडणूकीमध्ये मध्ये चित्र वेगळे नसल्याचे दिसून येत आहे. पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांच्या विरोधात चक्क त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार दंड थोपटण्याची शक्यता आहे.  असे झाल्यास बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळू शकते.

बारामती शहरात अजित पवार यांच्या प्रचार यंत्रणेकडून त्यांच्या नावाच्या प्रचाराच्या वाहनांचा ताफा तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे.  या प्रचार रथावर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आता  बारामतीतून राष्ट्रवादीचे  उमेदवार अजित पवार हेच असतील हे आता स्पष्ट झालंय. 

यापूर्वी अजित पवारांनी तब्बल सहा वेळा बारामतीचं नेतृत्व केलंय आता सातव्यांदा अजित पवार  बारामतीच्या मैदानात उतरलेत. येत्या  28 तारखेला अजित पवार  उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आजपर्यंत अजित पवारांच्या विरोधात लढणा-याचं डिपॉझिट जप्त झालंय. मात्र, बारामतीची यंदाची लढाई अजित पवारांसाठी तितकी सोपी नसणार आहे.  यंदा अजित पवारांच्या विरोधात शरद पवार युगेंद्र पवारला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना सुळेंच्या विरोधात मैदानात उतरवलं.  मात्र मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा यांना  पराभवाचा सामना करावा लागला.  सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून 48 हजारांचे लीड मिळालं होतं. 

लोकसभेला काकांनी पुतण्याला आसमान दाखवलं.  आता  विधानसभेतही काकांच्या  विरोधात पुतण्या दंड ठोकून उभा राहण्याची शक्यता असल्यानं बारामतीत लोकसभेनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?  

युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र असून

फलटण तालुक्यातील शरयू खाजगी साखर कारखान्याचे काम ते पाहतात.विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत.